उपाहारगृहातील अन्न : जिभेचे चोचले कि आरोग्यहानी ?

अन्नपदार्थ शिजवण्यापासून ते प्रत्यक्षात ग्राहकांना देण्यापर्यंत घालून दिलेल्या विविध निकषांचे पालन न केल्यामुळे मुंबई येथील २३९ उपाहारगृहांचे अनुमतीपत्र अन्न आणि औषध प्रशासनाकडून रहित करण्यात आले आहे. त्यामध्ये काही प्रसिद्ध उपाहारगृहांचाही समावेश आहे. पूर्वी केव्हातरी उपाहारगृहात जाणारे सामान्यजन आज-काल सुधारलेल्या आर्थिक स्थितीमुळे, तसेच कोणतीही चांगली घटना घडली की, ‘मेजवानी’ देण्याच्या निमित्ताने उपाहारगृहात वारंवार जात असतात. प्रतिदिनच्या जेवणातील तेच-तेच पदार्थ खाऊन कंटाळा येत असल्याने जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ खाण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही.

मोठ्या उपाहारगृहात जेवणाचे महागडे देयक आकारले जात असल्यामुळे उपाहारगृहाचे दायित्व असते की, ग्राहकांना चांगल्या दर्जाचे अन्नपदार्थ पुरवणे; परंतु चांगल्या थाळीत दिसायला आकर्षक, मसालेदार आणि वेगवेगळ्या चवीचे पदार्थ वाढून दिले की, ‘आपले काम झाले’, असे उपाहारगृहांच्या मालकांना वाटते. स्वयंपाकगृहात स्वच्छता राखून पदार्थांचा दर्जा व्यवस्थित राखला गेला आहे कि नाही ? आणि आचारी व्यवस्थितरित्या ते पदार्थ बनवतो कि नाही ?, याची दक्षता घेतली जात नाही. तसेच ग्राहकही या गोष्टींकडे लक्ष न देता केवळ ‘पदार्थ चविष्ट आहे कि नाही’, हेच पहातात. अन्नपदार्थांची साठवणूक योग्यरित्या न करणे, पदार्थांचा दर्जा चांगला नसणे, स्वयंपाकगृहे अस्वच्छ असणे, अशा त्रुटी शासकीय पडताळणीत आढळून येतात. अन्नपदार्थांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी ‘ऍगमार्क, बी.आय.एस्., भारतीय दंड संहिता (कलम २७२, २७३) हे कायदे आहेत; परंतु या कायद्यांचा वापर करून आतापर्यंत कोणालाही मोठ्या शिक्षा होऊन जरब बसली आहे, असे दिसून आलेले नाही. अनुमती पत्र तात्पुरते निलंबित होऊन परत काही कालावधीने त्याचे नूतनीकरण होते. यासाठी उपाहारगृहातील पदार्थांविषयी लोकांनी अधिक जागरूक रहाणे आवश्यक आहे. आपली ‘रोजच्या जगण्याची चिंता’, ‘उपाहारगृहचालकांची ‘लॉबी’ आणि शासकीय व्यवस्थेतील वरपर्यंत चाललेला भ्रष्टाचार, यांमुळे पदार्थ बनवतांना त्यात भेसळ केली जाते. विशेष करून मांसाहारी पदार्थ बनवतांना बैल आणि गाय यांचे मांस कोणालाही कळू न देता कोंबडी अथवा शेळीचे मांस म्हणून ताटात वाढले जाते. ‘आपण काय खात आहोत’, हे सामान्य हिंदू समजून घेत नाहीत आणि ते धर्महानीच्या पापात सहभागी होतात.

अन्नग्रहण हे एक पवित्र यज्ञकर्म आहे ! यामुळे ते विनम्र आणि समाधानाने करणे आवश्यक आहे. सात्त्विक अन्न, पर्यायाने शाकाहारी असण्याचे लाभ सामान्य हिंदूंना समजण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. यातून शाकाहाराचे महत्त्व हिंदूंच्या मनावर बिंबेल. यासमवेत मुळातच उपाहारगृहातील पदार्थांवर ताव मारण्यापेक्षा घरातील पदार्थ खाणे श्रेयस्कर आहे, हेही त्यांच्या लक्षात येईल.

– श्री. सुनील लोंढे, ऐरोली, नवी मुंबई.


Multi Language |Offline reading | PDF