‘मॉर्निंग वॉक’ !

संपादकीय

मध्यप्रदेशमधील भाजपचे नेते मनोज ठाकरे यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. ते सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ला गेले असतांना त्यांची हत्या झाली. या हत्येमुळे तेथील राजकीय वातावरण तापले असून आरोपांच्या फैर्‍या झाडल्या जात आहेत. असे असले, तरी पुरो(अधो)गाम्यांची टोळी मात्र शांत आहे. तसे पहायला गेले, तर ‘मॉर्निंग वॉक’ हा पुरोगाम्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. महाराष्ट्रात ‘मॉर्निंग वॉक’ हा शब्द खूपच अपकीर्त झाला आहे. ‘मॉर्निंग वॉक’ला जा’, असा सल्ला देणार्‍यांना ‘गुंड’, ‘खुनी’ या दृष्टीने पाहिले जाते. असा सल्ला एखाद्या हिंदुत्वनिष्ठाने कोणाला दिल्यास विचारायची सोय नाही ! त्याला थेट ‘आतंकवाद्यां’च्या पंक्तीत बसवले जाते. याला कारण म्हणजे महाराष्ट्रात झालेल्या विचारवंतांच्या (?) हत्या होय. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्या या ते ‘मॉर्निंग वॉक’ला गेले असतांना झाल्याचे सांगितले जाते. याच्या अधिक खोलात शिरायचे प्रयोजन नाही. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात त्यानंतर ‘महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याने आता नागरिकांना ‘मॉर्निंग वॉक’ला जाणे दुरापस्त झाले आहे’, अशी टीका पुरोगाम्यांकडून होऊ लागली. त्याचा निषेध करण्यासाठी पुरोगाम्यांनी ठिकठिकाणी सकाळी म्हणजे ‘मॉर्निंग वॉक’ करतात, त्या वेळी मेणबत्ती मोर्चे काढले. ‘हत्या या हत्या असतात आणि त्याचा निषेध केला पाहिजे’, असे पुरोगाम्यांचे म्हणणे आहे. असे आहे, तर मनोज ठाकरे यांच्या हत्येनंतर पुरोगाम्यांचा आवाज का नाही उठला ? गप्प बसलेल्या पुरोगाम्यांमुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. भारतात पुरोगाम्यांच्या हत्यांना ‘मोल’ आहे, तर हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या ‘मातीमोल’ आहेत. भारतात ‘हत्या कोणाची झाली ?’, ‘ती कुठे झाली ?’, यालाही महत्त्व आहे. पुरोगाम्यांची अथवा मुसलमानांची हत्या जर भाजपच्या राजवटीत झाली, तर ती ‘ब्रेकिंग न्यूज’ होते. या विषयावर चर्चासत्रे रंगतात आणि वृत्तपत्रांचे रकानेही भरले जातात. या उलट भारताच्या कुठल्याही राज्यात हिंदुत्वनिष्ठांची हत्या झाली, तरी ती ‘ब्रेकिंग न्यूज’ होत नाही. मागील काही वर्षांत केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, बंगाल आदी राज्यांमध्ये हिंदुत्वनिष्ठांच्या मोठ्या प्रमाणात हत्या होत आहेत; मात्र त्यावर दृष्टीक्षेप टाकायला कोणीही सिद्ध नाही. आता मध्यप्रदेशातही हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांचे सत्र चालू झाले आहे. मागील ८-१० दिवसांत भाजपच्या नेत्याची झालेली ही चौथी हत्या आहे. तरीही सगळीकडे शुकशुकाट आहे. नसीरुद्दीन शाह यांच्यासारखे कलाकार ‘भारतात (मुसलमानांना) असुरक्षित वाटते’, असे जेव्हा म्हणतात, त्या वेळी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी लक्षात येते; कारण भारतात मुसलमान नव्हे, तर हिंदू असुरक्षित आहेत ! या हत्यांना दृष्टीआड केले जात असल्यामुळे हिंदूंची बिकट स्थिती समोर येत नाही एवढेच. मध्यप्रदेशात काँग्रेसला सत्तेची सूत्रे हातात घेऊन काही दिवस उलटले आहे; मात्र त्याच्या राजवटीत हिंदुत्वनिष्ठांचा जीव धोक्यात आहे, हेच खरे !


Multi Language |Offline reading | PDF