हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनानंतर खारघर (नवी मुंबई) येथे अंनिसचा विनाअनुमती होणारा कार्यक्रम रहित

अनुमती न घेता कार्यक्रम करणारी अंनिस म्हणे विवेकवादी ! अशी अंनिस कधीतरी अंधश्रद्धा निर्मूलन करू शकते का ? आर्थिक घोटाळे केल्याचा आरोप असणार्‍या आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली हिंदूंच्या धर्मश्रद्धांवर वारंवार आघात करणार्‍या अंनिसवर सरकारने बंदी घालावी, अशी हिंदूंची मागणी आहे !

मुंबई, २१ जानेवारी (वार्ता.) – नवी मुंबई, खारघर, सेक्टर १२ येथील गोखले शाळेच्या मैदानात २० जानेवारी या दिवशी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेलापूर शाखेच्या वतीने ‘चमत्कारामागील विज्ञान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अशा कार्यक्रमांच्या नावाखाली हिंदु धर्म, देवता, संत यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या अंनिसची पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन हा कार्यक्रम रहित करण्यात यावा, यासाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने खारघर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले होते. येथील शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. गिरीश गुप्ता आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. दिनेश चासकर यांनी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने साहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ यांना याविषयीचे निवेदन दिले. या वेळी पोलिसांनी माहिती घेतली असता ‘अंनिसकडून कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारे अनुमती घेण्यात आली नाही’, असा प्रकार पुढे आला.

ज्या शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना पोलिसांनी दूरभाष करून ‘कार्यक्रमाची अनुमती घेण्यात आली नाही’, असे कळवले. त्यानंतर थोड्या वेळाने मुख्याध्यापकांनी पुन्हा दूरभाष करून कार्यक्रम रहित करण्यात आल्याचे पोलिसांना कळवले. (अनुमती न घेता कार्यक्रम करणार्‍या अंनिसचा कारभार कसा चालत असेल, हे यावरून लक्षात येते. वर्ष २०१२ च्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’च्या दिवाळी अंकातून मिळणारे लक्षावधी रुपयांचे उत्पन्न अंनिसने आर्थिक ताळेबंदामध्ये दाखवलेले नाही. अंनिसचे अन्यही काही आर्थिक घोटाळे उघड झाले आहेत. अंनिसचे अशा प्रकारचे आर्थिक व्यवहार पहाता साहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी शासनाला प्रशासक नेमण्याची शिफारसही केली आहे. यावरून अंनिसचे खरे स्वरूप उघड होते. अशी संघटना म्हणे अंधश्रद्धा निर्मूलन करणार ! – संपादक)

या कार्यक्रमाच्या निमंत्रणामध्ये पाण्याने दिवा पेटवणे, देवी अंगात येणे, मंत्राने अग्नी पेटवणे आदींसह बुवा-बाबा करत असलेल्या चमत्कारांचा भांडाफोड करून वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार-प्रसार करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी नियोजितस्थळी अंनिसचे १० ते १२ कार्यकर्ते जमले होते; मात्र कार्यक्रम रहित झाल्याचे कळताच तेथे क्रिकेट खेळणार्‍या युवकांना विषय सांगून कार्यक्रम आटोपता घेण्यात आला.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हा कार्यक्रम रहित करण्यात यावा, यासाठी पोलिसांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की,

१. समाजातील अंधश्रद्धा नष्ट व्हायला हव्यात, याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही; मात्र भोंदूगिरीचा भांडाफोड करण्याच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धांवर चिखलफेक करणे, हा अंनिसचा पूर्वेतिहास आहे.

२. श्री साईबाबा यांनी पाण्याने दिवे पेटवल्याचे, भक्तांना त्यांच्या श्रद्धेनुसार देवतांच्या रूपात दर्शन दिल्याचे अनेक चमत्कार त्यांच्या चरित्रग्रंथात आहेत. तसेच शेगावचे संत श्री गजानन महाराज, अक्कलकोटचे संतश्रेष्ठ श्री स्वामी समर्थ यांच्या चरित्रांमध्ये अनेक चमत्कार आहेत. हे सर्व खोटे आहेत का ? सर्व चमत्कार खोटे असल्याचा प्रचार करून ही मंडळी हिंदु धर्मातील संतांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न करून भक्तांच्या श्रद्धेचा अवमान करत आहेत.

३. समाजातील अंधश्रद्धा, बुवाबाजी नष्ट करायची असेल, तर नागरिकांना धर्मशिक्षण आणि अध्यात्मशास्त्र यांची माहिती द्यायला हवी. यामुळे कुणीही अंधश्रद्धेला बळी पडणार नाही; मात्र तसे न करता ही मंडळी सरसकट चमत्कार खोटे ठरवण्याचा प्रयत्न करून समाजातील वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

४. यापूर्वीही ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या वतीने प्राथमिक शाळांतील शिक्षक आणि विद्यार्थी यांसाठी अनधिकृतरित्या ‘वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प’या उपक्रमाच्या अंतर्गत राबवला गेला होता.

५. यामध्ये देण्यात आलेल्या प्रश्‍नपत्रिकेमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या नावावर कोणकोणते चमत्कार खपवले जातात ? शनिशिंगणापूरला चोर्‍या होत नाहीत, ही अंधश्रद्धा कशी तपासावी ? वेदांसंबंधी अंधश्रद्धा कोणत्या ?  उपवासाचे शारीरिक दुष्परिणाम कोणते ? सत्यनारायण कथेमध्ये कोणकोणते चमत्कार सांगितले आहेत ? ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, हे विधान कोणाचे आहे ? अशा प्रकारचे धर्मश्रद्धेविषयी संभ्रम निर्माण करण्याचे प्रश्‍न विद्यार्थ्यांना विचारण्यात आले होते.

६. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे श्री योगेश्‍वरी महाविद्यालयात ‘वैज्ञानिक जाणिवा’ निर्माण करण्याच्या नावाखाली अंनिसचे हनुमंत भोसले आणि अन्य चार कार्यकर्ते यांनी हिंदु धर्म, देवता, माऊली महाराज, संत, तसेच देशाचे राष्ट्रपती यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह अन् अश्‍लाघ्य पातळीवर जाऊन टीका केली. याविषयी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात १८ जुलै २००७ या दिवशी अंनिसच्या ४ कार्यकर्त्यांवर २९५(अ) नुसार फौजदारी गुन्हा नोंद झाला होता.

७. पालक संघटना आणि प्राचार्य यांनीही या प्रकल्पाच्या विरोधात शासन अन् पोलीस यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यावर ‘शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन’, ‘सचिव, राज्य शिक्षण प्रशिक्षण मंडळ, पुणे’ आणि रत्नागिरी शिक्षणाधिकारी यांनी आदेश काढून ‘वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प’ बंद करण्याचा आदेश शाळा आणि महाविद्यालये यांना दिला होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now