निरपराध हिंदूंना आणि सनातनला गोवण्यासाठी पैसे पुरवणारे हात कुणाचे ? – सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा परखड प्रश्‍न 

डावीकडून श्री. सुनील घनवट, कु. रागेश्री देशपांडे, सद्गुरु नंदकुमार जाधव आणि अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

अंबिकानगर, २१ जानेवारी (वार्ता.) – हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या निष्पाप हिंदुत्वनिष्ठांना अन्वेषण यंत्रणांकडून कसे गोवले जाते, हे सनातनने अनुभवले आहे. सनातनला गोवण्यासाठी अनेकांना लक्षावधी रुपयांची आमीषे दाखवली गेली. सनातनला गोवण्यासाठी पैसे पुरवणारे हे हात सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील मलिदा खाणार्‍यांचे आहेत कि ज्या नास्तिकतावाद्यांच्या कारभारातील भ्रष्टाचाराची लक्तरे सनातनने चव्हाट्यावर आणली त्यांचे आहेत ? हे हात कुणाचेही असले, तरी या षड्यंत्रातून वाचवणारा भगवान श्रीकृष्णाचा वरदहस्त सनातन संस्थेला लाभला आहे, असे उद्गार सनातनचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी काढले.

२० जानेवारीला येथे आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक श्री. सुनील घनवट, रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी जाज्ज्वल्य भाषणांमधून उपस्थितांमध्ये धर्मतेज चेतवले. १ सहस्र १०० हिंदू सभेला उपस्थित होते. नवनाथांच्या समाधीस्थळांनी पावन झालेल्या भूमीत पार पडलेल्या सभेत हिंदूंनी नाथ संप्रदायाच्या शिकवणीप्रमाणे भक्तीमार्गाची कास धरत धर्मरक्षणासाठी कटीबद्ध होण्याचा संकल्प केला.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी व्यासपिठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. वेदमूर्ती किशोर जोशी, नीलेश धर्माधिकारी आणि बंडोपंत धर्माधिकारी यांनी वेदमंत्रपठण केले. सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा सन्मान धर्मप्रेमी श्री. गणेश पलंगे यांनी, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा सत्कार मर्चंट बँकेचे संस्थापक आणि विजय आनंद फाऊंडेशनचे संस्थापक श्री. कमलेश भंडारी यांनी, श्री. सुनील घनवट यांचा सत्कार धर्मप्रेमी श्री. परमेश्‍वर गायकवाड यांनी, तर कु. रागेश्री देशपांडे यांचा सत्कार धर्मप्रेमी सौ. लता गारदे यांनी केला. या प्रसंगी वारकरी संप्रदायाच्या ह.भ.प. प्रभाताई भोंग, ह.भ.प. शिंदे महाराज, ह.भ.प. हांडे महाराज, महापौर बाळासाहेब वाळके उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील रहाण्याची शपथ घेतली.

दुटप्पीपणा हेच लोकशाहीचे अपयश ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

सध्या प्रसारमाध्यमांमध्ये दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्यांचा गवगवा केला जातो; जणूकाही गांधीहत्या आणि या चार हत्यांच्या व्यतिरिक्त इतर हत्या झाल्याच नाहीत. नक्षलवाद्यांनी आतापर्यंत १२ सहस्र निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे. जिहादी आतंकवादामध्ये सहस्रावधी नागरिक मृत्यूमुखी पडलेले आहेत; पण त्यावर चर्चा होत नाही. दुटप्पीपणा हेच लोकशाहीचे अपयश आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना हाच यावर उपाय आहे.

मनुस्मृती जाळणारे नेहरू-गांधी यांचे पुतळेही जाळणार का ?

राज्यघटनेच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ मनुस्मृतीचे दहन करत आहेत. हिंदु राष्ट्राची मागणी ही घटनाविरोधी असल्याचा कांगावा विरोधक करतात. राज्यघटनेत पालट करणे, हा त्यांच्या लेखी गुन्हाच असेल, तर नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात अनेक वेळा राज्यघटनेत पालट करण्यात आले. मग ते नेहरू आणि इंदिरा गांधी यांचे पुतळे जाळणार का ? डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेत जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देण्याचे प्रावधान नव्हते. तरीही ते दिले गेले आहे. आंबेडकरांनी म्हटले होते की, राज्यघटनेत समान नागरी कायदा व्हायला हवा; पण तो झाला नाही. याविषयी राज्यघटनावाले का बोलत नाही, असा प्रश्‍न करत अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी हिंदु राष्ट्राला विरोध करणार्‍यांचे वैचारिक ढोंग उघडे पाडले.

विखे पाटील श्री. समीर गायकवाडची क्षमा मागणार का ?

पानसरे हत्याप्रकरणी सनातनचा साधक श्री. समीर गायकवाड याला अटक झाल्यानंतर काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गायकवाड याला फाशी देण्याची मागणी केली. त्यानंतर समीर नाही, तर अन्य दोन मारेकरी असल्याचे पुढे आले. काही कालावधीनंतर समीर याला जामीनही संमत झाला. ‘ज्या तडफेने विखे पाटील श्री. समीर गायकवाड याच्यावर बेछूट आरोप करत पानसरे कुटुंबियांना भेटले होते, त्याच तडफेने ते आता श्री. समीर गायकवाड याच्यावर चुकीचे आरोप केले; म्हणून त्याच्या घरी जाऊन नाक घासणार का ?’, असा प्रश्‍न अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी उपस्थित केला.

हिंदु राष्ट्र स्थापनेचे भागीदार व्हा ! – सुनील घनवट

आज हिंदु धर्मावर विविध माध्यमातून आघात होत आहेत. जवळपास प्रत्येक शहरांमध्ये ‘मिनी पाकिस्तान’ निर्माण झाले आहेत. हिंदूंनी देव, देश, धर्म यांच्या रक्षणासाठी कृतीशील होणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेचे साक्षीदार नाही, तर भागीदार व्हा.

‘अहमदनगर हे परकीय नाव वापरू नका, तर या नगरीचे प्राचीन नाव असलेले ‘अंबिकानगर’ हे नाव वापरा’, असे आवाहन श्री. सुनील घनवट यांनी केले.

तेजस्वी वीरांगनांचा इतिहास पुन्हा गिरवण्याची आवश्यकता ! – कु. रागेश्री देशपांडे

हिंदूंना तेजस्वी वीरांगनांचा इतिहास लाभला आहे. तो पुन्हा गिरवण्याची आवश्यकता आहे. हिंदूंवर धर्माचे संस्कार झाले, तर आजच्या काळातही झाशीची राणी आणि छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होतील.

सहकार्य आणि आभार : श्री. गणेश भुतारे यांनी मंडप व्यवस्था अन् बैठक व्यवस्था, श्री. पंकज भुतारे यांनी विद्युत व्यवस्था, श्री. राजू ससे यांनी व्यासपीठ व्यवस्था, श्री. अमोल हुबे यांनी पाणी व्यवस्था, श्री. राजू ढोरे यांनी ध्वनीक्षेपक व्यवस्था अन् एलईडी व्हॉल्व व्यवस्था, भोजन व्यवस्था श्री. कमलेश भंडारी आणि श्री. राहुल गारदे, निवास व्यवस्था श्री. गणेश पलंगे, तसेच ज्योती मंडपचे मालक; पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेचे श्री. वसंतशेठ लोढा आणि धर्माभिमानी श्री. सुधीर मळगंगा यांनी वरील सेवाव्यवस्था उपलब्ध करून सभा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

आज आढावा बैठक

हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील होऊ इच्छिणार्‍यांसाठी २२ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता आनंदी बाजार येथील दादा चौधरी विद्यालयात आढावा बैठकीचे आयोजन केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF