लोकशाहीचा गळा घोटणार्‍या बंगालमध्ये सध्या लोकशाही वाचवण्याच्या बाता मारल्या जात आहेत ! – पंतप्रधान

लोकशाहीचा गळा घोटला जात असतांना पंतप्रधानांनी त्याविषयी केवळ सांगणे नव्हे, तर संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित आहे !

सिल्वासा – ज्या बंगालमध्ये राजकीय पक्षांना कार्यक्रम करण्यावर बंदी घालून लोकशाहीचा गळा घोटला जातो, तेथेच सध्या लोकशाही वाचवण्याच्या बाता मारल्या जात आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर टीका केली. ते दमण आणि दीवमधील सिल्वासा येथील जाहीर सभेत बोलत होते. कोलकाता येथे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने १३ विरोधी पक्षांची महासभा नुकतीच पार पडली. त्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांनी वरील टीका केली.

पंतप्रधान पुढे म्हणाले, ‘‘आमची नीती देशाच्या विकासाची आहे. विकासासाठीच आम्ही झटत आहोत. आमचा उद्देश ‘परिवारा’च्या विकासाचा नाही. आमची नियत स्वच्छ आणि स्पष्ट आहे. नेमके हेच विरोधकांना खुपते आहे. ‘मोदी हे भ्रष्टाचाराविरोधात इतकी कठोर कारवाई का करत आहेत ?’, असा प्रश्‍न त्यांना पडला असून त्याचाच त्रास त्यांना होत आहे. कोलकात्यात जमा झालेल्या नेत्यांचा राग माझ्यावर आहे. त्याचे कारण एकच आहे की, मी त्यांना पैसा लुटण्यापासून रोखले आहे. त्यामुळेच त्या सर्वांनी ‘महाआघाडी’ बनवली आहे; पण कोणतीही ‘महाआघाडी’ त्यांच्या सुलतानशाहीला वाचवू शकत नाही.’’


Multi Language |Offline reading | PDF