अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर मोर्चा काढलेल्या शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य

उद्योगमंत्री सुभाष देशमुख

मुंबई – ‘भूमी अधिग्रहण करू नये’ यांसह विविध मागण्यांसाठी सातारा ते मंत्रालय असा अर्धनग्न अवस्थेत शेकडो किलोमीटर चालत मोर्चा काढलेल्या शेतकर्‍यांच्या ७० टक्के मागण्या मान्य केल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी २१ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. (मागण्या मान्यच करायच्या होत्या, तर शेतकर्‍यांना एवढा नाहक त्रास का दिला ? याला उत्तरदायी असलेल्यांवर कडक कारवाई केली, तरच यापुढे कोणी शेतकर्‍यांची नाहक छळवणूक करणार नाही. – संपादक)

सातार्‍यातील खंडाळा एम्आयडीसीत गेलेल्या भूमींच्या विषयी फसवणूक झाल्याचा आरोप करत हे शेतकरी गेल्या दहा दिवसांपासून अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यासाठी निघाले होते. सातारा जिल्ह्यातील धनगरवाडी, केसुर्डी, शिवाजीनगर, खंडाळा, बावडा, मोर्वे, भादे, अहिरे या गावांतून आलेल्या शेतकर्‍यांना मुंबईच्या वेशीवर मानखुर्दमध्ये पोलिसांनी अडवले आणि त्यांच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी मंत्रालयात नेले.

मंत्रालयात पोहोचल्यानंतर या शिष्टमंडळाने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. या बैठकीत महामंडळाचे अधिकारी तेथील गावांची पाहणी करतील आणि शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेतील, असे ठरले. हरकती असलेल्या भूमींचे अधिग्रहण करण्यात येणार नाही, तर शेतकर्‍यांच्या संमतीनेच जमिनी अधिग्रहीत होतील. टप्पा ३ मधील लाभक्षेत्रातील भूमी अधिग्रहणातून वगळण्यात येणार आहे.

शेतकर्‍यांच्या ७० प्रतिशत मागण्यांची पूर्तता झाल्याने आणि त्यांची बाजू समजून घेतल्याविषयी शेतकर्‍यांनी शासनाचे आभार मानले आहेत, असे देसाई यांनी नंतर पत्रकार परिषदेत सांगितले. (हक्काच्या मागण्यांसाठी शेतकर्‍यांना पायपीट करावी लागली, त्याविषयी सरकारला काहीच कसे वाटत नाही ? येथील शेतकर्‍यांवर अन्याय होऊन त्यांना अशा प्रकारे मोर्चा काढावा लागणे, शासनासाठी लज्जास्पद नाही का ? याला उत्तरदायी संबंधितांवर शासन काय कठोर कारवाई करणार, हेही शासनाने सांगावे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF