राजमाता जिजाबाई !

आज असलेल्या राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने…

आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन आणि पराक्रम अशा राजस अन् सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता जिजाबाई यांची आज जयंती !

‘लोकांनी गुलाम व्हावे’; ‘मुसलमानी साम्राज्याची इमाने इतबारे चाकरी करावी आणि मनसबदार व्हावे’; ‘ज्ञानी माणसांनी आपल्याच माणसांची घरे लुटून शत्रूने किती कमाई केली, याचा हिशेब शत्रूलाच सांगावा’, ‘कलाकारांनी आपल्याच माणसांची फजिती रंगवून-रंगवून शत्रूला ऐकवावी’, अशाप्रकारे सर्वच विपरीत घडत होते. समाजाची ही दयनीय अवस्था जिजाऊंना बघवत नव्हती. त्यांना या अन्याय-अत्याचाराविरुद्ध लढणारा वीर पहायचा होता.

जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी वर्ष १६०५ मध्ये झाला.  ‘तेजस्वी, पराक्रमी, स्वराज्य स्थापनेचे सामर्थ्य असणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल’, म्हणून जिजाऊंनी भवानीदेवीकडे पदर पसरला. शहाजीराजांचे आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही इत्यादी शाहींमध्ये पराक्रम गाजवूनही असलेले दुय्यम स्थान जिजाऊंना जाणवत होते. भवानी आईला जिजाऊंचे हे मागणे पूर्ण करणे भाग होते, कारण जे दु:ख जिजाऊचे होते, तेच दु:ख भवानीमातेचे होते. तिचा धर्म बुडत होता. तिची मंदिरे पाडली जात होती, मूर्ती तोडल्या जात होत्या. तिलाही एक कर्तृत्ववान जीव जन्माला घालण्यासाठी समर्थ आई हवी होती. भवानीमातेच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला आणि शिवजन्मासमवेत हिंदवी स्वराज्याच्या पायाभरणीला आरंभ झाला.

जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगितल्या त्या पारतंत्र्यात चालू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या ! ‘सीतेचे हरण करणार्‍या दुष्ट रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता’, ‘बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता’, अशा प्रत्येक गोष्टीत त्यांनी पराक्रमी पुरुषाला ‘भगवंता’चे स्थान दिले, तर स्वातंत्र्याला ‘ध्येया’चे स्थान दिले.

‘प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते – ‘जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे’; ‘आज ‘आपण- समाज, तू आणि मीही – पारतंत्र्यात आहोत’, ही प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव शिवबाला करून देण्यात आली. ‘कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे’, ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेच !

शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतांनाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकवली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्‍याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईने लक्ष ठेवले. शहाजीराजांची कैद आणि सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असतांना स्वत: जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत.

मुले आईकडून सदाचार आणि प्रेमाचा, तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत. रायगडावर शिवराज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसांनी १७ जून, १६७४ या दिवशी त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्‍वास घेतला.


Multi Language |Offline reading | PDF