काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश नाही, यामागचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण समजून घ्यायला हवे ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात सनातन संस्थेचा सहभाग

मुंबई – अय्यप्पा मंदिरात तेथील प्रथा-परंपरा तोडून काही महिलांनी प्रवेश केला. ज्यांनी प्रवेश केला, त्या महिला श्रद्धा, भक्ती यांच्या जवळपास तरी आहेत का ? केवळ काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश नाही. त्यामागेही वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण आहे, हे समजून घ्यायला हवे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी केले. शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांच्या प्रवेशाच्या संदर्भात ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवर १७ जानेवारी या दिवशी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात त्या बोलत होत्या. या वेळी नागपूर येथील अधिवक्त्या स्मिता सिंगलकर, मनसेच्या पुणे शहर महिलाध्यक्षा रूपाली पाटील आणि भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही सहभाग घेतला. सूत्रसंचालन ‘जय महाराष्ट्र’चे आशिष जाधव यांनी केले.

सौ. नयना भगत पुढे म्हणाल्या, ‘‘अय्यप्पा मंदिरात महिलांनी प्रवेश केल्याचे समर्थन करायचे, ही वर्ष २०१९ च्या निवडणुकीची हवा आहे. ‘कोणाकडून तरी तिकीट मिळावे’, या हेतूने हे सर्व केले जात आहे. सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये चालू असलेल्या ‘रेडी टू वेट’ या मोहिमेतून शबरीमला मंदिराच्या प्रथा-परंपरा जपण्याचे समर्थन केले आहे. यामध्ये अय्यप्पा भक्त असलेल्या लाखो महिला आणि तरुणी सहभागी झाल्या आहेत; मात्र हे समाजाला दाखवले जात नाही. त्यामुळे समाजाचा बुद्धीभेद होतो.’’

(म्हणे) ‘भावभक्ती नसलेल्या आणि केवळ पर्यटनासाठी मंदिरात जाणार्‍यांचाही सन्मान झालाच पाहिजे !’ – अधिवक्त्या स्मिता सिंगलकर

मंदिरात प्रवेशबंदी करणे, हे असंविधानिक आहे. मध्यमयुगीन मानसिकतेलाच चिकटून रहायचे, परिवर्तनाकडे जायचेच नाही, हे चुकीचे आहे. (एकीकडे तीन तलाक, हलाला यांसारख्या कुप्रथांविषयी गप्प रहायचे, लैंगिक शोषण करणार्‍या पाद्य्रांविषयी अवाक्षरही काढायचे नाही आणि दुसरीकडे हिंदूंच्या प्रथा पायदळी तुडवण्याचे समर्थन करायचे, हा कसला परिवर्तनवाद ? हा निवळ ढोंगीपणाच आणि प्रसिद्धीचा स्टंट आहे, असे म्हटल्यास चूक ते काय ? – संपादक) सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांनी स्वीकारला नाही, ही एक शोकांतिका आहे. (धर्मशास्त्राशी निगडित असलेल्या या निर्णयाविषयी अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींकडून जाणून घेतले असते, तर ती शोकांतिका वाटली नसती ! – संपादक) राजकीय हेतूंनी जेव्हा अशा प्रकरणांना गांभीर्याने घेतो, तेव्हा शबरीमलाचे अयोध्येसारखे मोठे स्वरूप करून ठेवणार का ?, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. धर्मांध लोकांना हाताशी धरून राजकीय पक्ष महिलांच्या अधिकारांवर निर्बंध आणत आहेत. भावभक्ती नसलेल्या आणि केवळ पर्यटनासाठी मंदिरात जाणार्‍यांचाही सन्मान झालाच पाहिजे. प्राचीन वस्तूंच्या अभ्यासासाठी जाणार्‍यांचाही सन्मान व्हायला हवा. (मंदिरे ही पर्यटनस्थळ नसून ईश्‍वरी चैतन्याचा स्रोत आहेत, हे अधिवक्त्या सिंगलकर यांनी लक्षात घ्यावे ! जिथे मंदिरांचेच आध्यात्मिक महत्त्व माहिती नसेल, तिथे भावभक्तीचे महत्त्व कसे समजणार ? – संपादक)

(म्हणे) ‘महिलांनी दर्शन घेतल्यानंतर पुजार्‍यांनी मंदिर स्वच्छ करणे, ही विकृती आहे !’ – रूपाली पाटील, मनसे

मंदिर प्रवेशाविषयी केरळमध्ये एक भूमिका घेणार आणि इतर राज्यात वेगळी भूमिका घेणार, हे पंतप्रधानपदाला शोभणारे नाही. हा राजकारणाचा भाग आहे. निवडणुकीसाठी देव आणि धर्म यांचा वापर केला जात आहे. (याविषयी भाजपला काय म्हणायचे आहे ? – संपादक) महिलांना दर्शन घेऊ न देणे, महिलांनी दर्शन घेतल्यानंतर पुजार्‍यांनी मंदिर स्वच्छ करणे, ही विकृती आहे. (धर्माविषयी अज्ञान असतांना त्यातील कृतींना विकृती म्हणणे हास्यास्पद ! – संपादक)

सूत्रसंचालकांच्या खोचक वक्तव्याला सौ. भगत यांनी दिलेले समर्पक प्रत्युत्तर !

सौ. नयना भगत यांनी ‘श्रद्धावान महिलांनी खंबीरपणे उभे रहावे’, असे म्हटल्यावर  सूत्रसंचालकांनी ‘खंबीरतेने उभे रहा म्हणजे त्यांना घरात डांबून ठेवा’, असे म्हटल्यावर सौ. नयना भगत यांनी ‘मी स्वत: वृत्तवाहिनीवर येऊन बोलत आहे. आज एका पुरुष निवेदकासमोर ४ महिलांची मते महाराष्ट्र ऐकत आहे. त्यामुळे स्त्रियांवर अन्याय होतो, हे थोतांड आहे’, असे समर्पक उत्तर दिल्यावर सूत्रसंचालकांनी विषय पालटण्याचा प्रयत्न केला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now