गोवा मुक्तीलढ्याचा अवमान केल्याप्रकरणी माफी मागा अन्यथा काळे झेंडे दाखवू ! – गोवा सुरक्षा मंच

मंत्री विजय सरदेसाई यांनी ‘गोवा मुक्तीपेक्षा जनमत कौल मोठा’ असे वादग्रस्त विधान केल्याचे प्रकरण

पणजी, २० जानेवारी (वार्ता.) – जनमत कौलाचे जनक मानले जाणारे डॉ. जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्याचे अनावरण करतांना नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी ‘गोवा मुक्तीपेक्षा जनमत कौल मोठा’, असे वादग्रस्त विधान केले होते. मंत्री सरदेसाई यांच्या या विधानाचा गोवा सुरक्षा मंचने निषेध केला आहे. सरदेसाई यांचे हे विधान म्हणजे गोवा मुक्तीलढा आणि या लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलीदानाचा अवमान करण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. मंत्री सरदेसाई यांनी या प्रकरणी प्रजासत्ताकदिनापूर्वी जनतेची माफी मागावी, अन्यथा काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्यात येईल, अशी चेतावणी गोवा सुरक्षा मंचने दिली. गोवा सुरक्षा मंचने १९ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत मंत्री सरदेसाई यांच्या या विधानाचा निषेध केला.

नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी नुकतेच मेरशी सर्कलनजीक जनमत कौलाचे जनक डॉ. जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या वेळी मंत्री सरदेसाई म्हणाले, ‘‘देश स्वतंत्र झाला, त्यानंतर कधीतरी गोवा मुक्त होणारच होता. (मग स्वातंत्र्यसैनिक लढले ते चुकीचे का ? अन्य राज्यांतील स्वातंत्र्यसैनिकांना गोवा मुक्तीलढ्यात उडी का घ्यावी लागली ? – संपादक) देश स्वतंत्र झाल्यानंतर गोवा पोर्तुगीज गुलामगिरीखाली राहिला नसता. (भारताच्या स्वातंत्र्यानंतर १४ वर्षे पोर्तुगिजांच्या गुलामगिरीखाली राहून आणि नंतर सैनिकी बळ वापरून गोवा मुक्त करावा लागूनही असे म्हणणे खेदजनक आहे ! – संपादक) देशानंतर गोव्याला आपोआप मुक्ती मिळाली असती; पण जनमत कौलाने गोव्याची खरी ओळख कायम ठेवली. त्यामुळेच मुक्तीदिनापेक्षा जनमत कौल मोठा ठरतो.’’ (पोर्तुगिजांच्या ४५० वर्षांच्या क्रूर राजवटीनंतर गोव्याची खरी ओळखच पुसली गेली आहे. या राज्यात कार्निव्हलची विकृती, मद्यपानाचे व्यसन, तोकड्या कपड्यांची विकृती शिरली आहे. गोव्यात मद्य आणि महिला सर्रास मिळतात, अशी पर्यटकांची भावना झाली आहे. ही गोव्याची खरी ओळख होऊ शकत नाही ! – संपादक) 

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now