‘अमूल’ आस्थापनाच्या साहाय्याने पारंपरिक आंबिल पेय बाजारात विक्रीसाठी आणण्याची वडोदरा येथील एम्.एस्. विश्‍वविद्यालयाची सिद्धता

आरोग्यक्षेत्रात प्रगत असलेले प्राचीन आयुर्वेद !

वडोदरा – प्राचीन काळापासून आरोग्यासाठी शेतकरी घेत असलेले ‘आंबिल’ हे पेय ‘अमूल’ या आस्थापनाच्या साहाय्याने बाजारात विक्रीसाठी आणण्याची सिद्धता एम्.एस्. विश्‍वविद्यालयाने चालवली आहे. हे पेय घेतल्याने निराशा न्यून होते तसेच पोटातील आतड्यांचे कार्य सुधारते, असे विश्‍वविद्यालयाने सांगितले आहे. (यावरून मनुष्याला निरोगी ठेवण्यासाठी प्राचीन काळापासून आहार, विहार कसा असावा, हे सांगणार्‍या आयुर्वेदाचे महत्त्व लक्षात येते. आताच्या आधुनिक युगात काही असाध्य रोगांवर उपचार करण्यासाठी अ‍ॅलॉपथीपेक्षा आयुर्वेदिक पद्धत उपयोगी ठरत असल्याचे दिसून आले आहे. सध्याच्या काळात पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करून आरोग्याला घातक असलेले ‘जंक फूड’ सेवन करणार्‍या आजच्या तरुण पिढीने यातून बोध घ्यावा ! – संपादक) हे पेय अधिक काळ टिकवून ठेवण्याच्या तंत्रज्ञानाचे पेटंट एम्.एस्. विश्‍वविद्यालयाच्या संशोधकांनी मिळवले आहे. या पेय पदार्थाचा उपयोग निराशा येणार्‍या २९० जणांच्या एका गटावर केल्यावर त्यांच्या निराशेमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे संशोधकांना आढळून आले. (आंतरराष्ट्रीय आस्थापनांकडून शरिराला हानीकारक अशा पेयांची विक्री केली जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शरिराला पोषक असे स्वदेशी पेय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या एम्.एस्. विश्‍वविद्यालय कौतुकास पात्र आहे ! – संपादक)

या विश्‍वविद्यालयाचे अन्न आणि पोषण विभागाचे प्राध्यापक सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणार्‍या श्रुति द्विवेदी म्हणाल्या, ‘‘हे पेय घेतल्यानंतर ‘कॉर्टीसॉल’ या शरिरातील ताण निर्माण करणार्‍या होर्मोन्सच्या प्रमाणात ४.२० टक्के घट झाली, तसेच शरिरासाठी उपयोगी असलेल्या जिवाणूंमध्ये वाढ झाली.’’


Multi Language |Offline reading | PDF