हिंदूंच्या परंपरांमध्ये न्यायालय आणि सरकार यांनी हस्तक्षेप करू नये ! – व्ही.एस्. कोकजे, केंद्रीय अध्यक्ष, विश्‍व हिंदु परिषद

विहिंपच्या विचारसरणीचे सरकार सत्तेत असतांना असे सांगत बसण्यापेक्षा विहिंपने हा हस्तक्षेप थांबवण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे !

प्रयागराज (कुंभनगरी), २० जानेवारी (वार्ता.) – हिंदूंच्या परंपरा आणि मान्यता यांमध्ये न्यायालय आणि सरकार यांनी हस्तक्षेप करू नये, असे प्रतिपादन विहिंपचे केंद्रीय अध्यक्ष व्ही.एस्. कोकजे यांनी कुंभनगरीतील सेक्टर १४ येथील अशोक सिंघल नगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

शबरीमला प्रकरणात केरळचे सरकार हिंदु आंदोलनकर्त्यांवर जाणीवपूर्वक दबाव आणत आहे. हिंदु समाजाची एकता खंडित करण्यासाठी इस्लामी, चर्च आणि साम्यवादी संघटना सतत षड्यंत्र रचत आहेत. काही राजकीय पक्षही हिंसेचा आश्रय घेऊन या षड्यंत्राला पाठिंबा देत आहेत, असाही आरोप त्यांनी केला.

कोकजे पुढे म्हणाले,

१. मागील काही वर्षे समाजातील काही घटकांकडून हिंदूंच्या पंरपरांच्या प्रती हिंदु समाजात अश्रद्धा, अविश्‍वास निर्माण करून हिंदु धर्माला अपमानित आणि कलंकित करण्याचे कृत्य केले जात आहे.

२. दक्षिण भारतातील शबरीमला मंदिर हे त्याचे ताजे उदाहरण आहे. कधी प्रांतवादाच्या नावाने, तर कधी मुंबई, पंजाब, गुजरात येथे उत्तर भारतियांना कथित रूपाने पळवून लावण्याचे षड्यंत्र समोर आले आहे. (हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी विहिंपने काय केले, तेही त्याने हिंदूंना सांगावे ! – संपादक)

३. कोरेगाव-भीमा, सहारनपूर आणि पत्थरगुढी या गावांतील घडलेल्या घटनांतून हिंदु समाजाला विघटित करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचे समोर आले आहे.

४. देशातील विविध गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार हिंदु समाजात फूट पाडणार्‍या लोकांची नावे समजली आहेत. (हिंदु समाजाच्या विरोधात असे कट का शिजतात; कारण हिंदू बलहीन आहेत. हिंदु समाजात मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना कार्यरत असूनही हिंदुविरोधी घटक असे षड्यंत्र रचण्याचे दुःसाहस करतात, हे लज्जास्पद नव्हे का ? – संपादक)

५. केरळ आणि बंगाल येथील सरकार त्यांना दिलेल्या घटनात्मक मर्यादांचे उल्लंघन करून हिंदु समाजाला विघटित करण्याचे आणि त्यांचे दमन करण्याचे प्रयत्न करत आहे.

६. देशातील संतांनी हिंदु समाजाला सदैव संघटित करण्याचा प्रयत्न केला आहे. (संत-महंतांच्या कार्यामुळेच हिंदु धर्म टिकून आहे. हिंदु धर्मावरील आघात परतवून लावण्यासाठी संतांना रस्त्यावर उतरावे लागते, हे मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांसाठी लज्जास्पद ! – संपादक)

७. क्षेत्रवाद, भाषावाद, प्रांतवाद, जातीवाद आणि धर्मनिरपेक्षता यांच्या नावावर काही लोक देश तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यामुळे हिंदु समाज दिशाहीन होऊ नये, तर अशा लोकांच्या विरोधात संघटित होऊन दुष्कृत्यांचा प्रतिकार केला पाहिजे.

कुंभनगरीत विहिंपच्या प्रत्येक बैठकीत शबरीमला प्रकरण आणि राममंदिर यांचा विषय गाजत आहे. या दोन्ही गोष्टी देशव्यापी बनवण्यासाठी चर्चा चालू झाली आहे. विहिंपच्या सर्व मोठ्या नेत्यांनी या सूत्रांना पुढे करून चर्चा चालू केली आहे. ‘भगवान अय्यप्पाच्या दर्शनावरून जी परंपरा अनेक वर्षांपासून चालू आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप केला जाऊ नये’, असे विहिंपचे म्हणणे आहे. सेक्टर १४ मध्ये विहिंपच्या ४२ प्रांत समितींमधील १ सहस्र प्रतिनिधींची २ दिवसीय बैठक चालू झाली. या बैठकीत संघटनेच्या विस्तारावर चर्चा झाली. यामध्ये सामाजिक समरसतेमध्ये ज्या शक्ती मतभेद निर्माण करत आहेत, त्यांना कसे निपटले जाईल, या विषयावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ता विजय शंकर म्हणाले की, शबरीमला प्रकरण हिंदूंसाठी महत्त्वाचे असून बैठकीत याविषयावर चर्चा होणे स्वाभाविक आहे.   


Multi Language |Offline reading | PDF