कुंभमेळ्यानंतर अयोध्येत जाऊन राममंदिर उभारण्यासाठी शिलान्यास करणार ! – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती महाराज

प्रयागराज (कुंभनगरी) २० जानेवारी (वार्ता.) – भाजप असो वा काँग्रेस, कोणताही राजकीय पक्ष अयोध्येत रामाचे मंदिर उभारू शकत नाही. कुंभमेळा झाल्यावर मी स्वतः अयोध्येत जाऊन राममंदिर उभारण्यासाठी शिलान्यास करणार आहे, असे प्रतिपादन ज्योतिष आणि द्वारकाशारदा पीठाधीश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती महाराज यांनी केले.

ते प्रयागराज येथील श्री मनकामेश्‍वर मंदिरात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देतांना बोलत होते. काँग्रेसने राममंदिर उभारण्याचे आश्‍वासन दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा विचार होऊ शकतो, असे विधान विश्‍व हिंदु परिषदेने केले आहे. त्यावर भूमिका मांडतांना शंकराचार्य बोलत होते.

शंकराचार्य पुढे म्हणाले की,

१. काँग्रेसशी आमचा काहीही संबंध नाही. मी कोणत्याही पक्षाचा नाही. माझ्यासाठी सर्वच राजकीय पक्ष समान आहेत. भारतातील राजकीय पक्ष आणि सरकार यांनी निधर्मी घटनेचे पालन करण्याची शपथ घेतली आहे. मग ते मंदिर कसे बांधू शकतील ? काँग्रेस वा भाजप असे राममंदिर उभारण्याचे विधान करत असतील, तर ती फसवणूक आहे. हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे.

२. ‘राममंदिर उभारण्यासाठी तुम्ही अयोध्येत जाणार आहात का ?’, असा प्रश्‍न पत्रकारांनी शंकराचार्यांना विचारला असता ते म्हणाले, ‘हो. राममंदिराचा शिलान्यास करण्यासाठी मी कुंभमेळ्यानंतर अयोध्येत जाणार आहे. श्रीरामजन्मभूमी येथे अद्याप शिलान्यास झालेला नाही. तो करण्यासाठी आम्ही जाणार आहोत. शिलान्यास कसा करायचा याविषयी धर्मग्रंथात सांगितले आहे. त्यानुसार कृती केली जाईल.’’

हिंदु जनजागृती समितीच्या ‘कुंभमेळा प्रयागराज २०१९’ या अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅपचे शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते लोकार्पण

अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅपचे लोकार्पण करतांना शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती महाराज आणि उजवीकडे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

प्रयागराज (कुंभनगरी), २० जानेवारी (वार्ता) – येथील कुंभमेळ्याच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुंभमेळ्याची धार्मिक आणि पौराणिक माहिती देण्यासाठी हिंदी भाषेतील ‘कुंभमेळा प्रयागराज २०१९’ (Kumbh Mela Prayagraj २०१९) हे अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅप सिद्ध केले आहे. त्याचे प्रयागराज येथील श्री मनकामेश्‍वर मंदिरात ज्योतिष आणि द्वारकाशारदा पीठाधीश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांचे समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी, समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे आणि सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक उपस्थित होते. या वेळी शंकराचार्य यांचा सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी सन्मान केला.

सनातन पंचांग भेट देतांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक १. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

या वेळी बोलतांना शंकराचार्य म्हणाले, ‘तुमचे कार्य पुष्कळ चांगले आहे. सनातन कोण आहे, तर ईश्‍वर आहे. स्मृति आणि पुराणे यांमध्ये दिलेले ईश्‍वरी ज्ञानही सनातन आहे. शास्त्रानुसार सांगितलेली कर्तव्ये करणे, हेही सनातन आहे. त्याला विसरता कामा नये. सनातन धर्माच्या आचरणामुळेच समाजात पालट होणार आहे.’’

या वेळी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी शंकराचार्यांना सनातन आश्रम, गोवा येथे येण्याची विनंती केली. या वेळी त्यांना सनातन आश्रमाचे रंगीत पत्रक दाखवण्यात आले, तसेच प्रयागराज येथील कुंभमेळ्यात लावलेल्या प्रदर्शनाची माहितीही त्यांना देण्यात आली. या वेळी त्यांनी सर्व पत्रके, पंचांग निरखून पाहिले आणि ती चांगली असल्याचे सांगून कौतुक केले.

भाविक गूगल प्ले-स्टोरवर जाऊन सदर अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅप डाऊनलोड करू शकतात.

अधिक माहितीसाठी लिंक

https://play.google.com/store/apps/details?id=hjs.android.kumbh या मार्गिकेवर (लिंकवर) जावे.

हिंदु जनजागृती समितीद्वारा निर्मित अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅपची वैशिष्ट्ये !

१. कुंभमेळ्याची विस्तृत माहिती आणि बातम्या

२. राजयोगी (शाही) स्नानाच्या तिथी, तसेच प्रयागराज येथे पोहोचण्यासाठीचे दिशादर्शन

३. प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक आदी कुंभक्षेत्रांचे पौराणिक माहात्म्य आणि धार्मिक महत्त्व

४. देवालय दर्शन, देवी-देवता, वेशभूषा, आदर्श दिनचर्या आदि विषयांवर धर्मशिक्षण

५. प्रयागराज येथे आलेल्या भाविकांसाठी सुविधा म्हणून उपाहारगृह, रेस्टॉरंट, एटीएम्, रुग्णालय आदींची माहिती

६. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने कुंभमेळ्यात लावलेल्या राष्ट्र आणि धर्म विषयक प्रदर्शनाची माहिती

७. ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर माहिती


Multi Language |Offline reading | PDF