हिंदु राष्ट्राची पायाभरणी जळगावमध्ये करू !

जळगाव येथील ऐतिहासिक हिंदु राष्ट्र-जागृती सभेला एकवटलेल्या १७ सहस्रांहून अधिक हिंदूंचा हुंकार !

हिंदुत्वाच्या सागरास उधाण आले । जळगावचे शिवतीर्थ पावन झाले ॥

गर्जती रणी सिंह सारे । हिंदु राष्ट्र स्थापन करा रे ॥

जळगाव, १९ जानेवारी (वार्ता.) – पृथ्वीवरील असुरांचा सर्वनाश करून अखिल ब्रह्मांडाला आदर्श राज्यकारभाराचा प्रत्यय देणारे प्रभु श्रीराम ज्याचे ग्रामदैवत आहे, असे जळगाव ! आपल्या आराध्य देवतेने घालून दिलेला हा आदर्श डोळ्यांपुढे ठेवत ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची पायाभरणी जळगावमध्ये करू’, असा उद्घोष जळगाववासियांनी १३ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवतीर्थ मैदानावर आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केला. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी हिंदु राष्ट्रासाठी आवाहन केल्यावर सभेला उपस्थित सर्व धर्मप्रेमींनी हात उंचावून प्रतिसाद दिला. १७ सहस्रांहून अधिक हिंदूंच्या उपस्थितीत ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’चे जयघोष झाले, ब्राह्मशक्तीचे प्रतीकस्वरूप वेदमंत्रपठणाचे स्वर गुंजले, हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकांचा आशीर्वाद घेऊन रणशिंगाचा आवाज शिवतीर्थ मैदानावरून सर्वदूर पसरला आणि उपस्थित मावळे जणू हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी सज्ज झाले.

 • सभेच्या प्रारंभी श्री. श्रेयस पिसोळकर यांनी शंखनाद केला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
 • आमदार टी. राजासिंह यांनी व्यासपिठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. 
 • सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा सन्मान भागवत्कार ह.भ.प. मोरदे महाराज यांनी केला. आमदार टी. राजासिंह यांचा सत्कार उद्योजक श्री. नरेश सोनावणे, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा सत्कार अधिवक्ता हर्षल राजपूत, तर श्री. प्रशांत जुवेकर यांचा सत्कार श्री. गणेश चौधरी यांनी केला.
 • व्यासपिठावरील मान्यवरांच्या सत्कारानंतर सभेला उपस्थित सनातनच्या संत पू. (सौ.) केवळबाई पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
 • या वेळी सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा दिला. श्री. सुमित सागवेकर आणि कु. रागेश्री देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.
 • वेदमूर्ती पुरुषोत्तम शुक्ल, वेदमूर्ती श्रीराम जोशी, वेदमूर्ती देवेंद्र साखरे, वेदमूर्ती भूषण मुळे, वेदमूर्ती महेंद्र जोशी यांनी वेदमंत्रपठण केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. गजानन तांबट यांनी वेदमूर्तींचा सत्कार केला.

सैतान टिपू सुलतानची जयंती जळगावमध्ये साजरी होऊ देऊ नका !  आमदार टी. राजासिंह

आमदार टी. राजासिंह यांचे युवकांना राष्ट्रप्रेमी आवाहन

जळगावमध्ये काही ठिकाणी टिपू सुलतान याची जयंती साजरी केली जात आहे. टिपू सुलतान हा धर्मनिरपेक्ष होता, असे जे म्हणतात, त्यांनी मैसूरू येथे जाऊन त्याची तलवार पहावी आणि त्या तलवारीच्या खाली उर्दू भाषेत लिहिलेल्या लिखाणाचा अनुवाद करावा, म्हणजे त्याने किती हिंदूंची हत्या केली, ते कळेल. त्यानंतर तो धर्मनिरपेक्ष होता कि सैतान होता, हे कळेल. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांची वीरभूमी आहे. ही टिपू सुलतान याच्यासारख्या सैतानाची भूमी नाही. या सैतानाची जयंती जळगावमध्ये साजरी होऊ देऊ नका, असे आवाहन तेलंगणाचे आमदार टी. राजासिंह यांनी सभेत केले.

आमदार टी. राजासिंह पुढे म्हणाले की,

१. जातीवादाचे राजकारण करणे सोडा. तुम्ही किती दिवस राज्य करणार ? तुम्ही किती दिवस आमदार किंवा खासदार रहाणार आहात ? उद्या परमात्मा तुम्हाला बोलावेल, तेव्हा तुम्हाला तुमच्या कार्याचा आलेख त्याच्यापुढे मांडावा लागेल. त्यामुळे असे धर्मकार्य करा की, लोक तुम्हाला स्मरणात ठेवतील.

२. हिंदूंनी त्यांचे सण कसे साजरे करायचे, हे न्यायालय ठरवते. हिंदू काही बोलणार नाहीत; कारण ते पक्ष, जाती यांमध्ये विखुरलेले आहेत, हे त्यांना ठाऊक आहे. मी सर्वोच्च न्यायालयाला सांगू इच्छितो की, कधी रमजानविषयी विचारविनिमय करून पहा. केवळ हिंदूंच्या प्रथा-परंपरा यांवर बंदी, हे मोठे षड्यंत्र आहे.

३. मी कोणत्या धर्माचा विरोधक नाही; मात्र आमच्या धर्माला कुणी संपवण्याची भाषा करत असेल, तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देऊ.

४. भगवंत प्रत्येकाच्या भाग्यात धर्मकार्य लिहीत नाही. अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना आणि धर्मरक्षणाचे कार्य करणारे भाग्यवान आहेत. आपल्याला देश आणि धर्म यांसाठी कार्य करत पुढे जायचे आहे.

५. आज हिंदु समाज जागृत झाला नाही, तर केरळमध्ये ज्या पद्धतीने हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या, ती स्थिती इथेही निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. जिवंत रहायचे असेल, तर तुम्हाला लढायलाच हवे. हिंदूंमध्ये एकतेची भावना निर्माण झाली नाही, तर येणार्‍या काळात हिंदू मारला जाईल. यासाठी संघटित रहाण्याची आवश्यकता आहे. जर तुम्ही धर्माचे रक्षण केलेत, तर धर्म तुमचे रक्षण करेल.

भगवंताच्या अधिष्ठानाचा प्रत्यय घेतल्यास हिंदु राष्ट्र स्थापनेचा मार्ग सुलभ होईल !

सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा हिंदुत्वनिष्ठांना संदेश

आज हिंदू संघटित नाहीत, चोहोबाजूंनी हिंदु धर्मावर आघात होत आहेत. बहुतांश राज्यकर्ते निधर्मी आहेत. त्यांना हिंदु धर्माशी काहीही देणे-घेणे नाही आणि जे स्वत:ला हिंदुत्वनिष्ठ पक्षाचे म्हणवतात, ते स्वत: धर्माचरण करत नाहीत. सर्व बाजूंनी हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांची विदारक स्थिती असतांना वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना कशी होईल ?, असा प्रश्‍न जळगाव येथील सभेचा प्रचार करतांना काहींनी आम्हाला विचारला. अन्यत्रच्या हिंदु बांधवांच्या मनातही असा प्रश्‍न येऊ शकतो; मात्र हिंदूंनी आपल्या महान इतिहासावर कटाक्ष टाकल्यास त्यांना त्याचे उत्तर मिळू शकेल. तीनही लोकांत हाहाकार माजवणार्‍या आणि देवतांनाही कारागृहात टाकणार्‍या रावणाचा वानर सेनेने पराभव करणे, भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण यांसारख्या रथी-महारथींना पांडवांनी धूळ चारणे आणि शिवछत्रपती यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य यांमागील भगवंताचे अधिष्ठान हे सर्वच आपण जाणतो. यावरून सांप्रतकाळ कितीही प्रतिकूल असला, तरी हिंदु राष्ट्राची स्थापना हे त्रिकालबाधित सत्य आहे. जेथे सृष्टीची निर्मिती भगवंताच्या संकल्पाने होऊ शकते, तेथे हिंदु राष्ट्राची स्थापना करायला भगवंताला अशक्य नाही, याची निश्‍चिती हिंदूंनी बाळगावी.

हिंदु राष्ट्र-जागृती सभेतून आम्ही याची अनुभूती घेतली. सभेच्या प्रचारासाठी मिळालेल्या अल्प कालावधीमध्ये सर्व सेवा धर्मप्रेमींनी झोकून देऊन केल्या. धर्मप्रेमींच्या या सहभागामुळेच ही सभा यशस्वी झाली. सभेच्या यशस्वीतेमागील हे दर्शनी कारण असले, तरी यामागील ईश्‍वराचे अधिष्ठान सर्व धर्मप्रेमींनी लक्षात घ्यावे. ‘आपण केले’ या कोषात न अडकता जळगाव येथील सभा यशस्वी करण्यामागील ईश्‍वरी शक्तीचा सर्वांनी अनुभव घ्यावा. त्यातूनच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा मार्ग सर्वांना सुस्पष्ट आणि सुलभ होईल. जे धर्मप्रेमी ईश्‍वराच्या या अधिष्ठानाचा अनुभव घेण्यास अल्प पडले असतील आणि ज्यांनी हा अनुभव घेतला, या सर्वांनीच स्वत:ची साधना इतकी वाढवूया की, हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत वेळोवेळी आपणाला भगवंताच्या लीलेचा अनुभव घेता येईल. साधनेमुळे हिंदु राष्ट्र स्थापनेचा मार्ग सुलभ होईल !

असा झाला शहरात विविधांगी प्रसार

१ सहस्र रिक्शांवर लावली सभेची भित्तीपत्रके

जळगाव जिल्ह्यातील एकूण १ सहस्र रिक्शांवर सभेची भित्तीपत्रके लावण्यात आली, तर संपूर्ण जिल्ह्यात २२ सहस्र हस्तपत्रकांचे वितरण करण्यात आले. एकूण २५० गावांमध्ये सभेचा प्रचार करण्यात आला. ग्रामीण भागांत १०० हून अधिक, तर शहरी भागांत ६५ बैठका घेऊन सभेचा प्रचार करण्यात आला.

व्यायामशाळा

शहरामध्ये मेस व्यायामशाळा, छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळा, महानगरपालिकेची व्यायामशाळा अशा एकूण १२ व्यायामशाळांमध्ये सभेचा विषय सांगण्यात आला.

धार्मिक कार्यक्रम

कीर्तन, भागवत सप्ताह आणि मंदिरांतील सामूहिक आरत्या अशा विविध धार्मिक कार्यक्रमांच्या ठिकाणी सभेचा विषय सांगण्यात आला. असे एकूण १५ कार्यक्रम झाले.

महाविद्यालयांची वसतीगृहे आणि खानावळ

शहरातील काही महाविद्यालयांची वसतीगृहे आणि त्या ठिकाणी असलेल्या खानावळी या ठिकाणी जाऊन गटागटांनुसार विद्यार्थ्यांना सभेचा विषय सांगण्यात आला. येथील ‘एम्.जे. कॉलेज’च्या वसतीगृहात २ घंट्यांमध्ये गटागटाने अनुमाने ५२५ विद्यार्थ्यांना सभेचा विषय सांगण्यात आला.

शिकवणीवर्ग

शहरातील ६ शिकवणीवर्गांतील विद्यार्थ्यांना सभेविषयी सांगण्यात आले.

वसाहतींमध्ये बैठका

शहरात रामानंद, महाबळ, लक्ष्मीनगर, सम्राट कॉलनी, संत गाडगेबाबानगर, मेहरूण, कांचननगर या विभागांतील युवकांनी बैठकीचे आयोजन केले आणि स्वत:हून प्रचार केला. भुसावळ शहरामध्ये ११ बैठका घेण्यात आल्या. या सर्व बैठकांचे आयोजन तेथील धर्मप्रेमी युवकांनी केले आणि सभेचा प्रचारही केला. अशा प्रकारे शहरात एकूण ६५ बैठका झाल्या.

प्रसिद्धीफलक – सर्वांचे लक्ष वेधून सभेचे निमंत्रण देणारा धर्मप्रचारक !

जळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे निमंत्रण देण्यासाठी शहरात ठिकठिकाणी लिहिण्यात आलेले फलक हे सर्वांचे आकर्षण ठरले. फलक लिहिण्याची सेवा श्री. गजानन तांबट आणि श्री. नीलेश तांबट यांनी केली. फलक लिहितांना त्यांना आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव आणि त्यांनी भावाच्या स्तरावर केलेले प्रयत्न…

१. फलक वाचून भाजीविक्रेत्याने वितरण करण्यासाठी पत्रके मागून घेणे  : येथील शनिवारच्या आठवडा बाजारामध्ये लिहिलेला सभेच्या निमंत्रणाचा फलक वाचून एका भाजीविक्रेत्याने स्वत:हून सभेची पत्रके वितरणासाठी मागून घेतली आणि त्यांनी ती स्वत: वितरीत केली.

२. रात्रीच्या वेळेत फलक लिहितांना अनोळखी दुचाकीस्वाराने १ घंटा थांबून गाडीच्या दिव्याचा प्रकाश देणे : येथील बसस्थानक हे गर्दीचे ठिकाण असल्यामुळेे रात्रीच्या वेळेत हा फलक लिहिण्याची सेवा चालू होती. येथील फलक ६ बाय ४ इतका मोठा असून उंचावर असल्यामुळे लिहितांना पुष्कळ कष्ट घ्यावे लागत होते. हे त्या मार्गाने जात असलेल्या एका व्यक्तीने पाहिले आणि त्याने गाडी थांबवून १ घंटा दुचाकीचा दिवा लावून फलक लिहिण्यासाठी प्रकाश दिला. दुचाकीस्वाराने ‘रात्री अजून कुठे फलक लिहिणार असाल, तर मी थांबून गाडीच्या दिव्याचा उजेड दाखवतो’, असे स्वत:हून सांगितले.

३. अनेकांनी फलकासमवेत स्वत:ची छायाचित्रे काढणे : हे फलक अतिशय आकर्षक होते. त्यामुळे अनेकजण त्या फलकांसमवेत स्वत:चे किंवा गटागटाने छायाचित्र काढत होते.

 प्रार्थना आणि जागेची शुद्धी करून फलक लिहिणे

ज्या ठिकाणी फलक लिहायचा आहे, त्या जागेची मी प्रथम गोमूत्राने शुद्धी करायचो. या वेळी ‘फलकाच्या आजूबाजूचे वातावरण सात्त्विक होऊ दे’, अशी प्रार्थना करत होतो. फलक लिहिण्यापूर्वी ‘हे गुरुदेवा, हा फलकसुद्धा साधक आहे. या फलकाच्या माध्यमातून धर्माचा प्रचार होऊ दे. ज्यांची ज्यांची या फलकाकडे दृष्टी जाईल, त्या प्रत्येकाला हिंदु राष्ट्र-जागृती सभेला येण्याची प्रेरणा मिळू दे’, अशी प्रार्थना करायचो.

– श्री. गजानन तांबट, जळगाव

सभेच्या प्रचारासाठी शहरातील स्वत:च्या विज्ञापनाच्या जागा विनामूल्य उपलब्ध करून देणारे कीर्तीकांत चोबे !

सभेच्या प्रचारासाठी जळगाव शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले बॅनर पाहून श्री. कीर्तीकांत चोबे यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना स्वत:हून संपर्क केला आणि त्यांच्या शहरातील विज्ञापनांच्या जागा समितीचे फलक लावण्यासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिल्या. यामध्ये त्यांनी २० बाय ४०, ३० बाय ५०, २० बाय २० अशा मोठ्या फलकांच्या १० जागा दिल्या. या वेळी त्यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य आवश्यक असल्याचे सांगून या कार्यासाठी वर्षभरात केव्हाही या जागा लागल्यास देईन’, असे स्वत:हून सांगितले.

सभेतील काही निवडक क्षणचित्रे…

 • वक्त्यांचे ढोल-पथकाच्या गजरात मैदानात आगमन झाले, त्या वेळी त्यांच्या मागे सहस्रावधी युवकांनी मैदानात प्रवेश केला.
 • सभेला उपस्थित धर्मप्रेमींमध्ये ८० टक्क्यांहून अधिक युवकांचा समावेश होता.
 • अन्यत्रच्या सभांमध्ये घोषणा देतांना महिलांचा सहभाग न्यून असतो. या सभेला मात्र सर्व वयोगटातील महिलांनी पुरुषांप्रमाणेच उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.
 • मैदानात उपस्थित धर्मप्रेमींनी मोठ्या काठ्यांना लावून २० ते २५ भगवे ध्वज आणले होते. भाषण संपेपर्यंत अधूनमधून धर्मपे्रमी युवक हे ध्वज फडकवत होते.
 • आमदार टी. राजासिंह यांचे भाषण चालू असतांना धर्मप्रेमी युवकांनी मैदानात मानवी मनोरे रचून भगवे ध्वज फडकवले.
 • सभेनंतर वक्त्यांसमवेत झालेल्या बैठकीसाठी ३०० हून अधिक धर्मप्रेमी थांबले होते.

सभेसाठी पोलिसांकडून सकारात्मक प्रतिसाद

 • सुरक्षेच्या दृष्टीने सभेपूर्वी व्यासपिठासह संपूर्ण सभास्थळाची पोलिसांनी श्‍वानपथकासह पाहणी केली.
 • प्रारंभी मैदानात येणार्‍या प्रत्येकाची पोलीस वैयक्तिक पडताळणी करत होते; मात्र नंतर लोंढ्याने लोक यायला लागल्यावर पोलिसांना ते करणे अशक्य झाले.
 • काही पोलीस भाषणे जिज्ञासेने आणि एकाग्रतेने ऐकत होते.
 • सभेच्या शेवटी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेण्यात आली, तेव्हा व्यासपिठाच्या जवळ संरक्षणासाठी असलेल्या एका पोलिसानेही शपथ घेतली.
 • काही पोलिसांनी ग्रंथ आणि उत्पादने विकत घेतली.

‘महान भारतीय संस्कृती’ या बालकक्षामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्या बालसाधकांनी केलेल्या वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.

सभेला मिळाली व्यापक प्रसिद्धी…!


Multi Language |Offline reading | PDF