भाजप सरकारने विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

कुंभमेळा प्रयागराज २०१९

विस्थापित काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांचे भीषण सत्य मांडणार्‍या प्रदर्शनाचे कुंभक्षेत्री उद्घाटन

व्यासपिठावर डावीकडून स्वामी अखंडानंद महाराज, प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज, दंडीस्वामी लवकूश महाराज आणि दंडीस्वामी प्रणवानंदजी महाराज आणि मार्गदर्शन करतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

प्रयागराज – काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंचे विस्थापन हे पूर किंवा भूकंप यांमुळे नव्हे, तर जिहादी युद्धामुळे झाले आहे. तरीही एकही राजकीय पक्ष याविषयी बोलायला सिद्ध नाही. भाजप सरकारने विस्थापित काश्मिरी हिंदूंना पूर्ण संरक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले.

प्रयागराज येथे कुंभक्षेत्री विस्थापित काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांचे भीषण सत्य मांडणार्‍या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर ‘स्वामी करपात्री फाऊंडेशन’चे प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज, दंडीस्वामी प्रणवानंदजी महाराज, ‘संत मंडळा’चे नरेशजी आणि ‘अखंड महायोगा’चे स्वामी अखंडानंद महाराज उपस्थित होते.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे पुढे म्हणाले, ‘‘तत्कालीन काँग्रेस सरकारने १० लाख रुपयांचे प्रलोभन दाखवून काश्मिरी हिंदूंना पुनर्वसनाचे स्वप्न दाखवले; परंतु त्यात संरक्षणाची कोणतीच तरतूद नव्हती. भाजप सरकारनेही ४० लाख रुपयांचे ‘पॅकेज’ देण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात काश्मिरी हिंदूंचे विस्थापन हे असुरक्षित वातावरणामुळे झाले होते. आता भाजप सरकार काश्मीर खोर्‍यात हिंदु आणि मुसलमान यांना एकत्रितपणे वसवण्याचे धोरण अवलंबत आहे. तथापि सरकारने हिंदूंच्या संरक्षणाची कुठलीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे पुढील ५ वर्षांत काश्मीर ‘स्मार्ट सिटी’नव्हे, तर ‘हिंदु विरहित सिटी’ होईल; म्हणूनच हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी आहे की, काश्मिरी हिंदूंना संपूर्ण संरक्षण देऊन त्यांचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करावे.’’

चित्रप्रदर्शन पहातांना संत, महंत आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते

शिरच नसेल, तर मनुष्य जिवंत नाही रहाणार ! – प.पू. (डॉ.) गुणप्रकाश चैतन्यजी महाराज

प.पू. (डॉ.) गुणप्रकाश चैतन्यजी महाराज म्हणाले, ‘‘काश्मीर हे भारताचे शिर आहे. जर शिरच नसेल, तर मनुष्य जिवंत नाही रहाणार. काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे. आम्ही ते कदापि दुभंगू देणार नाही.’’ या कार्यक्रमाच्या आरंभी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.

छायाचित्र प्रदर्शनाचे ठिकाण आणि वेळ

स्थळ : भूमा निकेतन पिठाधीश्वर पंडाल, शास्त्री पूलाच्या खाली, संगम लोअर मार्ग, सेक्टर १५ , प्रयागराज.

वेळ : सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत

संपर्क क्र. : ९३२४८६८९०६


Multi Language |Offline reading | PDF