धर्मशिक्षणवर्ग आणि स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग यांतून हिंदु राष्ट्रासाठी धर्मवीर मिळतील, या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पाची अनुभूती देणारी जळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

श्री. प्रशांत जुवेकर

जळगाव येथे प्रतिवर्षी होणारी हिंदु राष्ट्र-जागृती सभा ही देशभरातील हिंदूंसाठी उत्साहदायी असते. सभेचा प्रचार-प्रसार आणि आयोजन या सेवांमध्ये विविध जिल्ह्यांतील समितीचे कार्यकर्ते, सनातनचे साधक सहभागी होतात. या वर्षी मात्र अनेक जिल्ह्यांत एकाच वेळी सभांचे आयोजन असल्याने, तसेच अनेक साधक आणि कार्यकर्ते प्रयागराज येथील कुंभमेळ्याच्या सेवांमध्ये सहभागी असल्याने अन्य जिल्ह्यांतून मिळणारे साहाय्य मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळात प्रचंड व्याप्ती असणार्‍या सभेच्या सेवांचे नियोजन करायचे, हे आव्हानच आमच्यापुढे  होते; पण धर्मशिक्षणवर्ग आणि स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग यांच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या धर्मप्रेमींनी सभेच्या अनेक सेवांचे दायित्व उत्साहाने स्वीकारले. भगवंताचा कृपाशीर्वाद आणि धर्मप्रेमींचे साहाय्य यांमुळे येथील सभेचे शिवधनुष्य जळगावचे साधक अन् समितीचे कार्यकर्ते पेलवू शकले. ‘धर्मशिक्षण’ आणि ‘स्वरक्षण प्रशिक्षण’ वर्गांतून हिंदु राष्ट्रनिर्मितीचे धर्मवीर मिळतील’, या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पाची प्रत्यक्ष अनुभूती या सभेत आम्हाला घेता आली. ही अनुभूती दिल्याविषयी परात्पर गुरुमाऊलींच्या चरणी ही कृतज्ञतापुष्पे अर्पण करीत आहोत.

श्री. प्रशांत जुवेकर, जळगाव जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

वर्ष २०१७ मधील सभेनंतर चालू झालेल्या प्रशिक्षणवर्गांतील युवकांचा प्रसारात सहभाग !

१९ नोव्हेंबर २०१७ या दिवशी येथे झालेल्या सभेनंतर काही ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग, स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू झाले. जे धर्मप्रेमी समितीच्या संपर्कात आले, त्यांच्यात हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्याची स्फूर्ती भगवंतानेच या वर्गांच्या माध्यमातून निर्माण केली.

सभेची पोस्ट पाहून प्रशिक्षणवर्गातील युवकांनी दायित्व घेऊन प्रचार करणे

या वर्गांना येणारी ६-७ मुले सातत्याने समितीच्या संपर्कात रहायची. यातील काही वर्गांचे नंतर बैठकीत रूपांतर केले, तर काही ठिकाणच्या धर्मप्रेमींना काही अडचणी आल्याने मधल्या काळात त्यांना संपर्कात रहाता आले नाही. १३ जानेवारी २०१९ च्या सभेची पहिली ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाल्यावर या धर्मप्रेमींनी स्वतःहून संपर्क करून सेवांचे दायित्व घेतले. त्यांच्या सेवांचा आढावा मांडल्यास भगवंताची महती कुणालाही लक्षात येईल. या धर्मप्रेमींनी सेवांचा वेळोवेळी आढावाही दिला.

धर्मप्रेमींनी केलेली प्रसाराची ध्येयनिश्‍चिती !

प्रशिक्षणवर्गातील युवकांच्या बैठकीत प्रसारासाठी किती गावांचे दायित्व घेणार, किती जण सेवांमध्ये सहभागी होणार, त्यांची नावे आणि ते देऊ शकतील असा वेळ, ‘बॅनर’, पत्रक, भित्तीपत्रक यांची आवश्यक संख्या आणि त्यांचे नियोजन, स्वत:च्या भागातून कितीजण सभेला येतील, असे लेखी नियोजन करून प्रसाराचे ध्येय निश्‍चित करण्यात आले.

प्रशिक्षणवर्गांतील युवकांच्या बैठकीत सभेच्या प्रचारकार्यात सहभागी होण्याचे आवाहन !

काही काळ मध्ये संपर्कात नसलेल्या, वर्गात नव्याने जोडलेल्या धर्मप्रेमींचा उत्साह आम्हा सर्वांचाच उत्साह वाढवणारा होता. भगवंताने सुचवल्याप्रमाणे सर्व वर्गांच्या माध्यमातून जोडले गेलेल्या अथवा काही वर्षांपूर्वी जेथे वर्ग घेतले होते, तेथील संपर्कात असलेल्या धर्मप्रेमींच्या एकत्रित बैठकीचे आयोजन जळगाव सेवाकेंद्रात करण्यात आले. या वेळी सभेच्या प्रसारामध्ये सहभागी होण्याचे सर्वांना आवाहन करण्यात आले. सर्वांनी ते आवाहन स्वीकारले. बैठकीला जळगावातील ७ तालुक्यांतील ५० धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

धर्मशिक्षणवर्ग बंद पडूनही त्यातील युवकांमध्ये धर्मकार्याचे बीज कायम राहिले !

प्रसारामध्ये काळानुसार जे उपक्रम परात्पर गुरुमाऊलींच्या संकल्पाने चालू आहेत, त्यांचा समाजावर परिणाम होतोच ! जळगाव येथेही खेडी, सम्राट कॉलनी येथे धर्मशिक्षणवर्ग बंद पडून जवळपास ६-७ मास होऊन गेले होते. तरीही या वर्गांमध्ये येणार्‍या, तसेच येऊन गेलेल्या धर्मप्रेमींनी सभेसाठी पुढाकार घेतला. अधिकाधिक वेळ देऊन तसेच विविध सेवांचे दायित्व घेऊन ते सभेच्या सेवेत सहभागी झाले. गुरुमाऊलीच्या संकल्पामुळे त्यांच्यात हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याचे बीज पेरले गेले होते, याची अनुभूती यातून घेता आली.

या वर्षी प्रतिवर्षीपेक्षा मनुष्यबळ अत्यल्प असतांना धर्मप्रेमींच्यात पुढाकारामुळे सर्वांनाच सभेचा आनंद पुष्कळ घेता आला. गुरुमाऊलींच्या संकल्पशक्तीवरील श्रद्धा द्विगुणीत झाली. या अपार कृपेविषयी गुरुमाऊलींच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत !

प्रशिक्षणवर्गातील युवकांचा सभेच्या प्रचारकार्यात सहभाग

१. धर्मप्रेमींनी १०० हून अधिक गावांमध्ये जाऊन गावकर्‍यांना सभेचे निमंत्रण दिले. गावकर्‍यांना सभेला येण्याचे नियोजनही त्यांनी करून दिले. या गावांमध्ये समितीचे कार्य आणि हिंदु राष्ट्राचे बीज त्यांच्या माध्यमातून भगवंताने पेरून घेतले.

२. धर्मप्रेमींनी मोठे फलक (होर्डिंग) आणि लहान ‘बॅनर’ लावण्यासाठी प्रायोजक मिळवले. स्वतः नियोजन करून ते लावून घेतले. भित्तीपत्रके लावण्याचे नियोजन व्यापक स्वरूपात केले. त्यामुळे या वर्षी प्रथमच जळगाव येथील सभेचा प्रसार ७-८ तालुक्यांतील गावांपर्यंत पोहोचला आणि सभेलाही या सर्व तालुक्यांतून धर्मप्रेमी येऊ शकले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now