भारतीय रस्त्यांची ‘सरकारी’ अनास्था !

एकीकडे चीनसारखा देश काही घंट्यांत बहुमजली इमारती उठवण्याचे प्रात्यक्षिक घडवून जगाला चकित करत असतांना भारतात भूमिपूजनानंतर २१ वर्षांनी सामरिक आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या पुलाचे उद्घाटन व्हावे, हा दोन्ही देशांमधील कार्यसंस्कृतीमधील भेद आहे.

आसाममधील दिब्रुगड आणि अरुणाचल प्रदेशातील पासीघाट यांना जोडणारा ‘बोगिबिल’ पूल भारतातील सर्वांत मोठा बहुमजली पूल !

१. बोगिबिल पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात तब्बल २१ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी !

‘राज्यकर्ते, समाज आणि नोकरशाही या सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवले, तर लोकशाहीतही वेगाने निर्णय होऊ शकतात. ते कृतीतही येऊ शकते. ‘अमेरिका श्रीमंत आहे म्हणून येथील रस्ते चांगले नाहीत, तर अमेरिकेतील रस्ते चांगले आहेत, म्हणून अमेरिका श्रीमंत आहे’, हे अमेरिकेचे दिवंगत अध्यक्ष जॉन एफ्. केनेडी यांचे वाक्य अनेकांना पाठ असते; मात्र संपूर्ण देश उत्तम रस्त्यांनी, रेल्वेमार्गांनी आणि जलमार्गांनीही वर्षभर जोडलेला असणे आवश्यक आहे, याचे गांभीर्य आता कुठे लक्षात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेला आसाम आणि अरुणाचल प्रदेश या ईशान्येतील २ महत्त्वाच्या राज्यांना जोडणारा ब्रह्मपुत्रा नदीवरील पूल दुमजली आहे. हा ‘बोगिबिल पूल’ रेल्वे आणि वाहने या दोन्हींसाठी आहे. तो जवळपास ५ किलोमीटर लांबीचा असला, तरी त्यामुळे रस्त्याचे १७० किलोमीटर, तर रेल्वेचे तब्बल ७०५ किलोमीटर अंतर न्यून होणार आहे. हा सगळा भाग चीनच्या सीमेजवळचा असल्याने या पुलाचे सामरिक महत्त्व वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. तरीही इतक्या राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पात कशी दिरंगाई होते, हे पहाण्यासारखे आहे. प्रत्यक्ष कामाला आरंभ झाला, तो अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतांना वर्ष २००२ मध्ये ! हे काम चालू झाल्यानंतर वर्ष २००४ मध्ये एन्डीए सरकार गेले. त्यानंतर पुन्हा या कामाची ससेहोलपट चालू झाली. ती आता संपली.

२. देशाला स्वतंत्र होऊन ७० वर्षे उलटली, तरी ईशान्य भारताची अत्यंतिक दु:स्थिती !

यापूर्वी ब्रह्मपुत्रेवरच्या दुसर्‍या पुलाचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले होते. तसेच आसाम आणि मेघालय यांना जोडणार्‍या १९ किलोमीटर लांब पुलाचे काम चालू होत आहे. ही सगळी कामे केवळ ईशान्य भारत सामरिकदृष्ट्या विशेष आहे, म्हणून मोलाची नाहीत. या आठही राज्यांची भौगोलिक स्थिती आव्हानात्मक आहे. ब्रह्मपुत्रेसारखी महाकाय नदी अनेकदा पात्र पालटते. अशा स्थितीत या सार्‍या प्रतिकूलतेवर मात केल्याशिवाय ईशान्येच्या विकासाला जशी चालना मिळणार नाही, तसेच तेथील साडेचार कोटी जनसंख्येचे जीवनही खर्‍या अर्थाने समाधानी होणार नाही; मात्र ही केवळ ईशान्येची आवश्यकता नाही. अगदी महाराष्ट्रातही चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील अनेक नद्या पावसाळ्यात रोरावू लागल्या की, अनेक रस्ते अन् पूल पाण्याखाली जातात. संपर्क तुटतो. जनजीवन स्तब्ध होते. स्वातंत्र्य मिळून ७ दशके उलटली, तरी देशाला वाहतुकीच्या उत्कृष्ट मार्गांनी जोडला गेल्याचे उद्दिष्ट साध्य झालेले नाही. गुवाहाटी, आगरतळा आणि इटानगर ही ईशान्येतील ८ पैकी केवळ ३ राजधानीची शहरे आज रेल्वेमार्गाने जोडलेली आहेत. यावरून या आव्हानाची व्याप्ती लक्षात यावी.

३. वाजपेयी यांचे स्वप्न पूर्ण होईल का… ?

काही दिवसांपूर्वीच नीती आयोगाने एक शिफारस अहवाल सरकारला सादर केला. त्यात केवळ रस्ते आणि रेल्वेच नव्हे, तर जलवाहतुकीसाठी बंदरे सिद्ध करण्याचा वेगही वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आज देशात एक लाख ३० सहस्त्र किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. ही लांबी येत्या ५ वर्षांत २ लाख किलोमीटर व्हावी, असे लक्ष्य नीती आयोगाने सुचवले आहे. ते गाठायचे, तर प्रतिदिन ३९ किलोमीटर इतका नवा राष्ट्रीय महामार्ग बांधावा लागेल. ‘राष्ट्रीय महामार्ग’ असा भारदस्त शब्द आपण वापरत असलो, तरी देशातील केवळ २२ टक्के राष्ट्रीय महामार्ग चौपदरी आहेत. ५१ टक्के दुपदरी आहेत आणि इतर सर्व त्याहूनही अरुंद आहेत. निदान ९० टक्के राष्ट्रीय महामार्ग चौपदरी झाल्याशिवाय विकासाचे विकेंद्रीकरण होणार नाही. आरोग्य, शिक्षण, उद्योग आणि कृषी या सार्‍याच क्षेत्रांना अशा मार्गांचा लाभ होईल. आज रेल्वेमार्गाचे नवे जाळे प्रतिदिन केवळ ७ किलोमीटर या वेगाने रखडते आहे. नीती आयोगाला हा वेग प्रतिदिन १९ किलोमीटर हवा आहे. हा दुपटीहून अधिक वेग कसा वाढवायचा, हे केवळ रेल्वेखाते नव्हे, तर सरकारपुढचे आव्हान आहे. ब्रह्मपुत्रेवरचा नवा पूल पंतप्रधानांनी वाजपेयी यांच्या जयंतीला खुला केला; मात्र वाजपेयींचे ‘सारा भारत एकीकडे महामार्गांनी, तर दुसरीकडे बारमाही सडकांनी जोडण्या’चे स्वप्न अजूनही दूर आहे. ते लवकरात लवकर पूर्ण झाले, तरच कोट्यवधी भारतियांचे जीवनमान वेगाने सुधारण्यात यश येईल.’

संदर्भ : दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’ (२७ डिसेंबर २०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now