धनंजय देसाई यांना जामीन संमत करतांना हिंदु राष्ट्र सेनेच्या ‘बॅनर’खाली कार्यक्रमात सहभागी न होण्यासह अन्य अटी

श्री. धनंजय देसाई

मुंबई, १८ जानेवारी (वार्ता.) – हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक श्री. धनंजय देसाई यांना १७ जानेवारी या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने ५० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन संमत केला. जामीन संमत झाला, तरी कायदेशीर गोष्टींची पूर्तता होऊ न शकल्याने अद्याप त्यांची सुटका होऊ शकलेली नाही. न्यायालयाने जामीन संमत करतांना श्री. देसाई यांना भाषणबंदी, हिंदु राष्ट्र सेनेच्या ‘बॅनर’खाली कार्यक्रम न घेणे, कोणत्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या व्यासपिठावर न जाणे आदी अटी घातल्या आहेत. २ दिवस न्यायालयाला सुट्टी असल्याने साधारणत: २२ जानेवारी या दिवशी कायदेशीर गोष्टींची पूर्तता होऊन त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे.

३१ मे २०१४ या दिवशी पुणे येथील मोहसीन शेख या युवकाने त्याच्या ‘फेसबूक पेज’वर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट अपलोड’ केल्या होत्या. यानंतर २ जून २०१४ या दिवशी संतप्त जमावाकडून मोहसीन शेख याची हत्या झाली होती. या प्रकरणी श्री. धनंजय देसाई यांच्यासह २१ जणांना अटक करण्यात आली होते. यांतील १६ जणांची यापूर्वी जामिनावर सुटका झाली आहे.

 


Multi Language |Offline reading | PDF