हिंदु राष्ट्र-जागृती सभा यशस्वी करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील हिंदु संघटना एकवटल्या !

बैठकीला उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

अमरावती, १७ जानेवारी (वार्ता.) – अमरावती शहरातील संत गाडगेबाबा मंदिरासमोरील मैदानावर २७ जानेवारी या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा केवळ हिंदु जनजागृती समितीची नसून जिल्ह्यातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांना सभेच्या आयोजनात सहभागी करून घेता यावे याकरिता १३ जानेवारीला श्री. दिलीपबाबू गणोरकर मठामध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये होर्डिंग, प्रसिद्धी, सामाजिक प्रसारमाध्यमे, पोस्टर, पत्रके, उद्घोषणा, मंदिरातील प्रसार अशा विविध माध्यमांतून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रसार करण्याचे नियोजन झाले आणि उपस्थित संघटनांनी त्यासाठी एकत्र येऊन कार्य करण्याचा निश्‍चय केला.

या बैठकीला जिल्ह्यातील प्रतिष्ठित उद्योजक आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. चंद्रशेखर जाजोदीया, नगरसेवक श्री. चंदुभाऊ बोंबरे, नगरसेवक श्री. प्रणित सोनी, श्रीराम सेनेचे विदर्भ अध्यक्ष प्रमेंद्र शर्मा, विदर्भ उपाध्यक्ष श्री. अनिल शुक्ला, विदर्भ सचिव श्री. वीरेंद्र उपाध्याय, जिल्हाध्यक्ष श्री. राजेश दुबे, जिल्हा सचिव श्री. नंदकिशोर दुबे, महानगर संयोजक श्री. विजय दुबे, गणोरकर मठाचे संयोजक श्री. जुगल ओझा, राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. मुकुल कापसे, ओजस्विनी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष कु. मृणाल पाटील, ओम शांती परिवाराचे ब्रह्मकुमार राजेशभाई, श्री. शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. महेश लढके, हिंदुराज संघटनेचे श्री. सुभाष मसतकर, हिंदु क्रांती सेनेचे विदर्भ अध्यक्ष श्री. राज गणेशकर यांसह विविध संघटनांचे एकूण ३२ प्रतिनिधी उपस्थित होते.

यामध्ये सर्वांनी सभेचे विविध दायित्व घेऊन त्याप्रमाणे कार्य करण्याचे ठरवले. बैठक झाल्यानंतर लगेचच श्री. ओझा यांनी जिल्हा ऑटो संघटनेला संपर्क करून देऊन शहरातील रिक्शांना सभेच्या निमंत्रणाचे फलक लावण्याचे नियोजन केले. श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी बैठकीनंतर दिवसभरात अन्य मान्यवरांच्या भेटी करून देऊन काही ठिकाणी सभेनिमित्त बैठकांचे आयोजन केले. श्री. गणेशकर यांनी सुचवल्याप्रमाणे दोघांनी दायित्व घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक मंदिरात प्रसादासमवेत भक्तांना सभेचे पत्रक आणि निमंत्रण देण्याचे नियोजन केले.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे यांना श्री. चंद्रशेखर जाजोदीया या वेळी म्हणाले, ‘‘तुमच्यासारखा धर्मकार्य करणारा मुलगा प्रत्येक आईला भेटो.’’ श्री. जाजोदीया यांनी ‘ही सभा आपल्या प्रत्येकाची असून आपण सर्वांनी यासाठी प्रयत्न करावा’, असे आवाहन या वेळी हिंदुत्वनिष्ठांना केले. या वेळी त्यांनी त्यांच्या एका भव्य कार्यक्रमाचे हिंदु जनजागृती समितीप्रमाणे उत्तम आयोजन होण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now