सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षक समायोजन प्रक्रिये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार ! – परशुराम उपरकर, मनसे

शिक्षण विभागातील एक महिला कर्मचारी सूत्रधार असल्याचा आरोप

कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यात माध्यमिक शाळा आणि उच्चमाध्यमिक (हायस्कूलमधील) शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. ज्यांनी कधीही अध्यापनासाठी शाळेची पायरी चढली नाही, अशांना नवीन शिक्षक म्हणून नियुक्त्या दिल्या आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाला हाताशी धरून अनेक शिक्षण संस्थांनी त्यांच्या शाळांतील वरिष्ठ शिक्षकांना अतिरिक्त ठरवत त्यांच्या जागी कनिष्ठ शिक्षकांना सेवेत कायम केले आहे, असा आरोप मनसेचे प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. (शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही असा भ्रष्टाचार होत असेल, तर देशाचे भवितव्य किती अंधारमय असेल, याचा विचारच न केलेला बरा !  – संपादक)

मनसेच्या येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपरकर बोलत होते.

या वेळी उपरकर यांनी केलेले आरोप…

१. विद्यार्थी पटसंख्येच्या निकषांमुळे अनेक माध्यमिक शाळांतील शिक्षक अतिरिक्त ठरले. यांचे अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये समायोजन करण्याचा निर्णय शासनाने घेतला; मात्र या समायोजन प्रक्रियेचा अनेक शैक्षणिक संस्थांनी अपलाभ उठवला आहे. जे कधी त्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत नव्हतेच, त्यांना वर्ष २०१२ पूर्वीपासून संस्थेत कार्यरत असल्याचे दाखवून त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या.

२. शिक्षक भरतीसाठी डी.एड्, अथवा बी.एड्. झालेल्यांनी नोंदणी केली आहे. रितसर विज्ञापन देऊन शिक्षक भरती करावी लागते; परंतु ११ जानेवारीला झालेल्या समायोजन प्रक्रियेत, अशी कोणतीही प्रक्रिया राबवली गेली नाही. एका दोडामार्ग तालुक्यातच असे ९ शिक्षक नियुक्त केले आहेत. इतर तालुक्यांतही असाच प्रकार झाला असण्याची शक्यता आहे.  शिक्षण विभागाकडील नोंदीनुसार जे शिक्षक अतिरिक्त ठरले त्यांना नोटीस बजावतांनाही गैरव्यवहार झाला आहे.

३. ज्यांचे स्थानांतर करण्याचे आदेश पूर्वी निघाले होते, त्या आदेशातील शिक्षकांची नावे आर्थिक तडजोड करून पालटण्यात आली. त्याचा फटका अनेक वरिष्ठ शिक्षकांना बसला असून ते अतिरिक्त ठरत आहेत.  या सर्व गैरव्यवहाराविषयी शिक्षण उपसंचालक आणि राज्याचे प्रधान सचिव यांच्याकडे आम्ही तक्रार केली आहे. यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना न्याय न मिळाल्यास मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.

घोटाळ्याचा सूत्रधार शिक्षण विभागातच

शिक्षण विभागातील एक महिला कर्मचारी गेली २० वर्षे एकाच ठिकाणी आणि एकाच पदावर (‘टेबलवर’) कार्यरत आहे. हीच महिला समायोजनाच्या माध्यमातून झालेल्या घोटाळ्याची सूत्रधार आहे. एखादा कर्मचारी २० वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत कसा राहू शकतो ? असा प्रश्‍न उपरकर यांनी या वेळी उपस्थित केला.


Multi Language |Offline reading | PDF