काशी येथे विकासाच्या नावाखाली शिवलिंगांना नाल्यात फेकणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची हिंदूंची एकमुखी मागणी !

आज हिंदूंवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलनां’च्या माध्यमांतून, तसेच निवेदने सादर करून सनदशीर मार्गाने आणि व्यापक स्वरूपात वाचा फोडली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर काशी येथे ‘काशी विश्‍वनाथ कॉरिडोर’ उभारण्याच्या नावाखाली काही कंत्राटदार आणि शासकीय अधिकारी मंदिरे पाडत आहेत. त्याचा ढिगारा नाल्यात फेकण्यात आला असून त्यात अनेक शिवलिंग असल्याचे समोर आले आहे. यातून कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना जागोजागी स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा जिल्हाधिकारी यांना या संदर्भात संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देत आहेत. सदर निवेदन येथे देत आहोत.

 

                                      दिनांक :

प्रती,

————-

विषय : काशी विश्‍वनाथ कॉरिडोर निर्माण करतांना अनेक शिवलिंग नाल्यामध्ये फेकणारे कंत्राटदार आणि संबंधित उत्तरदायी शासकीय अधिकारी यांवर कारवाई करण्याविषयी….

महोदय,

वाराणसी येथे काशी विश्‍वनाथ कॉरिडोर निर्माणकार्य चालू असून त्या निमित्ताने त्यामध्ये येणारी बांधकामे आणि मंदिरे पाडण्याचे काम चालू आहे. हे काम चालू असतांना तेथे निर्माण झालेला माती आणि बांधकाम मालाचा ढिगारा ‘असी नाल्या’जवळ फेकण्यात येत आहे. या ढिगार्‍यामध्ये स्थानिक शिवभक्त आणि नागरिक यांना अनेक शिवलिंग आढळून आली आहेत. काशी विश्‍वनाथाच्या नावाने चालू असलेल्या कामातच शिवलिंगांची अवहेलना होणे, हे अत्यंत वेदनादायी आहे. यामुळे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे प्रतिनिधी तथा ‘मंदिर बचाव अभियाना’चे प्रमुख स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद, शिवभक्त, समस्त हिंदु समाज आणि स्थानिक नागरिक यांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे ते प्रशासनावर प्रक्षुब्ध झाले आहेत.

तरी या अनुषंगाने लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहोत…

१. काशी विश्‍वनाथ कॉरिडोरचे काम करण्यासाठी जुन्या काशीतील, म्हणजेच पक्का महाल येथील १७५ घरांना तोडण्याचे काम चालू आहे. या भागातील अनेक घरांमध्ये छोटी-मोठी मंदिरे असून ती तोडल्यानंतर मातीचा ढिगारा ‘असी नाल्या’जवळ फेकण्यात आला. स्थानिक लोकांना त्या ढिगार्‍यात अनेक शिवलिंग असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी ते आपापल्या घरी नेण्यास प्रारंभ केला.

२. स्थानिक पोलिसांना वरील माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्या ढिगार्‍यातील १२६ शिवलिंग उचलून पोलीस ठाण्यात आणली. असे असले, तरी त्या ढिगार्‍यात अद्यापही अनेक शिवलिंग असल्याचे समजते.

३. स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांनी लंका पोलीस ठाण्याला प्रत्यक्ष भेट देऊन ठाण्याच्या प्रभार्‍यांना तात्काळ तक्रार नोंदवण्याविषयी सांगितले. या वेळी पोलिसांनी विविध कलमांतर्गत तक्रार नोंदवली आहे.

४. या घटनेपूर्वीही राज्याचा विकास करण्याच्या नावाखाली अथवा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करत नोंदणीकृत असलेल्या मंदिरांनाही अनधिकृत ठरवून पाडण्याचे काम अधूनमधून चालू असते. यातून हिंदूंंच्या भावना दुखावल्या जात आहेत.

तरी या संदर्भात आम्ही मागण्या करतो की,

१. ज्या कंत्राटदाराने मातीच्या ढिगार्‍यात शिवलिंग फेकले, त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

२. या प्रकरणी उत्तरदायी असणार्‍या शासकीय अधिकार्‍यांचीही चौकशी करावी, त्यात ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी.

३. ज्या घरांमधील मंदिरे तोडण्यात आली, त्यांना शासनाच्या खर्चातून नवीन मंदिरे बांधून तेथे शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात यावी.

                       आपला विश्‍वासू,

                 (येथे व्यक्ती अथवा संघटना यांचे नाव लिहावे.)

हिंदु धर्माभिमान्यांना आवाहन !

या निवेदनाची प्रत हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्माभिमानी हिंदू आपल्या शहरातील/गावातील लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकारी यांना देऊ शकतात. या निवेदनाची प्रत पुढील मार्गिकेवर उपलब्ध आहे – https://www.hindujagruti.org/hindi/hjs-activities/rashtriya-hindu-andolan


Multi Language |Offline reading | PDF