देशात मुंबईचा समुद्र सर्वाधिक प्रदूषित !

केंद्रीय संस्थांच्या अहवालातील निष्कर्ष

मुंबई – देशातील इतर किनारपट्ट्यांपैकी मुंबईच्या किनारपट्टीलगतच्या समुद्रात सर्वाधिक म्हणजे प्रतीचौरस किलोमीटर क्षेत्रात १३१.८५ किलो प्लास्टिक आढळून आले असल्याचे ‘केंद्रीय समुद्री मत्स्योद्योग संशोधन संस्थे’च्या (सीएम्एफ्आर्आय) अभ्यासात आढळले आहे. मिठी नदी आणि समुद्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा सर्वाधिक प्रदूषित झाल्याचे अन्य केंद्रीय संस्थांनी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पालिकेचे नियंत्रण नसल्याने ही स्थिती उद्भवल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

मिठी नदीच्या प्रवाहात श्रद्धानंद, लेलेवाडी, ओबेरॉय कृष्णनगर, जरमरी आणि वाकोला येथील नाले येऊन मिळतात. मिठीचे पात्र आणि नाल्यांलगत असणार्‍या वस्त्या अन् औद्योगिक संस्थांमधून मोठ्या प्रमाणात घनकचरा आणि सांडपाणी नदीत सोडले जाते. यांमुळे दिवसागणिक मिठीच्या प्रदूषणात भर पडत आहे. यावर उपाय म्हणून मिठीच्या पात्रालगत सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचे आणि पात्रात सोडले जाणारे सांडपाणी या केंद्रात वळवण्याचे काम पालिकेकडून करण्यात येत आहे.

प्रदूषित पाण्याविषयी ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने (सीपीसीबी) आखून दिलेल्या मर्यादेनुसार सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्रामधून समुद्र आणि नद्या यांमध्ये सोडल्या जाणार्‍या पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण ‘बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड’ (बीओडी) लिटरमागे १० एम्जी असावे. पाण्यातील परिसंस्थेसाठी ६ एम्जी बीओडी मर्यादेवरील आणि माणसांसाठी ३ एम्जी मर्यादेवरील पाणी हानीकारक आहे; मात्र ‘सीपीसीबी’ने घोषित केलेल्या अहवालानुसार गेल्या वर्षी मिठी नदीच्या प्रदूषणाची सर्वसाधारण पातळी लिटरमागे २५० एम्जी होती. ही पातळी प्रदूषणाच्या विहीत मर्यादेपेक्षा २५ पट अधिक होती.


Multi Language |Offline reading | PDF