पतंग आणि धोका !

नोंद

मकरसंक्रांतीच्या निमित्त उडवण्यात येणार्‍या पतंगांमुळे एकट्या जयपूर (राजस्थान) शहरात ३०० हून अधिक लोक गंभीर घायाळ झाले आहेत. महाराष्ट्रातील नागपूर येथेही १०० हून अधिक घायाळ झाले आहेत. या दुर्दैवी घटनांत गळ्यात मांजा अडकल्याने अपघात होणे, गळा कापणे आदी प्रकारांची नोंद झाली आहे. या प्रकरणी देशातील आकडेवारी लक्षवेधी असेल. या दिवशी देशात विशेषत: गुजरात आणि राजस्थान या राज्यांत वेळ काढून सामूहिक पद्धतीने पतंग उडवले जातात. अर्थात एकमेकांची पतंग कापण्याची ती एक स्पर्धा असते. या स्पर्धेशी दुरान्वयेही संबंध नसणारे असंख्य नागरिक पतंग उडवण्यासाठी बहुतांशपणे उपयोगात आणल्या जाणार्‍या चिनी, नायलॉन मांजा यांमुळे घायाळ होतात. प्रसंगी त्यांचा मृत्यूही होतो. आपल्या चुकीच्या कृतीचा नागरिकांना एवढा त्रास होतो, हे कळत असूनही केवळ मौजमजेपोटी ती घोडचूक पुन:पुन्हा केली जाते. याला अक्षम्य गुन्हाच का म्हणू नये ? क्षणिक सुखाच्या खेळासाठी जिवाचेही मोल न समजणार्‍या अशा बिनडोकांवर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ कठोर कारवाई केली पाहिजे. हे गंभीर असून या प्रकरणी कोणी न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने या दिवशी पतंग उडवण्यावरच बंदी घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढे हे प्रकरण संवेदनशील झाले आहे. आनंदाला दुर्घटनांचे कोंदण लावण्यात काय अर्थ आहे ? आनंद देऊ शकत नाही, तर निदान इतरांना त्रास होईल असे तरी करू नका !

दुसरे सूत्र असे की, पतंगाच्या मांजाचा वीजवाहक तारांना स्पर्श झाला किंवा तो तारांच्या विशिष्ट कक्षेत आला, तरी त्याद्वारे २ लाख २० सहस्र व्होल्टची वीज खेचली जाते. त्यामुळे दुर्घटना घडू शकते. हे सूत्र लक्षात घेता वीजवाहक तारांच्या जवळ पतंग उडवू नये, असे आवाहन अदानी वीज आस्थापनाने केले आहे. पतंग उडवणे जिवावर बेतणारे आहे, हे पतंग उडवणारे जाणतील का ? पतंगाच्या मांजामुळे अशीही दुर्घटना घडू शकते हे प्रथमच समाजासमोर आले आहे. या दुर्घटनेत क्षणार्धात व्यक्तीचा जागेवरच कोळसा होऊ शकतो. मुंबईमध्ये वीज वाहक तारांचे विस्तीर्ण जाळे आहे. या स्थितीमध्ये उडवण्यात येणारे पतंग म्हणजे धोका ठाऊक असूनही त्याच्या दारात चालत जाणे आहे, असे म्हणण्यास वाव आहे.

अपघात टाळण्यासाठी पावसाळ्यामध्ये रस्त्यावरचे खड्डे सांभाळून वाहने चालवावी लागतात. खड्डे दिसण्यात येतात; मात्र पतंगाचा मांजा दुचाकी चालकांना वाहन चालवतांना निदर्शनास येत नाही. त्यांच्यासाठी खड्डेही धोकादायक आणि मांजाही धोकादायकच. चिनी, नायलॉन मांजाच्या उपयोगावर राज्य सरकारने बंदी घातली आहे. त्यांचा उपयोग करणार्‍यांसह वाहनचालकांना धोका होईल, अशा प्रकारे पतंग उडवणार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे. पतंगबाजांवर कारवाई करण्यासाठी काय कृती करता येईल, हे पोलिसांनी ठरवून सणाचा आनंद जनतेला घेता येऊ द्यावा, ही अपेक्षा !

– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.


Multi Language |Offline reading | PDF