कुंभमेळ्याचे जिवंत शब्दचित्रण करणारे सदर : कुंभदर्शन

कुंभ मेळा प्रयागराज २०१९

हिंदु धर्मातील विविधता, विशालता, सर्वसमावेशकता, एकता आणि अखंडता यांचे सर्वांगसुंदर दर्शन घडवणार्‍या जगाच्या पाठीवर एकमेव असलेल्या ‘कुंभमेळ्या’च्या निमित्ताने ‘कुंभदर्शन’ या विशेष सदरास आरंभ करण्यात आला आहे. या सदराच्या माध्यमातून आमच्या वाचकांना प्रयागराजचे स्थलदर्शन, कुंभमेळ्यातील विविध आखाडे, त्यांची पेशवाई मिरवणूक (शोभायात्रा), संत-महंतांचे दर्शन, त्रिवेणी संगमावर भक्तीभावाने स्नान करण्यासाठी आलेल्या हिंदूंच्या तोंडवळ्यावरील उत्कट भाव, हिंदु धर्माची ख्याती ऐकून साता समुद्रापलीकडून येणार्‍या विदेशी लोकांचा सहभाग आदींचे छायाचित्रण अन् वैशिष्ट्यपूर्ण माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. यातून वाचकांना हिंदु धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व आणि साधना करणे का आवश्यक आहे, हे उमगेल. या सदरामुळे आपल्याला घरबसल्या भक्तीभावाचा किंचित्सा अनुभव अवश्य येईल. असे असले, तरी या कुंभमेळ्याच्या पवित्र काळात हिंदूंनी साधना करण्याचा संकल्प करावा; कारण आगामी आपत्काळात ही साधनाच आपल्याला तारणार आहे, हे निश्‍चित !

प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील पहिले राजयोगी (शाही) स्नान

विदेशी नागरिकांचा समूह स्नानासाठी जातांनाचे दृष्य
नागा साधूंची मिरवणूक

कुंभमेळ्याला प्रारंभी महानिर्वाणी आखाड्याचे राजयोगी स्नान झाल्यावर त्यानंतर क्रमाने निरंजनी आखाडा, आनंद आखाडा, जुना आखाडा, आवाहन आखाडा, श्री शंभू पंच अग्नि आखाडा स्नानासाठी आले. या शैव आखाड्यांचे स्नान झाल्यावर निर्मोही, निर्वाणी आणि दिगंबर या वैष्णव आखाड्यांचे स्नान झाले. त्यानंतर नया उदासिन, बडा उदासिन आणि निर्मल या उदासिन आखाड्यांनी स्नान केले. यात जुना आखाड्यात सर्वांत मोठ्या संख्येने नागा साधू आणि संन्यासी यांची उपस्थिती होती. स्नानासाठी येण्यास वैष्णव आखाड्यांना दोन घंटे विलंब झाला. त्यामुळे पुढील स्नान विलंबाने झाले.

संगमावर स्नानानंतर नामजप आणि पूजा करताना एक साधू

कुंभमेळ्यातील वैशिष्ट्ये

 • शरिराने अपंग तथा विकलांग झालेले साधूही राजयोगी स्नानासाठी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर जात होते.
 • त्रिवेणी संगमातील अत्यंत थंड पाणी आणि बाहेर पहाटे कडाक्याची थंडी असतांना साधू अन् भाविक उत्साहाने स्नान करत आनंदाने परतत होते.
 • विदेशी नागरिकांच्या मोठ्या समुहानेही आज कुंभमेळ्यात स्नान केले.
 • कुंभमेळ्यातील संत आणि भाविक यांच्यावर उत्तर प्रदेश सरकारकडून हॅलिकॉप्टरमधून १.३० घंट्याहून अधिक वेळ पुष्पवृष्टी करण्यात येत होती. त्यामुळे भाविक आणि संत यांचा उत्साह वाढला.
 • शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज आणि अन्य वयस्कर संत यांना त्यांच्या भक्तांनी उचलून नेऊन संगमावर स्नान घातले.
 • संगमावर स्नान झाल्यावर अनेक भाविक, साधू, संत यांनी पूजा, नामस्मरण, भजन करून अधिक चैतन्य मिळवण्याचा प्रयत्न केला.
 • कुंभमेळ्यात मोठ्या साधूंसह अगदी चार-पाच वर्षांच्या एका लहान साधू मुलानेही स्नान केले.
 • भाविकांसह कुंभमेळ्यात उत्तर प्रदेश पोलीस, राज्य राखीव दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या
 • ८० तुकड्या (एन्डीआर्एफ्), बॉम्बशोधक पथक, स्कॉऊट आदींचे काही सहस्रो जण सुरक्षेसाठी तैनात होते.
 • कुंभमेळ्यातील छायाचित्रे काढण्यासाठी विदेशातून ५० हून अधिक पत्रकार आलेले होते.
 • चांगली छायाचित्रे काढता यावी म्हणून देश-विदेशातील अनेक पत्रकारांनी नदीच्या थंड पात्रात काही घंटे सलग उभे राहून छायाचित्रे काढली.


Multi Language |Offline reading | PDF