ब्रिटीश संसदेत ‘ब्रेक्झिट’ कराराचा प्रस्ताव बहुमताने फेटाळला

पंतप्रधान थेरेसा मे यांचे पद धोक्यात

लंडन – इंग्लंड युरोपीयन युनियनमधून बाहेर पडण्याच्या संदर्भात इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये मांडलेला ‘ब्रेक्झिट करारा’चा (ब्रिटनने युरोपीयन महासंघातून बाहेर पडण्याच्या कराराचा) प्रस्ताव ४२३ विरुद्ध २०२ अशा बहुमताने फेटाळण्यात आला. हा करार संमत होण्यासाठी ३१८ मतांची आवश्यकता होती. तथापि एकूण ६५० खासदार असलेल्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’च्या सभागृहात या प्रस्तावाच्या विरोधात ४२३ खासदारांनी, तर त्याच्या बाजूने २०२ खासदारांनी मतदान केले. विशेष म्हणजे थेरेसा मे यांच्याच कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या ११८ खासदारांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान करत मे यांना धक्का दिला. यामुळे ब्रेक्झिटचा प्रश्‍न आणखी चिघळला आहे.

या दारूण पराभवानंतर पंतप्रधान थेरेसा मे यांच्यावर अविश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची नामुष्की ओढवणार असून त्यांचे पदही धोक्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी ब्रुसेल्स येथे आयोजित केलेल्या परिषदेत युरोपियन महासंघाच्या नेत्यांनी ‘ब्रेक्झिट’ला संमती दिली. महासंघाच्या मान्यतेनंतर या कराराला ब्रिटनच्या संसदेची संमती घेणे अनिवार्य होते. ब्रिटन संसदेत ब्रेक्झिट करार संमत होण्यासाठी ३१८ मतांची आवश्यकता होती; परंतु केवळ २०२ खासदारांनीच या कराराच्या बाजूने मतदान केले. २९ मार्च २०१९ या दिवशी ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडणार असल्याचे निश्‍चित झाले होते; परंतु आता या मतदानामुळे ब्रिटनमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now