सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि एस्.एस्.आर्.एफ्.चे संत यांच्या सत्संगाच्या वेळी अतिथी कक्षातील, तसेच बाहेरील मार्गिकेतील लाद्यांमध्ये झालेले पालट अन् ‘अतिथी कक्ष निर्गुणाकडे जात आहे’, हे दर्शवणार्‍या अनुभूती

‘३.१.२०१९ च्या रात्री रामनाथी आश्रमातील अतिथी कक्षात (या कक्षात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ सेवा करतात.) सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि एस्.एस्.आर.एफ्.चे संत यांचा सत्संग चालू होता. अकस्मात रात्री २.३० वाजता खोलीतील, तसेच बाहेरच्या मार्गिकेतील राखाडी रंगाच्या ‘कोटा’ (लादीचा एक प्रकार) लाद्यांवर गुलाबी रंगाची छटा आल्याचे उपस्थित संतांना लक्षात आले. त्या वेळी सर्वांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. लाद्यांवर गुलाबी छटा येणे

१ अ. लाद्यांवर गुलाबी छटा दिसून सद्गुरु बिंदाताईंच्या भोवती गुलाबी रंगाची प्रभावळ दिसणे

१. ‘रात्री २.३० वाजता मी खोलीतून बाहेर पाहिले, तेव्हा मला ‘आकाशात सूर्यास्ताच्या वेळी जसा लालसर रंग पसरतो, त्या रंगाची छटा खोलीतील लाद्यांवर पडली आहे’, असे दिसले.

२. सद्गुरु बिंदाताईंशी बोलतांना मला त्यांच्याभोवती गुलाबी रंगाची प्रभावळ दिसत होती. ‘प्रीती’ हा स्थायी भाव असलेल्या सद्गुरु बिंदाताईंच्या चरणी वंदन !

३. ४.१.२०१९ या दिवशी मला खोलीतील लाद्यांवर आलेली गुलाबी रंगाची छटा न्यून होऊन पांढरी आणि निळसर छटा आल्याचे जाणवले.’

– (पू.) सौ. भावना शिंदे

१ आ. गुलाबी झालेल्या लाद्यांकडे पहातांना ‘कक्षात वेगळाच लोक अवतरित झाला आहे’, असे वाटणे : ‘रात्री २.३० वाजता सत्संग संपल्यानंतर अतिथी कक्षातील लाद्या पूर्णपणे गुलाबी झाल्याचे आम्हा सर्वांना एकाच वेळी दिसले. इतर काही वेळेलाही मला तेथील लाद्यांवर गुलाबी रंगाची छटा दिसते; पण या दिवशी अधिक गडद छटा दिसत होती. त्या वेळी ‘अतिथी कक्षात वेगळाच लोक अवतरित झाला आहे’, असे वाटत होते. त्या लाद्यांकडे पाहून मनाला आनंद आणि शांती जाणवली, तसेच मन निर्विचार झाले. ‘त्या लाद्यांकडे पहातच रहावे’, असे वाटत होते. ‘देश-विदेशातील साधकांना ईश्‍वरप्राप्ती व्हावी आणि सर्वत्र हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यांसाठी या माध्यमातून पुष्कळ प्रमाणात ईश्‍वरी चैतन्य कार्यरत झाले आहे’, असे मला जाणवलेे.’ – (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ

१ इ. ‘खोलीतील गुलाबी झालेल्या लाद्यांकडे पहातांना मला आनंद जाणवला.’ – (पू.) श्री. रेन्डी इकारांतियो

१ ई. अतिथी कक्षातील लाद्यांवर गुलाबी रंगाची गडद छटा, तर स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या प्रतिमेखालच्या लाद्यांवर फिकट छटा दिसणे

१. ‘खोलीतील लाद्यांकडे पाहून मला शांत वाटले. त्यातून ‘प्रीती आणि चैतन्य प्रक्षेपित होत आहेत’, असेे मला जाणवले.

२. अतिथी कक्षातील कोपर्‍यात असलेल्या काही लाद्यांवर गुलाबी रंगाची गडद छटा, तर स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या (या चित्रातील जिवंतपणा वाढला आहे.) चित्राखालच्या काही लाद्यांवर फिकट छटा दिसत होती. ‘त्या वेळी आश्रमातील अन्यत्रच्या लाद्यांवरही गुलाबी छटा आली आहे का ?’, हेे पाहिले असता त्या लाद्या नेहमीप्रमाणेच दिसत होत्या. त्यांवर गुलाबी छटा आली नव्हती.

३. गुलाबी रंग हा प्रीतीचा दर्शक आहे. ‘सद्गुरु बिंदाताईंमधील प्रीतीमुळेच लाद्यांवर गुलाबी छटा आली असावी’, असे मला वाटले.’

– सौ. प्रियांका राजहंस

२. लाद्यांमधून धूर येत असल्याचे दिसणे

अ. ‘अतिथी कक्षात एका कोपर्‍यात श्रीकृष्णाची लाकडी मूर्ती ठेवली आहे. तिच्या समोरच्या भागातील लाद्यांतून धूर येत होता. त्या धुराकडे पाहून चांगले वाटत होते.’ – (पू.) सौ. भावना शिंदे

आ. ‘खोलीतील सर्व लाद्या चैतन्यमय वाटत होत्या. ‘त्या लाद्यांमधून वैशिष्ट्यपूर्ण धूर बाहेर येत आहे’, असे मला दिसले. तो धूर दैवी वाटत होता.’ – (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले

३. लाद्या पारदर्शक वाटणे

अ. ‘कक्षातील लाद्या पारदर्शक दिसत होत्या. त्यांना स्पर्श केल्यावर प्रवाहित पाण्याला स्पर्श केल्याप्रमाणे माझ्या पायांना संवेदना जाणवली.’ – (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले

आ. ‘सर्व लाद्यांकडे पहाताक्षणी मला त्या जलाप्रमाणे पारदर्शक वाटल्या.’ – सौ. प्रियांका राजहंस

४. अतिथी कक्षाच्या संदर्भात आलेल्या अन्य अनुभूती

४ अ. कक्ष व्यापक असल्याचे जाणवणे : ‘या सत्संगाच्या वेळी ‘अतिथी कक्ष त्याच्या प्रत्यक्ष आकारापेक्षा अधिक व्यापक झाला आहे’, असे मला वाटले.’ – (पू.) श्री. रेन्डी इकारांतियो

४ आ. ‘कक्ष निर्गुणाकडे जात आहे’, असेे जाणवणे : ‘एस्.एस्.आर.एफ्.च्या शिबिरासाठी मी प्रतिवर्षी रामनाथी आश्रमात येते. तेव्हा सद्गुरु बिंदाताई सेवेसाठी बसत असलेल्या कक्षात माझे जाणे होते. ‘या वर्षी हा कक्ष निर्गुणाकडे जात आहे’, असे मला जाणवले.

४ इ. खिडकीला लावलेल्या ‘नेटलॉन’वर गुलाबी छटा आल्याचे लक्षात येणे : खोलीच्या खिडकीसमोरील कपाटावर श्रीकृष्णाची मूर्ती ठेवली आहे. त्याच्या मागील ‘नेटलॉन’वर गुलाबी छटा आल्याचे ८.१.२०१९ या दिवशी माझ्या लक्षात आले. त्याकडे पहातांना मला चांगले वाटले.’

– (पू.) सौ. भावना शिंदे

धारिकेचे संकलन करतांना पुष्कळ आनंद जाणवणे

‘या धारिकेचे टंकलेखन आणि संकलन करतांना मला पुष्कळ आनंद जाणवत होता. ‘या धारिकेची सेवा कधी पूर्ण झाली ?’, ते कळलेच नाही. मी इतर वेळेलाही संकलनाची सेवा करते; पण वरील अनुभूती मला प्रथमच आली.’

– कु. सई कुलकर्णी (१२.१.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF