चिनी आणि नायलॉन मांजा यांचा उपयोग करणार्‍यांवर कारवाई करणार ! – मुंबई पोलीस

जिवाला धोकादायक मांज्यावर राज्य सरकारची बंदी

चिनी मांजे बहुतांशी चीनहून भारतात येऊन त्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. त्यामुळे अनेक जण घायाळ होतात, मृत्युमुखीही पडतात, तरी या मूळ मालाची खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांपर्यंत पोलीस का पोहोचू शकले नाहीत ?

मुंबई – पक्षी, प्राणी यांसह मनुष्याच्या जिवाला धोकादायक ठरणार्‍या चिनी आणि नायलॉन मांजांची विक्री करण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे. ती झुगारून नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक किंवा उपयोग करतांना आढळल्यास बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १८८ अंतर्गत जामीनपात्र गुन्हा नोंद होऊ शकतो, तसेच न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे एक मास कारावास किंवा दंड, तसेच दोन्ही शिक्षाही होऊ शकतात. या मांजामुळे कुणी घायाळ झाल्यास भादंविच्या इतर कलमांनुसारही कारवाई केली जाऊ शकते, अशी चेतावणी मुंबई पोलिसांनी दिली आहे.

मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना चिनी आणि नायलॉन मांजा यांचा उपयोग करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुकानांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच आपल्या आजूबाजूला नायलॉन मांजाची विक्री किंवा उपयोग करतांना कुणी आढळल्यास कळवावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. चिनी किंवा नायलॉनचा मांजा हा बर्‍याचदा चीनहून मागवला जातो. इतर मांजांपेक्षा तो अल्प शुल्कात विकला जातो. पतंग उडवतांना काटाकाटीच्या स्पर्धेत टिकण्यासाठी अधिक तीव्र धार असलेल्या मांजाला मागणी असते. प्लास्टिक, काचेची पूड यांचा उपयोग करून सिद्ध केलेला केलेला मांजा अधिक विकला जातो. पतंग उडवतांना हाताला इजा होऊ नये, यासाठी हातमोजे, बॅण्डेड पट्टी, तसेच अन्य काळजी पतंग उडवणारे घेतात, तरीही घातकी चिनी मांज्यामुळे दुसर्‍याचा जीव जाण्याचा धोका असतो.


Multi Language |Offline reading | PDF