मुंबई, १५ जानेवारी – स्वामी विज्ञानानंद यांच्या २५ व्या कृतज्ञतास्मरण वर्षाचे निमित्त साधून मन:शक्ती प्रयोगकेंद्राने अमेरिकेतील APPPAH (Association for Pre & Perinatal Psychology & Health) या संस्थेसह १८ ते २० जानेवारी या कालावधीत भारतातील पहिल्या गर्भसंस्कार आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोगकेंद्रात केले आहे. ‘गर्भावस्थेतील विकासाचे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान’ हा परिषदेचा विषय आहे. ‘घडवू नवे निरोगी जग, गर्भातूनी’ हे परिषदेचे घोषवाक्य आहे. सदर परिषदेत विविध वैद्यक शाखांचे वैद्य-डॉक्टर, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, मेंदूशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, संशोधक, परिचारिका, विद्यार्थी हे सहभागी होऊ शकतात.
मन:शक्ती प्रयोगकेंद्राचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी १९६० मध्ये गर्भसंस्कार संकल्पना मांडली. त्यावर आधारित गर्भसंस्कार प्रयोग त्यांनी चालू केले. १९९३ मध्ये त्यांनी ‘मूल आईच्या पोटातून बोलते ऐकायला शिका’ हे पुस्तक लिहून गावोगावी गर्भसंस्कार शाळा निर्माण व्हाव्यात, अशी कल्पना मांडली.