प्रयागराज येथील कुंभमेळ्यास भावपूर्ण वातावरणात प्रारंभ !

कुंभमेळा प्रयागराज २०१९

  • विश्‍वातील सर्वांत मोठे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महापर्व !

  • १ कोटी ४० लाख भाविकांनी केले स्नान

राजयोगी स्नानाला जातांना सहस्रावधी नागा साधू यांच्यासह अन्य साधू-संत !

प्रयागराज, १५ जानेवारी (वार्ता.) – मकरसंक्रांतीच्या निमित्ताने गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर १५ जानेवारीला पहाटे ५ वाजल्यापासून ‘गंगा माता की जय’, ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देत नागा साधू, महामंडलेश्‍वर, संत-महंत यांचे राजयोगी (शाही) स्नान आणि शंखनाद यांनी येथील कुंभमेळ्यास उत्साही अन् भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.

१५ जानेवारीला सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी सर्वांत प्रथम श्री पंचायती आखाडा महानिर्वाणीमधील नागा साधू आणि संत-महंत हे शोभायात्रा काढून वाजतगाजत त्रिवेणी संगमावर पोहोचले. या आखाड्यातील नागा साधू आणि संत-महंत यांनी शंखनाद केला अन् कडाक्याच्या थंडीतही गंगानदीत राजयोगी स्नान करून कुंभमेळ्यास प्रारंभ केला. संत-महंत, तसेच नागा साधू विविध आखाड्यांच्या शोभायात्रांत सजवलेल्या ‘ट्रॅक्टर’, ट्रॉली, घोडे यांवर, तसेच पालखी अन् भाले यांसह सहभागी झाले होते.

आजच्या स्नानासाठी भाजपच्या केंद्रीयमंत्री सौ. स्मृती इराणी यांनीही सर्वसामान्यांप्रमाणे संगमावर जाऊन स्नान करून पूजन केले. आतंकवादविरोधी पथकाच्या कमांडोंनी हवाई सर्वेक्षण करून कुंभक्षेत्री लक्ष ठेवले.

१. हिंदु धर्मातील सर्वांत महत्त्वाच्या अशा कुंभमेळ्यात सहभागी होऊन संगम तिरावर राजयोगी स्नान करण्याची प्रत्येक तपस्वीची तीव्र इच्छा असते. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी कुंभमेळ्यात कडाक्याच्या थंडीचीही पर्वा न करता केवळ श्रद्धा आणि भक्ती यांपोटी विविध आखाड्यांमधील नागा साधू, संत-महंत यांनी गंगानदीत डुबकी घेऊन राजयोगी स्नान केले.

२. श्री पंचायती निरंजनी आखाड्यानंतर आनंद आखाड्याचे साधू, संत-महंत यांनी शोभायात्रा काढून संगम तिरावर राजयोगी स्नान केले. या वेळी केंद्रीयमंत्री निरंजन ज्योती यांना निरंजनी आखाड्याच्या महामंडलेश्‍वरपदी आरूढ करण्यात आले.

३. कुंभमेळ्यात सर्व आखाड्यांचे क्रमानुसार राजयोगी स्नान करण्याचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या आखाड्यांना ५० मिनिटे, तर मध्यम आणि लहान आखाड्यांना ३० ते ४५ मिनिटे, असा कालावधी स्नानासाठी देण्यात आला होता.

४. नागा साधू, संत-महंत यांच्यासमवेत श्रद्धाळू भाविकांनीही संगम तटावरील विविध ठिकाणी असलेल्या घाटांवर रात्रीपासूनच स्नान करण्यास प्रारंभ केला होता. प्रयागराज येथे ७ अंश सेल्सियस पारा असतांनाही मोठ्या उत्साहाने भाविक गंगानदीत स्नान आणि पूजा-पाठ करत होते. ‘पहिले राजयोगी स्नान केल्याने स्वर्गाचे द्वार उघडते’, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

५. कुंभमेळ्यात विविध आखाड्यांचे नागा साधू, संत-महंत यांच्या समवेत त्यांचे भक्त आणि अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. १४ जानेवारीला रात्री सर्व आखाड्यांतील साधू आणि संत-महंत यांनी इष्टदेवतांची पूजा अन् अभिषेक केला. त्यानंतर ध्वजाची पूजा करण्यात आली. सर्व आखाड्यांत उत्साहाचे वातावरण होते. आखाड्यांतील पिठाधीश्‍वर यांच्यासाठी रथ सजवण्यात आले होते.

‘हर हर महादेव ।’ आणि ‘बम बम भोले’चा जयघोष करत राजयोगी स्नानासाठी जातांना नागा साधू

कुंभमेळ्यात ६ तिथींना राजयोगी स्नान होणार !

१५ जानेवारी ते ४ मार्च या कालावधीत कुंभमेळ्यात मकरसंक्रांत, पौष पौर्णिमा, मौनी अमावास्या, वसंतपंचमी, माघ पौर्णिमा आणि महाशिवरात्र या ६ तिथींना संगम तटावर राजयोगी स्नान होणार आहे. कुंभमेळ्यातील पाचवे राजयोगी स्नान १९ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या माघ पौर्णिमेला होणार आहे. या दिवशी हिंदूंच्या देवता विविध रूपे धारण करून स्वर्गातून पृथ्वीवरील येथील संगम तटावर येतात आणि राजयोगी स्नान करून स्वत:चे व्रत पूर्ण करतात’, असे म्हटले जाते. या दिवशी बृहस्पति गुरूंचीही पूजा केली जाते. कुंभमेळ्यातील शेवटचे स्नान महाशिवरात्रीला होईल. ‘देवताही या दिवसाची वाट पहात असतात’, असे म्हटले जाते.

कुंभमेळ्यावर ३ ड्रोनद्वारे ठेवण्यात आले लक्ष !

कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षाव्यवस्था अत्यंत चोख ठेवण्यात आली आहे. राजयोगी स्नानाच्या ठिकाणी ३ ‘ड्रोन’च्या साहाय्याने देखरेख ठेवली जात आहे. आखाड्यांपासून ते संगम तटांवरील रस्त्यांवर सैनिकांचा बंदोबस्त होता.

संगम तटावर अत्याधुनिक शस्त्रांसह ‘एटीएस्’ आणि ‘एन्एस्जी’चे कमांडो तैनात करण्यात आले होते. मेळ्यात पोलीस आणि कमांडो यांना अतीदक्षतेची सूचना देण्यात आली होती. बॉम्बस्फोट विरोधी यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली होती. कुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी ४२ सहस्र पोलीस आणि सैनिक तैनात करण्यात आले होते, तसेच एकूण १२ ‘सीसीटीव्ही’ छायाचित्रकांच्या माध्यमातून सर्वत्र लक्ष ठेवण्यात येत होते.

क्षणचित्रे

१. कुंभमेळ्यात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे यांनी ‘फेसबूक लाईव्ह’द्वारा कुंभमेळा, त्याचे महत्त्व, तसेच कुंभमेळ्यातील स्नान यांसंदर्भात शास्त्रीय माहिती देऊन अध्यात्मप्रसार केला.

२. भाविकांमध्ये वयस्कर आणि लहान मुले यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

३. भाविकांना ठिकठिकाणी चहा आणि अल्पाहार विनामूल्य देण्यात आली.

४. भाविकांसाठी स्नान करण्यासाठी ३५ घाट सजवण्यात आले होते.

५. प्रयागराज येथील रेल्वे आणि बस स्थानकांवर आलेल्या भाविकांना ये-जा करण्यासाठी प्रशासनाने बस अन् टेम्पो यांची व्यवस्था केली आहे. या दोन्ही वाहनांतून भाविकांना संगम तटावर आणण्यात येत होते.


Multi Language |Offline reading | PDF