६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले यांनी योगेश व्हनमारे यांंच्या निधनाविषयी त्यांची पत्नी श्रीमती अलका योगेश व्हनमारे यांचे केलेले शंकानिरसन आणि श्रीमती व्हनमारे यांनी अनुभवलेली परात्पर गुरुदेवांची अपार प्रीती !

१४.१.२०१९ या दिवशी योगेश व्हनमारे यांचे निधन होऊन १ मास झाला. योगेश यांच्या निधनानंतरचे विधी पूर्ण झाल्यावर त्यांची पत्नी श्रीमती अलका व्हनमारे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्या असतांना त्यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले यांच्याशी भेट झाली. श्रीमती अलका यांच्या मनात योगेशदादांच्या निधनाविषयी असलेल्या सर्व शंकांचे निरसन कु. मधुरा यांनी केले. या दोघींचे संभाषण पुढे दिले आहे. या संभाषणातून ‘मृत्यू आणि त्याची कारणे, तसेच साधना अन् सेवा यांचा मृत्यूनंतरही होणारा लाभ’ याविषयी सर्व साधकांना कळेल आणि त्यांना तळमळीने साधना करण्यास प्रेरणा मिळेल.

कु. मधुरा भोसले

‘योगेश व्हनमारे यांच्या निधनानंतरच्या दहाव्या दिवशी कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झाले होते. ते वाचल्यापासून माझ्या मनात मधुराताईला भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. १०.१.२०१९ या दिवशी मला योगेश यांची आठवण येऊन पुष्कळ रडायला येत होते. तेव्हा मी ‘रामनाथी आश्रमातील आगाशीत बसून देवाशी बोलूया’, असा विचार केला आणि मी आगाशीत येऊन बसले. तेव्हा ५ मिनिटांनी मधुराताई तेथे आली. तिने माझी अत्यंत प्रेमाने विचारपूस केली. तेव्हा आमच्यात झालेला संवाद पुढे दिला आहे.

श्रीमती अलका व्हनमारे

१. योगेश व्हनमारे यांच्या निधनाच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना विचारलेले प्रश्‍न आणि त्यांची कु. मधुरा यांनी दिलेली उत्तरे

१ अ. योगेश यांच्या प्रारब्धात पुष्कळ त्रास असणे, देव ‘साधकाचे सर्व त्रास नष्ट होऊन त्याची साधना व्हावी’, अशाच घटना घडवत असणे आणि कै. योगेश यांच्या संदर्भात असेच घडलेले असणे

मी : ताई, तू केलेल्या सूक्ष्म परीक्षणात ‘योगेश यांच्या मृत्यूचे कारण ५० टक्के अपमृत्यूयोग आणि ५० टक्के वाईट शक्तींनी यमास्त्रे सोडणे’, असे लिहिले होतेे. त्यातील ‘५० टक्के वाईट शक्तींनी यमास्त्रे सोडणे’, हे कारण सोडले, तर त्यांची ५० टक्के वाचण्याची शक्यता होती का ? असे असेल, तर ते का वाचू शकले नाहीत ?

कु. मधुरा भोसले : ‘आपल्या प्रारब्धात किती भोग किंवा किती यातना आहेत ?’, हे आपल्याला ठाऊक नसते. त्यांच्याही प्रारब्धात पुष्कळ अडचणी, दुःखे आणि त्रास असे होते. हे सर्व भोगणे त्यांना कदाचित् शक्य झाले नसते. ‘साधकाचे सर्व त्रास नष्ट होऊन त्याची साधना कशी होईल ?’, हेच गुरुदेव पहातात. गुरुकृपेने त्यांचेही असेच झाले आहे.

१ आ. हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या तीव्र तळमळीमुळे कै. योगेश यांनी मृत्यूनंतर लगेच सेवेला आरंभ करणे आणि त्यामुळे त्यांची जलद आध्यात्मिक प्रगती होणे

मी : योगेश यांची मृत्यूपूर्वी आध्यात्मिक पातळी ५८ टक्के होती आणि नंतर १० दिवसांत त्यांच्या आध्यात्मिक पातळीत ३ टक्क्यांनी वाढ होऊन ती ६१ टक्के झाली. मृत्यूनंतर कसे असे होते ? म्हणजे एवढी जलद प्रगती कशी होते ?

कु. मधुरा भोसले : योगेश यांची ‘हिंदु राष्ट्र यावे’, ही तळमळ इतकी होती की, मृत्यूनंतरही न थांबता त्यांनी लगेच सेवेला आरंभ केला. त्यांच्या या तीव्र तळमळीमुळे तीव्र गतीने त्यांनी सेवेला आरंभ केला. त्यामुळे ते १० दिवसांत एवढ्या जलद गतीने आध्यात्मिक प्रगती करू शकले.

१ इ. कै. योगेश हे मृत्यूनंतर महर्लोकात गेलेले असल्याने ते कावळ्याच्या माध्यमातून पृथ्वीवर येण्याची शक्यता नसणे

मी : एक दिवस मला योगेश यांची तीव्र आठवण येऊन दिवसभर रडायला येत होते. दुसर्‍या दिवशी पहाटे उठून मी आश्रमात बसले होते. त्याठिकाणी एक कावळा येऊन पुष्कळ वेळ ओरडत होता. ते तेच (कै. योगेश) असू शकतात का ?

कु. मधुरा भोसले : समाजातील किंवा साधना न करणार्‍या पितरांविषयी असे असू शकते; पण दादांचे (कै. योगेश यांचे) असे नाही. ते महर्लोकात पोहोचले आहेत. तेथून ते कावळ्याच्या माध्यमातून खाली येतील, असे नसते.

१ ई. परात्पर गुरुदेवांचे सूक्ष्म रूप महर्लोकात असून त्यांच्या मार्गदर्शनानुसार तेथील सनातनच्या साधकांची साधना चालू असणे आणि ‘तेथे आलेल्या अनेक लिंगदेहांना पुढच्या टप्प्याची साधना सांगणे, हिंदुत्वनिष्ठांच्या संघटनातील सूक्ष्म स्तरावरील अडचणी सोडवणे’, अशा सेवा सनातनचे महर्लोकातील साधक करत असणे

मी  : महर्लोकात कसे असते ? म्हणजे तेथे काय सेवा करतात ?

कु. मधुरा भोसले : महर्लोकात आत्मे, म्हणजे प्रकाशाचे गोळे असतात. तेथे सनातनचे साधक असतात, तसेच चांगली साधना केलेल्या अन्य जिवांचे लिंगदेह किंवा आत्मे असतात; पण त्यांना देह नसल्यामुळे ‘त्यातील आपला जीव कोणता ?’, ते आपल्याला नेमकेपणे समजू शकत नाही. येथे परात्पर गुरुदेव स्थूल रूपाने आपल्याजवळ आहेत, तसेच त्यांचे एक सूक्ष्म रूप महर्लोकातही आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनच्या साधकांची तेथे साधना चालू आहे. ‘तेथे आलेल्या अनेक लिंगदेहांना पुढच्या टप्प्याची साधना सांगणे, तसेच पृथ्वीवर चांगल्या साधकांच्या मनात नकारात्मक विचार आल्यास त्यांना प्रार्थना आणि सकारात्मक विचार यांचे स्मरण करून देणे, चांगले धर्मप्रेमी किंवा हिंदुत्वनिष्ठ यांच्या संघटनांतील सूक्ष्म स्तरावरील अडचणी सोडवणे’, अशा सेवा सनातनचे महर्लोकातील साधक करतात.

१ उ. महर्लोकात देह नसून प्रकाशाच्या गोळ्याच्या रूपातील लिंगदेह असणे आणि त्यामुळे ‘कुणाचा लिंगदेह कुठला ?’, हे ओळखता न येणे

मी : म्हणजे मला आता त्यांना भेटणे शक्य नाही; पण पुढे माझी साधना वाढली आणि मला योगेश यांना भेटायचे असेल, तर भेटता येते का ?

कु. मधुरा भोसले : भेटू शकतो; पण महर्लोकात देह नसतो आणि अनेक लिंगदेह, म्हणजे प्रकाशाचे गोळे असतात. त्यांपैकी ‘कुणाचा लिंगदेह कुठला ?’, हे समजणे अवघड जाते, म्हणजे ओळखता येत नाही.

१ ऊ. कै. योगेश यांची साधना आणि गुरुसेवेची तीव्र तळमळ यांमुळे ते मृत्यूनंतर ५ – ६ दिवसांतच धर्मलोकातून महर्लोकात पोहोचणे आणि त्यांना सलोक अन् समीप मुक्ती मिळणे

मी  : मी गरुडपुराणात ऐकले होते की, मृत्यूनंतर एक वर्ष आत्मा देह धारण करू शकत नाही. कै. योगेश यांचेही असेच असणार का ?

कु. मधुरा भोसले : समाजातील लोकांचा मृत्यू होतो, तेव्हा त्यांना ‘आपला मृत्यू झाला आहे’, हेच कळत नसते. ते स्वतःच्या नातेवाइकांशी बोलण्याचा प्रयत्न करतात; पण नातेवाइकांना ते कळत नाही. कै. योगेश यांचे तसे नव्हते. त्यांनी झालेला हा प्रसंग देवाची इच्छा म्हणून लगेच स्वीकारला. ते साधक होते, तसेच त्यांना धर्मकार्याची तीव्र तळमळ होती; म्हणून ते यमलोकातून धर्मलोकात लगेच पोहोचले; पण त्याही पुढे जाऊन त्यांनी स्वतःचा मृत्यू स्वीकारून लगेच सेवेला आरंभ केला; म्हणून त्यांना घ्यायला विष्णुदूत आले. साधकांचा लिंगदेह वाईट शक्तींच्या कह्यात जाऊ नये; म्हणून परात्पर गुरुदेव काळजी घेतात आणि त्यांना योग्य स्थानी पोहोचवतात. प्रत्यक्षात स्वर्गलोकाच्या वरती आणि महर्लोकाच्या खाली जवळ असलेल्या धर्मलोकातून महर्लोकात जायलाही कित्येक मास लागतात; परंतु कै. योगेश यांची साधना आणि गुरुसेवेची तीव्र तळमळ यांमुळे ते ५ – ६ दिवसांतच धर्मलोकातून महर्लोकात पोहोचले. सलोक, सार्ष्टी, समीप, सरूप, सायुज्य, असे मुक्तीचे प्रकार आहेत. दादांची साधना चांगली असल्याने त्यांना सलोक आणि समीप मुक्ती मिळाली आहे. (सलोक म्हणजे देवलोक आणि समीप म्हणजे देवाजवळ रहाणे.) आधी सलोक मुक्ती मिळाली, म्हणजे महर्लोकामध्ये स्थान मिळाले आणि महर्लोकातील श्रीकृष्णाच्या सूक्ष्मरूपाजवळ रहाण्यास मिळाले; म्हणून समीप मुक्ती मिळाली आहे. – मधुरा)

२. कु. मधुरा भोसले यांच्याशी बोलतांना जाणवलेली सूत्रे

अ. मधुराताई ही सूत्रे सांगत असतांना ‘साक्षात देवीच हे सर्व मला सांगत आहे’, असे मला जाणवले.

आ. तिच्याशी बोलून मला पुष्कळ स्थिर वाटले. अनेक लहरींनी युक्त पाणी स्थिर व्हावे, तसे माझे मनही तिच्याशी बोलून स्थिर झाले.

इ. मी हे तिला सांगितल्यावर ती म्हणाली, ‘‘कै. योगेशदादाही तुम्हाला स्थिर पाहून आता पुष्कळ आनंदी झाले आहेत.’’ तेव्हा ‘मधुराताईला सूक्ष्मातील किती कळते आणि तिने सर्व किती अचूक सांगितले !’, असे माझ्या लक्षात आले.

ई. ‘ताईच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांनीच मला ही सूत्रे सांगितली’, असे मला वाटले.

३. योगेश यांच्या निधनानंतर सर्वप्रथम परात्पर गुरु पांडे महाराज यांचा दूरभाष येणे आणि ‘योगेश हिंदु राष्ट्रासाठी पुन्हा लवकर जन्म घेणार आहे’, असे त्यांनी सांगणे

योगेश यांच्या निधनाची वार्ता समजल्यावर माझा स्वतःवरील संयम सुटला होता. तेव्हा सर्वप्रथम मला परात्पर गुरु पांडे महाराजांचा दूरभाष आला होता. तेव्हा ते काही सूत्रे मला सांगत होते. मला मूर्च्छा आल्याने प्रथम ‘ते काय बोलले ?’, ते आठवत नाही; पण नंतर मंत्रोच्चारण झाल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘अगं, तुझा योगेश कुठेही गेला नाही. त्याने केवळ हे शरीररूपी वस्त्र त्यागले आहे आणि बघ, तो हिंदु राष्ट्रासाठी पुन्हा लवकर जन्म घेणार आहे. मला दिसतेय बेटा ! तू काळजी करू नकोस.’’

४. परात्पर गुरुदेवांची अनुभवलेली अपार प्रीती !

हे सूत्र मी मधुराताईला सांगितले, तेव्हा तिचीही भावजागृती झाली. ताई म्हणाली, ‘‘तुम्ही रामनाथीला कधी येणार ?’ असा विचार माझ्या मनात आला होता; कारण ‘परात्पर गुरुदेव आमच्या दोघांची (माझी आणि माझ्या मुलाची) वाट पहात आहेत’, असे मला जाणवत होते.’’ तेव्हा मला एक सूत्र आठवले आणि मी मधुराताईला म्हणाले, ‘‘सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी मला कै. योगेश यांचे सर्व विधी झाल्यावर रामनाथीला या’, असे सांगितले होते. त्यानंतर कु. दीपालीताईही (कु. दीपाली मतकर) माझा नेटाने पाठपुरावा घेत होती. एकीकडे ‘सद्गुरु (सौ.) बिंदाताईंचे आज्ञापालन करायचे आहे’ हा विचार माझ्या मनात होता; पण मनात अन्य नकारात्मक विचार असल्याने आणि शरिरात त्राण नसल्यामुळे ‘रामनाथीला जायचे नाही’, असाही विचार माझ्या मनात तीव्रतेने येत होता. शेवटी दीपालीताईने सांगितले, ‘‘अगं ताई, देव तुझी वाट पहात आहे. जा ना गं !’’ हे ऐकल्यावर ‘माझी काहीच पात्रता नाही, तरी परात्पर गुरुदेवांची प्रीती किती आहे ! प्रत्येक जिवासाठी ते किती करतात !’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली. मला गुरुदेवांची इतक्या तीव्रतेने आठवण आली की, मी त्वरित तिकीट काढले आणि रामनाथीला आले.’’

५. कृतज्ञता

‘सूक्ष्म परीक्षण करून ‘आम्हाला समजेल’, अशा शब्दांत सांगणारी मधुराताईसारखी साधिका आम्हाला मिळाली’, याबद्दल मला शब्दांतून कृतज्ञता व्यक्त करता येत नाही, तरीही अशा महान परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– श्रीमती अलका योगेश व्हनमारे, सोलापूर (१४.१.२०१९)

ही सूत्रे लिहित असतांना विविध त्रास होणे आणि गुरुकृपेने हे लिखाण पूर्ण होऊ शकणे : ‘ही सूत्रे लिहित असतांना मला पुष्कळ वेळ लागत होता. एक ओळ लिहिली की, ‘हातात शक्ती नाही’, असे वाटणे, अनाहतचक्राच्या स्थानी धडधडणे, काहीही कारण नसतांना अकस्मात ओटीपोटात तीव्र वेदना होणे’, असे त्रास मला होत होते. लेखणी पुढे सरकत नव्हती. केवळ गुरूंची आज्ञा होती; म्हणून त्यांच्याच कृपेने हे लिखाण पूर्ण होऊ शकले. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’

– श्रीमती अलका योगेश व्हनमारे, सोलापूर (१४.१.२०१९)

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now