कुंभमेळ्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे उन्नत जीवन, आचार आणि विचार यांची जगाला जाणीव करून देण्याचा प्रयत्न ! – विजय आनंद, कुंभमेळा अधिकारी

प्रयागराज, १५ जानेवारी (वार्ता.) – लोकांच्या भावना विचारात घेऊन अलाहाबाद शहराचे ‘प्रयागराज’ असे नामकरण करून शहराची ऐतिहासिक आणि पौराणिक प्रतिष्ठा स्थापन करण्यात आली आहे. या कुंभमेळ्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे उन्नत जीवन, आचार आणि विचार यांची जगाला जाणीव करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील, अशी माहिती येथील कुंभमेळा अधिकारी विजय आनंद यांनी येथील मिडीया सेंटर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

विजय आनंद पुढे म्हणाले की…

१. प्रयागराज येथे प्रति ६ वर्षांनी कुंभमेळा आणि प्रतिवर्षी माघ यात्रा असते. त्यामुळे येथे विकासाची कामे करण्याची प्रक्रिया सतत चालू असते. त्यासाठी प्रयागराज मेळा प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली आहे.

२. कुंभक्षेत्रात ६७१ जनकल्याणार्थ योजनांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या कुंभमेळ्यासाठी एकूण ४ सहस्र ३०० कोटी रुपये खर्च करणार असून वर्ष २०१३ मध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या तुलनेत या कुंभमेळ्यासाठी १ सहस्र २१४ कोटी रुपये अधिक खर्च करण्यात येणार आहेत.

३. जानेवारी मासात प्रवासी भारतीय दिवसाचे संमेलन वाराणसी येथे आहे. त्यासाठी ५ सहस्र भारतीय प्रवासी येथे येऊन भारतीय संस्कृतीचा गौरव पहातील. फेब्रुवारी मासात १९२ देशांचे प्रतिनिधी या कुंभमेळ्यात येतील.

४. येथील विशाल क्षेत्रात १ नवीन नगराची स्थापना करण्यात येईल. त्यामध्ये २५० किलोमीटरचे रस्ते आणि २२ पाण्टून पुलांचा समावेश असेल. हे जगातील सर्वांत मोठे नगर असेल.

५. कुंभमेळ्याचा परिसर उजळून दिसण्यासाठी प्रथमच ४० सहस्रांहून अधिक ‘एल्ईडी’ विजेचे दिवे कुंभमेळा परिसरात लावले आहेत.

६. देशातील प्रत्येक सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिनिधित्व या कुंभमेळ्यात पहायला मिळेल. सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सव यांच्यासमवेत देशातील प्राचीन संस्कृतीचे सादरीकरण कुंभमेळ्यात पहायला मिळतील.

७. कुंभमेळ्यात स्वच्छतेला अधिक महत्त्व दिले गेले आहे. कुंभमेळ्याच्या परिसरात १ लक्ष २२ सहस्र शौचालय बनवले आहेत. वर्ष २०१३ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यात ३४ सहस्र शौचालय बनवले होते.

८. गंगा नदीत प्रदूषित पाणी मिसळत असलेले ३२ नाले बंद करण्यात आले आहेत. प्रदुषित पाणी शुद्ध करण्यासाठी नवीन यंत्रणा निर्माण केली आहे. (खरेतर अशुद्ध पाणी गंगेत कायमस्वरूपीच कसे सोडले जाणार नाही, याची प्रशासनाने काळजी घेणे अपेक्षित आहे. ‘नमामि गंगे’ परियोजनेच्या अंतर्गत या सूत्राकडेही केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे ! – संपादक)

९. प्रयागराज शहराला ‘भारतीय संस्कृती आणि कला’संबंधी सुंदर चित्रांनी सजवण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीचे दर्शन होण्यासाठी २० लक्ष वर्ग फूट भिंती कुंभसाठी सजविण्यात आल्या आहेत. २० सहस्र भाविकांसाठी प्रथमच यात्री निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF