प्रयागराज येथे आज कुंभमेळ्यातील पहिले राजयोगी (शाही) स्नान !

कुंभमेळा प्रयागराज २०१९

गंगा-यमुना-सरस्वती संगम तीरावर साधू, संत आणि महंत स्नान करणार !

जागतिक स्तरावर होत असलेल्या सर्वांत मोठ्या आध्यात्मिक यात्रेची म्हणजेच ‘कुंभमेळ्या’ची प्रातिनिधिक छायाचित्रे

प्रयागराज, १४ जानेवारी (वार्ता.) – प्रयागराज येथे मकरसंक्रांतीच्या दिवशी म्हणजे १५ जानेवारीला कुंभमेळ्यातील पवित्र गंगा-यमुना-सरस्वती या त्रिवेणी संगम तिरावर पहिले राजयोगी (शाही) स्नान होणार आहे. या राजयोगी स्नानासाठी विविध आखाड्यांचे संत, महंत आणि भाविक यांनी मोठ्या उत्साहात सिद्धता केली आहे. पहाटे ५ वाजल्यापासून राजयोगी स्नानाला प्रारंभ होणार आहे. प्रथम साधू, संत आणि महंत, नंतर बैरागी आणि शेवटी उदासीन आखाड्यातील संन्याशी राजयोगी स्नान करतील.

१५ जानेवारीला पहाटे ५.१५ वाजता महानिर्वाणी आणि अटल आखाड्यातील संत-महंत राजयोगी स्नानासाठी संगम तिरावर येण्यास प्रारंभ करतील. ते संगम तिरावर आल्यानंतर त्यांना स्नानासाठी ४० मिनिटे देण्यात आली आहेत. त्यानंतर निरंजनी, आनंद यांसह इतर आखाड्यांतील संत-महंत राजयोगी स्नान करण्यासाठी प्रस्थान करतील. जे मोठे आखाडे आहेत, त्यांना राजयोगी स्नानासाठी ५० मिनिटे देण्यात आली आहेत.

प्रयागराजमध्ये १० लाख भाविक उपस्थित !

१४ जानेवारीला प्रयागराज येथे १० लाख भाविक आले असून १५ जानेवारीला राजयोगी स्नानासाठी अंदाजे २० लाख भाविक उपस्थित रहातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ‘कुंभमेळ्याच्या २ मासांच्या कालावधीत १ कोटी भाविक कुंभक्षेत्री येतील’, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF