नक्षलप्रेमी आनंद तेलतुंबडे यांच्या विरोधातील गुन्हा रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

  • कोरेगाव भीमा दंगलीत सहभाग घेतल्याचे आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे प्रकरण

  • मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून कायम

आनंद तेलतुंबडे

नवी देहली – कोरेगाव-भीमा दंगलीतील सहभाग आणि नक्षलवाद्यांशी संबंध या आरोपांच्या प्रकरणात आनंद तेलतुंबडे यांच्या विरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हा रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या प्रकरणी तेलतुंबडे यांनी प्रविष्ट केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. तथापि त्यांना कारवाई होण्यापासून देण्यात आलेले संरक्षण ४ आठवड्यांनी वाढवून दिले. न्यायालयाने या प्रकरणात चालू असलेल्या अन्वेषणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याच्या प्रकरणी पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर गुन्हा नोंद केला होता. हा गुन्हा रहित करावा, अशी मागणी त्यांनी २१ डिसेंबर या दिवशी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केली होती. उच्च न्यायालयाने गुन्हा रहित करण्यास नकार देत तेलतुंबडे यांची ही याचिका फेटाळून लावली. यानंतर तेलतुंबडे यांनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. यावर सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम राखत गुन्हा रहित करण्यास नकार दिला.

या प्रकरणात मला गोवण्यात आले आहे, असे सांगत तेलतुंबडे यांनी सर्व आरोपांचे खंडण केले; मात्र पोलिसांनी तेलतुंबडे यांच्या विरोधात त्यांच्याकडे अनेक पुरावे असल्याचे न्यायालयात सांगितले. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली नक्षलप्रेमी प्रा. वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांना पोलिसांनी अटक केली होती.


Multi Language |Offline reading | PDF