‘ऑनलाइन दर्शन’ नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क आकारण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी !

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीचे निवेदन

पंढरपूर, १४ जानेवारी (वार्ता.) – येथे श्री विठ्ठल दर्शनाच्या ऑनलाइन नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. वास्तविक गेले अनेक मास श्री विठ्ठल दर्शनाची सुलभ व्यवस्था होण्यासाठी नि:शुल्क टोकन व्यवस्था करण्यात यावी अर्थात कोणत्याही प्रकारच्या दर्शनासाठी शुल्क आकारले जाऊ नये, असे निवेदनाद्वारे यापूर्वी सांगितले होते. तसेच पंढरपूर मंदिर अधिनियम कायदा १९७३ आणि ७४ प्रमाणे विठ्ठलाच्या दर्शनाला कोणतेही शुल्क न आकारता भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात यावी, असा नियम आहे. असे असतांना ‘ऑनलाइन दर्शन’ नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क आकारण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. याविषयी भूमिका स्पष्ट करण्यास २ दिवसांचा कालावधी देत असून आपल्याकडून यावर लेखी उत्तर न आल्यास आम्ही आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यास स्वतंत्र आहोत, याची नोंद घ्यावी, अशी चेतावणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीने निवेदनाद्वारे मंदिर समितीला दिली.

या निवेदनात म्हटले आहे की…

१. श्री विठ्ठलाचे उपचाराच्या वेळापत्रकाव्यतिरिक्त उरलेल्या वेळात भाविकांना सुलभ दर्शन देण्याची व्यवस्था असतांना सामान्य भाविकाला ताटकळत ठेवून मधेच ४ ते ५ वेळा एकूण १५ तुळशी पूजा, २ सहस्र १०० रुपये प्रती तुळशीपूजा अशी रक्कम घेऊन करणार असल्याचेही कळले. हाही निर्णय आपण अतिमहनीय दर्शनव्यवस्था आणि त्यातून मिळणारे उत्पन्न, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवूनच घेत असल्याचे दिसते.

२. वारंवार प्रत्येक सेवा-सुविधा निर्माण करण्याच्या नावाखाली उत्पन्न वाढवण्याचा उद्देश दिसतो. प्रत्यक्षात महाराष्ट्रातील लहान देवस्थाने, उदा. सज्जनगड, गोंदवले, शेगाव यांनी मंदिरामध्ये अनेक सेवा-सुविधा, उपक्रम निर्माण केले आहेत; मात्र भाविकांच्या दर्शनावर एकही रुपयाचा कर लावण्यात आलेला नाही. आलेल्या उत्पन्नाचा योग्य विनियोग करत त्यांनी मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. देशपातळीवर त्यांचा नावलौकिक वाढत आहे.

३. या निवेदनाद्वारे मंदिर समितीला निर्वाणीची चेतावणी देत आहोत की, आपण घेत असलेल्या ‘ऑनलाइन’ दर्शन नोंदणीसाठी १०० रुपये आणि तुळशी पूजेसाठी २ सहस्र १०० रुपये हे दोन्ही निर्णय त्वरित रहित करण्यात यावेत. अन्यथा मंदिर समिती व्यवस्थापनाविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल, तसेच प्रसंगी अयोग्य निर्णयाविरुद्ध न्यायालयातही जाण्यास आम्ही सिद्ध आहोत.


Multi Language |Offline reading | PDF