सरकारने तात्काळ कायदा करून अयोध्या येथे भव्य राममंदिर उभारावे !

भाईंदर (ठाणे) आणि मालाड (मुंबई) येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदूंची एकमुखी मागणी

मुंबई, १४ जानेवारी (वार्ता.) – कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी ही प्रभु श्रीरामाची जन्मभूमी आहे, हे ऐतिहासिक सत्य आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये याचे अनेक पुरावे आहेत. न्यायालयात पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे पुन्हा सिद्ध झाले आणि वर्ष २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणी ‘श्रीरामजन्मभूमी ही श्रीरामाचीच आहे’ असे शिक्कामोर्तबही केले. गेली आठ वर्षे आता हा वाद सर्वोच्च न्यायालयात पडून आहे. त्यामुळे हिंदूंनी राममंदिरासाठी आणखी किती काळ वाट पहायची ? केंद्रात आणि उत्तरप्रदेश राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपचेच पूर्ण बहुमतातील शासन आहे. त्यामुळे संसदेत तात्काळ कायदा बनवून अयोध्येत भव्य राममंदिर उभारावे, अशी मागणी भाईंदर (जिल्हा ठाणे) येथे १२ जानेवारी आणि मालाड येथे १३ जानेवारी या दिवशी झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांकडून करण्यात आली. आंदोलनाच्या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. याला शेकडो रामभक्तांचा चांगला प्रतिसाद लाभला.

आंदोलनात करण्यात आलेल्या अन्य मागण्या

  • केंद्रशासनाने हिंदूंना हिंदु धर्मग्रंथांचे शिक्षण सर्व शाळा-महाविद्यालये यांमधून प्रतिदिन द्यावे.
  • तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मद्य-मांस यांच्या विक्रीवर बंदी घालावी, तसेच मंदिरांचे सरकारीकरण रहित करून मंदिरे पुन्हा भक्तांच्या कह्यात द्यावीत.
  • हनुमानाला मुसलमान, जाट, चिनी, खेळाडू आदी म्हणणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. यासाठी हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता आणि संत यांचा अनादर रोखणारा कठोर कायदा करावा.

मालाड

मालाड – १३ जानेवारी या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत शिवाजी चौक, टॅन्क लेन, मालाड (पू.) येथे झालेल्या आंदोलनात राष्ट्रीय बजरंग दल, योग वेदांत समिती, बजरंग शक्ती, हिंदु राष्ट्र सेना, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटना तसेच भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.

भाजपही हिंदुत्वाचे सूत्र सोडून काँग्रेसच्या वाटेवर चालत आहे ! – सुशील उपाध्याय, राष्ट्रीय बजरंग दल

काँग्रेसने सत्ताकाळात सेक्युलॅरिझम (सर्वधर्मसमभाव) च्या आड हिंदूंकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. त्या वेळी काँग्रेसला सेक्युलर म्हणणार्‍या आणि स्वतःला हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍यांना हिंदूंनी राममंदिराच्या सूत्रावर निवडून दिले. सत्तेत आल्यावर न्यायव्यवस्थेचे कारण देत भाजपही हिंदुत्वाचे सूत्र सोडून काँग्रेसच्या वाटेवर चालत आहे.

सुसंस्कृत समाजासाठी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे चारित्र्य समाजाला शिकवले गेले पाहिजे ! – संदीप सिंग, अध्यक्ष, बजरंग शक्ती

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आज समाजाची नितीमत्ता न्यून झाली आहे. वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. सध्याचे शिक्षण हे माणूस नव्हे, ‘मशीन’ (काम करणारे कामगार) निर्माण करत आहे. सुसंस्कृत समाजासाठी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे चारित्र्य समाजाला शिकवले गेले पाहिजे आणि त्यासाठी हिंदु धर्मग्रंथांचे शिक्षण शालेय शिक्षणात समाविष्ट केले पाहिजे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देवतांना विशिष्ट घटकांमध्ये अडकवण्यापासून दूर रहावे.

जातींमध्ये विभागणार्‍या राजकीय पक्षांपासून हिंदूंनी सावध रहायला हवे ! – प्रियेश जायस्वाल, हिंदु राष्ट्र सेना

राममंदिर उभारावे असे वाटत असेल, तर प्रभु श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या कार्यात सहभागी व्हायला हवे. जातींमध्ये विभागणार्‍या राजकीय पक्षांपासून हिंदूंनी सावध रहायला हवे.

हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य, हे धर्मकार्य आहे ! – अजितसिंह चौहान, योग वेदांत समिती

अयोध्येत प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर उभारावे, यासाठी हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य, हे धर्मकार्य आहे. प्रत्येक हिंदूने धर्मकर्तव्य म्हणून यात सहभागी व्हावे.

मंदिरांचे सरकारीकरण केल्यावर भ्रष्टाचारात वाढ झाली आहे ! – संदीप गवंडी, हिंदु जनजागृती समिती

सरकारने हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण केल्यावर येथील भ्रष्टाचारात वाढ झाली आहे. धर्म आणि भक्त यांसाठी काहीच न करता मंदिरात अर्पण केलेले धन सरकार अन्य विकास कामांसाठी वापरते. हे अत्यंत निषेधार्ह आहे. या वेळी भाजपचे मराठवाडा विकास आघाडी अध्यक्ष श्री. वसंत दहिफळे आणि व्यावसायिक श्री. तुषार वंजारे यांनीही आंदोलनातील मागण्यांना आपला पाठिंबा दर्शवला.

विशेष सहकार्य : मालाड येथील व्यवसायिक आणि धर्मप्रेमी श्री. तुषार वंजारे यांनी हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी सक्रीय सहभाग घेतला.

भाईंदर

भाईंदर – येथे १२ जानेवारी या दिवशी सायंकाळी ५.३० ते ७.०० या वेळेत भाईंदर (प.) रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या आंदोलनात विश्‍व हिंदु सेवा संघ, बजरंग दल, शककर्ते शिवराज सेवा संस्था, वर्गमित्र, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटना तसेच हिंदुस्तान नॅशनल पार्टी या पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.

राममंदिर हे भाजपसाठी आस्थेचे सूत्र नव्हे ! – अधिवक्ता खुश खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदुस्तान नॅशनल पार्टी, युवा मोर्चा

निवडणुकीपूर्वी राममंदिर बांधण्याचे आश्‍वासन दिल्याने जनतेने भाजपला बहुमत दिले; मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर त्याविषयी निर्णय घेणार असल्याचे सांगून पंतप्रधानांनी ८० कोटी हिंदूंचा हिरमोड केला आहे. राममंदिर निर्माण करण्यासाठी श्रीरामाविषयी आस्था असायला हवी, ती भाजपमध्ये नाही. राममंदिर हे भाजपसाठी आस्थेचे सूत्र नव्हे ! हनुमंत ही हिंदूंची देवता आहे. जात, धर्म आणि अन्य गोष्टींशी संबंध जोडून देवतांची विटंबना करणार्‍यांवर कारवाई व्हायला हवी.

हिंदूंवर होणार्‍या अन्यायाविरोधात प्रत्येक हिंदूने संघटित झाले पाहिजे ! – गणेश फडके, मीरा-भाईंदर अध्यक्ष, विश्‍व हिंदू सेवा संघ

अयोध्या येथे प्रभु श्रीरामाचे मंदिर लवकरच बांधले जावे, अशी आमची मागणी आहे. आम्ही यासाठी संघटितपणे लढा देत राहू. लव्ह जिहाद, मंदिर सरकारीकरण, देवतांची विटंबना, धर्मांतर या हिंदूंवर होणार्‍या अन्यायाविरोधात प्रत्येक हिंदूने संघटित झाले पाहिजे.

राष्ट्राचे आधारस्तंभ असलेल्या पिढीला सक्षम आणि संस्कारक्षम बनवण्यासाठी हिंदु धर्मग्रंथ शालेय शिक्षणात शिकवले जावेत ! – दयानंद किलचे, शिक्षक

ज्याप्रमाणे माती ओली असतांना तिला आकार दिला जातो, तसेच विद्यार्थी अवस्थेत मुलांना संस्कारक्षम शिक्षण देणे महत्त्वाचे असते. सद्य:स्थितीला कॉन्व्हेंट शाळा आणि मदरशांतून त्या त्या धर्माचे शिक्षण दिले जाते; मात्र हिंदु धर्मग्रंथातील ज्ञान हे वैज्ञानिक आणि मनुष्याचे सर्वांगीण विकास करणारे असूनही त्याला विरोध होतो. राष्ट्राचे आधारस्तंभ असलेल्या पिढीला सक्षम आणि संस्कारक्षम बनवण्यासाठी हिंदु धर्मग्रंथ शालेय शिक्षणात शिकवले जावेत.

तीर्थक्षेत्री मद्य आणि मांस यांची खरेदी-विक्री, साठवणूक आणि वाहतूक यांवर बंदी घालावी ! – प्रसाद काळे, हिंदु जनजागृती समिती

तीर्थक्षेत्रे ही धार्मिक केंद्रे असून चैतन्याचा स्रोत आहेत. अशा ठिकाणी होत असलेली मद्यविक्री आणि मांसविक्री यांमुळे तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य न्यून होते. हिंदु धर्मात मद्यपान आणि मांसाहार हे पाप मानले जाते; म्हणून देशातील तीर्थक्षेत्री मद्य आणि मांस यांची खरेदी-विक्री, साठवणूक आणि वाहतूक यांवर बंदी घालावी.

या वेळी ‘वर्गमित्र संघटने’चे श्री. सुभाष सावंत आणि ‘शककर्ते शिवराज सेवा संस्थे’चे श्री. दीपक भंडारे यांनी सुद्धा आंदोलनातील मागण्यांना आपला पाठिंबा दर्शवला.

विशेष सहकार्य : ‘विश्‍व हिंदू सेवा संघा’चे मीरा-भाईंदर अध्यक्ष श्री. गणेश फडके यांनी आंदोलन यशस्वी होण्यासाठी सक्रीय सहभाग घेतला.

‘आंदोलनात घोषणा देऊ नका’, असे सांगणारे भाईंदर येथील पोलीस !

भाईंदर (प.) येथे आंदोलन चालू असतांना सहभागी हिंदुत्वनिष्ठ उत्स्फूर्तपणे प्रभु श्रीरामांविषयी आणि अन्य विषयावर घोषणा देत होते. या वेळी आंदोलनस्थळी येऊन पोलिसांनी सांगितले, ‘‘तुम्ही केवळ लोकांना स्वाक्षरी मोहिमेचे आवाहन करा. या घोषणा देऊ नका.’’ यावर आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठांनी ‘ज्या विषयावर आंदोलन आहे, त्या विषयावर आम्ही घोषणा देणार’, असे पोलिसांना ठामपणे सांगितले. आंदोलन संपेपर्यंत सर्वांनी स्वाक्षरी मोहिमेचे आवाहन करण्यासह उत्स्फूर्तपणे घोषणाही दिल्या. (सनदशीर मार्गाने आंदोलन करणार्‍यांना घोषणा देण्यापासून रोखणारे पोलीस ! न्यायालयाचा आदेश उल्लंघून ध्वनीप्रदूषण करणार्‍या मशिदींवरील भोंग्यांविषयी पोलिसांनी मुसलमानांना कधी जाब विचारला आहे का ? केवळ हिंदूंच्याच संदर्भात आक्षेप घेतला जातो, हा पोलिसांचा धार्मिक भेदभाव नव्हे काय ? हिंदू असंघटित असल्याचाच हा परिणाम आहे !  – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF