मकरसंक्रांतीच्या निमित्ताने लाखो भाविकांचे गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या पवित्र संगमावर पहिले स्नान !

कुंभमेळा प्रयागराज २०१९

प्रयागराज (कुंभनगरी), १४ जानेवारी (वार्ता.) – मकरसंक्रांतीच्या निमित्ताने देवनदी गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या पवित्र अशा त्रिवेणी संगमावर देशभरातील लाखो भाविकांनी स्नान करून पुण्य प्राप्त केले. पवित्र स्नान झाल्यावर भाविकांनी तेथेच पूजा मांडून गंगा, यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्यांची फुले-उदबत्ती वाहून आरती केली. स्नानानंतर सर्व भाविकांच्या तोंडवळ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद लपत नव्हता.

भाविक जनतेचे हे पहिले स्नान असले, तरी उद्या साधू, संत-महंत आणि आखाडे यांच्या पहिल्या राजयोगी (शाहीस्नान) स्नानाला पहाटेपासून प्रारंभ होणार आहे. साधू-संतांच्या स्नानानंतर सामान्य भाविकांचे स्नान होणार आहे. त्यासाठी आलेले लाखो भाविक आज कुंभमेळ्यातच तळ ठोकणार आहेत.

रात्रीपासूनच कडाक्याच्या थंडीत ‘हर हर महादेव’, ‘गंगामैया की जय’, ‘जय जय श्रीराम’, असा जयघोष करत लाखो भाविकांचे लोंढे प्रयागराजनगरीत प्रवेश करत होते. कडाक्याची थंडी असतांनाही भाविक उत्साहाने ८-१० कि.मी.चा पायी प्रवास करून त्रिवेणी संगमावर पोहोचत होते. भाविकांचा हा उत्साह पाहिल्यावर त्यांच्या पुढे प्रतिकूल काळही हतबल झाल्याचे दिसत होते. एवढ्या लांब पल्ल्याचा पायी प्रवास केल्यावरही कोणी थकल्याचे वा उत्साह अल्प झाल्याचे दिसत नव्हते.

कुंभमेळ्यात विदेशातून आलेल्या नागरिकांनीही संगमावर स्नान केले. त्यांतील काही जणांनी संगमावरच एक छोटेसे रिंगण करून सूर्यनमस्कार आणि अन्य योगासने केली. त्यानंतर कुंभमेळ्यात फेरफटका मारून कुंभमेळा पाहिला. काही विदेशी रामनामाचा जप करत होते, तसेच विविध ठिकाणी चालणार्‍या अन्नक्षेत्रांत जाऊन भंडार्‍याचा लाभ घेत होते. येथे वैशिष्ट्यपूर्ण सूत्र म्हणजे काटे-चमचे घेऊन नेहमी भोजन करणारे विदेशी नागरिक भारतियांप्रमाणे खाली मांडी घालून हाताने अन्नग्रहण करत होते.

लोक पवित्र स्नान झाल्यावर विविध आखाड्यांमध्ये जाऊन विशेषत: नागा साधूंना भेटून त्यांचा आशीर्वाद घेत होते.

दुपारच्या वेळेत कुंभमेळ्यात अचानकपणे सोसाट्याचा वारा सुटला. त्यामुळे अनेक ठिकाणी लावलेले मोठे होर्डिंग्ज वार्‍यामुळे खाली कोसळले.

कुंभमेळ्यातील काही चांगल्या घटना

१. कुंभमेळ्यात काही वयस्कर व्यक्तींना चालत येणे कठीण असल्यामुळे त्यांच्यासाठी तीनचाकी रिक्शांना संगमाच्या काही अंतरापर्यंत येण्यास अनुमती देण्यात आली होती.

२. पहिले स्नान असले, तरी पोलीस भाविकांशी फार सक्तीने न वागता त्यांना विविध मार्गांवरून येण्या-जाण्यास साहाय्य करत होते.

कुंभमेळ्यातील अपप्रकार

१. लाखोच्या संख्येने येणार्‍या भाविकांना लघुशंका करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची शौचालये जागोजागी उभारली आहेत; मात्र त्यांना आच्छादन न घातल्याने वाटेने येणार्‍या महिलांसाठी अडचणीचे ठरत होते.

२. प्रशासनाने संगम आणि संगम परिसरात लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय केली नाही. त्यामुळे अनेक घंटे चालून आलेले लोक तहानेने व्याकुळ झाले होते. ‘पाणी कुठे मिळेल ?’, असे ते विचारत होते.

३. कुंभमेळ्यात स्नानासाठी वाहनांना अनुमती नसतांना अनेक साधू-महंत स्वतःची चारचाकी वाहने घेऊन गर्दीच्या वाटेने जात होते. त्यामुळे नागरिकांची अडचण होत होती आणि पोलीस-प्रशासनही त्यांच्यापुढे हतबल झालेले दिसत होते.

कुंभमेळ्यातील सुरक्षाव्यवस्था

कुंभमेळ्यात सुरक्षेच्या दृष्टीने राज्याचे ६ सहस्र पोलीस, तर केंद्राच्या एन्डीआर्एफ्चेही सशस्त्र सैनिक नियुक्त होते.


Multi Language |Offline reading | PDF