एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका मायासम नाहस यांना फ्रान्समधील अध्यात्मप्रसाराच्या दौर्‍यात शिकायला मिळालेली सूत्रे आणि स्वतःत जाणवलेले पालट

मायासम नाहस या गेल्या दीड-दोन वर्षांपासून एस्.एस्.आर्.एफ्.च्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. साधनेअंतर्गत त्यांनी अध्यात्मप्रसाराच्या सेवेलाही आरंभ केला आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये फ्रान्स येथे अध्यात्मप्रसाराची सेवा करतांना त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि स्वतःत जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

मायासम नाहस

प.पू. गुरुदेव,

मला त्रास होत असल्याने मी एकटीच खोलीत बसले आहे. फ्रान्समधील प्रसार दौरा संपायला अजून २ दिवस शिल्लक आहेत. या प्रसारदौर्‍याच्या कालावधीत माझ्याकडून झालेल्या चुका, अयोग्य वर्तन आणि विचार लिहून काढायला आरंभ केला आहे; मात्र त्यामुळे माझी मनःस्थिती अत्यंत नकारात्मक झाली असून माझ्या डोळ्यांत पाणी येत आहे; पण तुम्ही मला ‘हे नकारात्मक लिखाण थांबव आणि प्रसार दौर्‍यात तुला जे काही शिकायला मिळाले, ते लिहून काढ’, असे सांगत आहात,’ असे मला सूक्ष्मातून जाणवत आहे. त्यानंतर ‘मला या प्रसारदौर्‍यात काय शिकायला मिळाले ?’, याचा विचार करतांना ‘मला पुष्कळ काही शिकायला मिळाले आहे’, असे माझ्या लक्षात आले. ही सर्व आपलीच कृपा आहे.

१. शिकायला मिळालेली सूत्रे

१ अ. ‘साधकांचे निरीक्षण करून त्यांच्याकडून शिकू शकतो’, असे जाणवणे आणि ‘ते साधनेतील ‘रिमाईंडर (आठवण करून देणारी गोष्ट)’ आहेत’, असे वाटणे : ‘प्रसार दौर्‍याच्या कालावधीत साधकांच्या समवेत रहायला मिळणे’, हा देवाचा आशीर्वादच आहे. प्रत्येक साधकाचे ‘स्वतःमधील अहं आणि स्वभावदोष नष्ट करून ईश्‍वरप्राप्ती करून घेणे’, हे एकच ध्येय आहे. त्यामुळे त्यांचे निरीक्षण करून आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. साधकांकडे पाहिल्यावर ‘ते माझ्यासाठी साधनेतील ‘रिमाईंडर (आठवण करून देणारी गोष्ट)’ आहेत’, असे मला वाटते.

१ आ. ‘स्वतःत ज्या गुणांचा अभाव आहे, ते सर्व गुण सहसाधकात आहेत’, हे लक्षात येणे आणि त्याच्याकडून पुष्कळ शिकता येणे : गुरुदेव, ‘प्रत्येक साधकाच्या प्रगतीसाठी काय आवश्यक आहे ?’, हे आपण जाणता. या प्रसार दौर्‍यात मी आणि गियोमदादा (श्री. गियोम ऑलिव्हिए) एकत्र होतो. सर्वांत आश्‍चर्याची गोष्ट, म्हणजे आमच्या स्वभावात पुष्कळ भिन्नता आहे. आमचे स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू एकमेकांच्या विरुद्ध आहेत. माझ्यात ज्या गुणांचा अभाव आहे, ते सर्व गुण मला त्यांच्यात पहायला मिळाले आणि त्यातून मला पुष्कळ शिकता आले.

१ इ. बोलण्याच्या संदर्भात शिकायला मिळालेली सूत्रे

१. ‘मानसिक स्तरावर न बोलता आध्यात्मिक स्तरावर बोलायला हवे, तसेच बोलण्यात तत्परता, नेमकेपणा आणि स्पष्टपणा असायला हवा’, हे माझ्या लक्षात आले.

२. हळू, शांत स्वरात आणि प्रेमाने बोलायला हवे; कारण बोलण्यातील चुकांमुळे वाईट शक्तींना आपल्याला त्रास देणे सोपे होऊ शकते.

१ ई. प्रत्येक कृती, उदा. हालचाल, हावभाव, खाणे-पिणे, चालणे, ही शांत आणि हळूवार व्हायला हवी; कारण ईश्‍वर चराचरात असून त्याचे तत्त्व सर्वत्र कार्यरत असते.

१ उ. इतरांविषयी प्रेमभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आनंद असल्याचे लक्षात येणे : ‘इतरांविषयी प्रेमभाव वाढवणे, इतरांची काळजी घेणे, ते साध्य करण्यासाठी स्वयंसूचना घेऊन त्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करणे, यांत पुष्कळ आनंद आहे’, हे हळूहळू समजू लागले. याविषयी प्रयत्न करतांना देवाने मला एक सुंदर अनुभूती दिली आणि मला त्यातून पुष्कळ आनंद मिळाला. त्यामुळे मला हे प्रयत्न वाढवण्यासाठी प्रेरणा मिळाली.

१ ऊ. इतरांनी मला महत्त्व न दिले वा ते माझ्याशी न बोलले, तरी मला आनंद व्हायला हवा, नाहीतर माझा अहं वाढू शकतो. त्यामुळे मला सतत विनम्र रहायला हवे.

१ ए. स्वयंसूचनांची सत्रे यांत्रिकपणे न करता ती भावपूर्ण आणि शरणागत भावाने ‘प्रत्येक चूक ईश्‍वराच्या चरणी समर्पित करत आहे’, अशा प्रकारे करायला हवीत.

१ ऐ. प्रसारातील प्रत्येक प्रसंग प.पू. गुरुदेवांच्या इच्छेने अन् नियोजनानेे घडत असणे आणि त्यामुळे गुरुदेवांवरील श्रद्धा हळूहळू वाढून ती चिरंतन बनणे : प.पू. गुरुदेव, प्रसारातील प्रत्येक प्रसंग तुमच्या इच्छेने आणि नियोजनानुसार घडतो. येथील प्रत्येक क्षण तुमच्या नियंत्रणात आहे. ‘प्रत्येक साधकाचे स्वभावदोष आणि अहं नष्ट होऊन त्याची तुमच्यावरील श्रद्धा वाढावी’, या दृष्टीने प्रसारातील प्रत्येक गोष्ट सुयोग्य प्रकारे घडत असते. ‘आपल्यावरील (प.पू. गुरुदेवांवरील) ही श्रद्धा हळूहळू वाढून ती चिरंतन बनते आणि त्यामुळे साधकांना सुरक्षित वाटते’, याची मला जाणीव झाली.

१ ओ. ‘निःस्वार्थपणे इतरांसाठी त्याग करणे’, हा अहं-निर्मूलन करण्याचा अत्यंत प्रभावी मार्ग आहे’, असे वाटणे : मी कुटुंबाव्यतिरिक्त इतरांसाठी जगायला शिकले आहे, जे मी यापूर्वी कधीही केले नव्हते. ‘कोणत्याही गोष्टीचा केवळ स्वतःपुरता विचार करण्याऐवजी निःस्वार्थपणे इतरांसाठी त्याग करणे, त्यांची काळजी घेणे’, हा अहं-निर्मूलन करण्याचा अत्यंत प्रभावी मार्ग आहे’, असे मला वाटते.

१ औ. ‘प्रवचनाला आलेला प्रत्येक जिज्ञासू प.पू. गुरुदेवांनी पाठवलेला असल्याने त्याच्याशी योग्य पद्धतीने वागायला हवे’, हे समजणे : व्याख्यानाला एक जरी जिज्ञासू उपस्थित असला, तरी ‘मी त्याच्याशी साधनेच्या दृष्टीने योग्य पद्धतीने वागायला हवे’, हे मला समजले; कारण तुम्हीच (प.पू. गुरुदेवांनी) त्याला येथे पाठवले असून आम्ही केवळ तुमचे दूत (माध्यम) आहोत. ‘आपण माझी प्रत्येक क्षणी किती काळजी घेत आहात !’, याची मला सतत जाणीव असते. ‘हे गुरूंचे कार्य असल्याने आपण जशी आमची काळजी घेता, त्या प्रकारे मलाही या जिज्ञासूशी चांगलेच वागायला हवे’, असे मला वाटते.

१ अं. व्यष्टी साधनेचे महत्त्व लक्षात येणे : मी व्यष्टी साधना उत्तम प्रकारे केली, तर माझे तुमच्याशी अनुसंधान राहील आणि मला सातत्याने भावावस्था अनुभवता येईल. त्यामुळे माझ्या सेवेत आध्यात्मिक दृष्टीने परिपूर्णता आणि इतरांविषयी प्रेमभाव असेल, तर या भावपूर्ण सेवेतून माझ्या चुका हळूहळू न्यून होत जातील आणि मला पुष्कळ नवीन सूत्रे शिकायला मिळतील.

१ क. एकटीने व्याख्यान घेतल्यावर अहं वाढल्याचे जाणवणे आणि ‘दोन साधकांनी एकत्रितरित्या व्याख्यान घेतल्यास शिकण्याचा भाग अधिक असतो’, हे लक्षात येणे : प्रसार दौर्‍याच्या कालावधीत एक व्याख्यान मी एकटीने घेतले. ‘मी ते चांगल्या प्रकारे सादर केले’, असे मला वाटले. आपले चैतन्य आणि अस्तित्व यांमुळेच ते व्याख्यान चांगले झाले. व्याख्यान संपल्यावर त्याविषयी चिंतन करतांना ‘या व्याख्यानाच्या वेळी माझा अहं वाढला होता’, असे माझ्या लक्षात आले. जेव्हा दोन साधक एकत्रितरित्या व्याख्यान घेतात, तेव्हा त्यात अधिक शिस्त असते. त्या वेळी एकमेकांकडून शिकण्याचा भाग अधिक असतो, शिकवण्याचा नसतो.

२. स्वतःत जाणवलेले पालट

२ अ. सहसाधकांनी चुका सांगितल्यावर अहं दुखावला जाणे आणि ‘साधनेत जलद प्रगती व्हावी’, यासाठी प.पू. गुरुदेवच त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत’, असा भाव ठेवणे : या कालावधीत सहसाधक मला माझ्याकडून झालेल्या चुका सांगत असत. त्या चुका स्वीकारतांना बर्‍याचदा माझा अहं पुष्कळ दुखावला जात असे. त्यामुळे निर्माण झालेल्या नकारात्मकतेमधून बाहेर पडण्यासाठी मी ‘माझ्यात सुधारणा व्हावी आणि सात्त्विक आचरण केल्यामुळे जलद आध्यात्मिक प्रगती व्हावी’, यासाठी प.पू. गुरुदेवच सहसाधकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत’, असा भाव ठेवत असे.

२ आ. प्रसार दौर्‍यावर असतांना स्वतःच्या अनुपस्थितीत ‘यजमान आणि मुलगा हेसुद्धा त्या परिस्थितीतून शिकत आहेत’, असा विचार मनात येऊन त्यांची काळजी न वाटणे : मी प्रसार दौर्‍यावर असतांना मला जसे शिकायला मिळत आहे, तसे ‘माझे यजमान आणि मुलगा हेसुद्धा या परिस्थितीतून शिकत आहेत’, असा विचार मनात येऊन मला त्यांची काळजी वाटत नसे. ‘माझ्याकडून त्यांच्या काही अपेक्षा आहेत आणि त्यामुळे मी घरी नसण्याने त्यांना काही काळ अडचणी येतीलही; पण ते त्यांना पुढे जाऊन आध्यात्मिक दृष्टीने लाभदायक ठरणार आहे’, असा विचार मी करत असे.

२ इ. ‘सत्संग घेणार्‍या साधकांपेक्षा आपल्याला परिस्थिती चांगली हाताळता येते’, अशी श्रेष्ठत्वाची भावना मनात असणे, त्या परिस्थितीतून गेल्यावर स्वतःलाही संघर्ष अन् नकारात्मकता यांना तोंड द्यावे लागणे आणि ‘साधकांविषयी प्रतिक्रिया व्यक्त करण्यापेक्षा साधकांच्या संघर्षातून शिकायला हवे’, हे लक्षात येणे : सत्संग घेणार्‍या साधकांविषयी माझ्या मनात प्रतिक्रिया येत असत आणि मी त्यांच्याविषयी निष्कर्ष काढत असे. ‘मला त्यांच्यापेक्षा परिस्थिती चांगली हाताळता येते’, अशी श्रेष्ठत्वाची भावना माझ्या मनात असायची. जेव्हा मला त्या परिस्थितीतून जावे लागले, तेव्हा मलाही त्यांच्याप्रमाणेच संघर्ष आणि नकारात्मकता यांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे ‘त्यांच्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करणे अयोग्य आहे’, हे मला समजले. ‘साधकांच्या जीवनातील संघर्ष हे त्यांच्या प्रगतीसाठी असलेले ईश्‍वरी नियोजन आहे’, याची मला जाणीव झाली. प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कठीण काळातून जावेच लागते; पण ते त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक असते. ‘साधकांविषयी प्रतिक्रिया व्यक्त करण्यापेक्षा ईश्‍वरप्राप्तीचे ध्येय गाठण्यासाठी साधक ज्या तळमळीने कठीण परिस्थितीशी संघर्ष करत आहेत, त्यातून मी शिकायला हवे’, हे मला समजले.

२ ई. माझ्या जीवनात आपण दिलेल्या प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीविषयी मला कृतज्ञता वाटू लागली आहे.

२ उ. आसक्ती न्यून होणे : माझ्या जीवनातील प्रत्येक लहान-सहान गोष्टीची तुम्ही काळजी घेत आहात. आपणच ‘माझ्या जीवनात काय आवश्यक आहे ?’, हे जाणता. त्याच वेळी आपण मला ‘कोणत्या गोष्टी अनावश्यक आहेत ?’, हेही दाखवून देत आहात. त्यामुळे एके काळी ज्या वस्तू वा व्यक्ती मला पुष्कळ प्रिय होत्या, त्यांच्याविषयीची माझी आसक्ती आता हळूहळू न्यून होत आहे.

२ ऊ. ‘आजारांचा बाऊ न करता त्यांचा शांतपणे आतून स्वीकार केल्यास खर्‍या अर्थाने आध्यात्मिक प्रगती होईल’, याची जाणीव होणे : प.पू. गुरुदेव, इतरांचे त्रास आणि संघर्ष पाहून आपण मला जे जीवन दिले आहे, त्याविषयी मला कृतज्ञता वाटते. मला होणारे लहान-सहान आजार, जे मला आधी पुष्कळ मोठे वाटत होते, त्यांना आता मी माझ्या आध्यात्मिक प्रगतीचे मापदंड मानते. ‘ज्या दिवशी मी या आजारांचा बाऊ न करता त्यांचा शांतपणे आतून स्वीकार करीन, त्या वेळी खर्‍या अर्थाने माझी आध्यात्मिक प्रगती झाली’, असे मला वाटेल.

२ ए. ‘साधकाच्या जीवनात गुरूंचे अस्तित्व आणि त्यांचा आशीर्वाद यांचे महत्त्व काय ?’, हे खर्‍या अर्थाने समजणे : ‘गुरूंचे आम्हा साधकांच्या आयुष्यात येणे, ते करत असलेले स्मितहास्य आणि त्यांनी केलेला शिष्याच्या प्रगतीचा संकल्प, यांमुळे साधकाचे जीवन कसे पालटते ?’, हे मला समजले आहे. ‘खरेच, त्यानंतर सर्वकाही पालटते’, हे मी स्वतः अनुभवले आहे. आपल्या एका सहज स्मितहास्याने माझ्या जीवनात आमूलाग्र पालट झाला. तुमच्या कृपेविना हा पालट होणे कधीच शक्य नव्हते गुरुदेव ! नाहीतर माझ्या जीवनातील काळोख कधीच संपला नसता.

२ ऐ. ‘स्वतःला किती येते ?’, हे बोलून दाखवण्यापेक्षा सर्वांचे ऐकून घेऊन त्यांच्याकडून शिकण्याकडे लक्ष केंद्रित करायला हवे’, याची जाणीव होणे : मला सहसाधकांकडून साधनेविषयी पुष्कळ शिकायला मिळाले. ‘अध्यात्मात शिकण्यासारखे पुष्कळ आहे आणि ते आपण केवळ एकमेकांकडून, स्वतःकडून, साधकांकडून शिकू शकतो’, हे माझ्या लक्षात आले. पूर्वी ‘मला पुष्कळ ठाऊक आहे’, असे वाटत असे आणि त्यामुळे माझ्यात अहंकार होता. या दौर्‍यामुळे ‘अध्यात्मातील माझे ज्ञान तोकडे आहे’, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे ‘मला किती येते ?’, हे बोलून दाखवण्यापेक्षा मी सर्वांचे ऐकून घेऊन त्यांच्याकडून शिकण्याकडे लक्ष केंद्रित करायला हवे’, हे मला समजले.

२ ओ. साधनेत येण्यापूर्वी जड वस्तू उचलण्याचा प्रसंग न येणे, प्रसारानिमित्त आगगाडीने प्रवास करावा लागणे, त्या वेळी पुष्कळ जड सामान उचलावे लागणे अन् त्या परिस्थितीतही आनंदी आणि हसतमुख असणे : साधनेत येण्यापूर्वी माझ्या हातातील पिशवीव्यतिरिक्त (हँडबॅगव्यतिरिक्त) इतर जड वस्तू उचलण्याचा प्रसंग आला नाही. असे असूनही तेव्हा मी कधीच आनंदी नव्हते. मी सतत निराशेत असायचे. माझ्या आयुष्याला काहीही ध्येय नव्हते. मी नेहमी आनंदाच्या शोधात धावत होते; परंतु तो आनंद माझ्यापासून पुष्कळ दूर होता. साधनेत आल्यानंतर प्रसारकार्याच्या निमित्ताने आम्हाला आगगाडीने प्रवास करावा लागायचा. या काळात माझ्या संपूर्ण आयुष्यात उचलले नव्हते, एवढे वजन मी उचलले. माझे स्वतःचे जड सामान, माझ्या २ – ३ पिशव्या, ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांनी भरलेली खोकी उचलून न्यावी लागत होती. याही परिस्थितीत मी कित्येक घंटे आनंदात असायचे. प.पू. गुरुदेव, त्या वेळी ‘मी आपली सेवा करत आहे’, या भावाने माझे मन आनंदाने भरून जात असे. ‘आपल्याला माझा अभिमान वाटावा; म्हणून अजून सामान उचलावे’, असे मला वाटत असे. त्या काळात कोणत्याही परिस्थितीत मी हसतमुख असे. आपणच माझ्या मनात हा भाव निर्माण करून मला ही शक्ती दिलीत.

२ औ. ‘साधनेतील चांगले प्रयत्न पाहून गुरुदेवांनी काहीतरी द्यावे’, असे वाटणे आणि ‘हे विचार साधनेसाठी घातक आहेत तसेच स्वतःला हव्या असलेल्या गोष्टी न मिळाल्यास झालेला मनोलय हे गुरुदेवांनी दिलेले खरे बक्षीस असेल’, हे लक्षात येणे : प.पू. गुरुदेव, मला नेहमी वाटत होते, ‘माझे साधनेतील चांगले प्रयत्न पाहून तुम्ही मला अशी गोष्ट द्याल, जी मला हवी असेल आणि माझ्यासाठी आवश्यक असेल अन् ती माझ्यासाठी तुम्ही दिलेले बक्षीस असेल’; मात्र ‘असे विचार माझ्या प्रगतीला हानीकारक आहेत. त्याने माझा अहं आणि अपेक्षा वाढतील अन् परिणामस्वरूप मी प्रगतीपासून दूर राहीन’, हेेे माझ्या लक्षात आले. मला ज्या गोष्टी हव्या असतील आणि त्या जेव्हा मला मिळणार नाहीत, तेव्हा माझा मनोलय होईल. माझा मनोलय हेच तुमच्याकडून मला मिळालेले खरे बक्षीस असेल.

२ अं. कठीण प्रसंग स्वीकारणे जड जाणे, मनात साधनेविषयी नकारात्मक विचार येणे, प.पू. गुरुदेवांना अंतःकरणातून अनुभवायच्या विचारांनी पुन्हा शक्ती मिळाल्याने नकारात्मकता सहन करता येणे : प.पू. गुरुदेव, कठीण प्रसंग स्वीकारणे मला पुष्कळ जड गेले. त्यामुळे माझा अहं इतका दुखावला जात होता की, काही वेळा माझ्या मनात ‘साधना करणे थांबवावे’, असे विचार येत होते. ‘पुष्कळ प्रयत्न करूनही मी दुःखी आणि त्रासात का आहे ?’, असे वाटून मला राग येत असे. ‘मला परिस्थिती सहजपणे स्वीकारता येत नाही. त्यामुळे माझी प्रगती दूर आहे’, असे विचार माझ्या मनात येत असत. त्यानंतर ‘तुम्ही माझ्या आयुष्यात असणे, तुम्हाला अंतःकरणातून अनुभवणे आणि एक दिवस तुमच्याशीच एकरूप होणे’, या विचारांनी मला पुन्हा शक्ती मिळत असे. केवळ तुमची होण्यासाठी मला सर्व नकारात्मकता सहन करता येऊ लागली आहे.

३. प.पू. गुरुदेवांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

खरेतर आपल्या ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेच्या या दैवी कार्यात माझ्या सेवेची काही आवश्यकता नाही, तरीही ‘आपण मला ही सेवा करण्याची संधी दिलीत आणि तुमच्या कार्यातील छोटासा भाग म्हणून मला निवडले’, याचा मला पुष्कळ आनंद वाटतो. ‘आपल्या कृपेनेच मी या दैवी कार्यात खारीचा वाटा उचलू शकत आहे’, यासाठी मी कृतज्ञ आहे.

– मायासम नाहस (नोव्हेंबर २०१८)          (समाप्त)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF