‘मकरसंक्रांतीला काळा रंग वापरणे’ याविषयी ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता जोशी यांनी केलेले ज्योतिषशास्त्रीय विश्‍लेषण आणि याविषयी श्री गुरुतत्त्वाने दिलेले सूक्ष्म-ज्ञान !

१. मकरसंक्रांतीच्या दिवशी वातावरणात रज-सत्त्व कणांचे प्राबल्य असल्याने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने त्रास न होणे आणि यामुळेे मकरसंक्रांतीला काळा रंग वापरण्याची अनुमती दिलेली असणे

सौ. प्राजक्ता जोशी

‘सनातन धर्मात काळ्या रंगाला अशुभ रंग मानले आहे; कारण या रंगात वातावरणातील तमोगुणी कण ग्रहण करण्याची क्षमता सर्वांत अधिक असते; परंतु मकरसंक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घातले, तरी त्या वस्त्राचा आपल्याला त्रास होत नाही. याचे कारण या दिवशी वातावरणात रज-सत्त्व कणांचे प्राबल्य असते. त्यामुळे याच दिवशी काळा रंग वापरण्याची अनुमती सनातन धर्माने आपल्याला दिली आहे. यावरून ‘सनातन धर्माने ठरवलेली प्रत्येक गोष्टच अध्यात्मशास्त्राला किती धरून आहे ?’, याची साक्ष पटते.’ – श्री गुरुतत्त्व (१४.१.२००४, दुपारी ३.३३)

२. मकरसंक्रांतीला काळा रंग वापरण्याची अनुमती का असते ?

‘खरेतर भारतीय संस्कृतीत काळा रंग अशुभ मानला जातो. काळे कपडे परिधान करून साजरा केला जाणारा ‘मकरसंक्रांत’ हा एकमेव सण आहे. मकरसंक्रांत हा सण तिथीवाचक नसून अयनवाचक आहे. या दिवशी सूर्याचे निरयन मकर राशीत संक्रमण होते. या वर्षी मकरसंक्रांत १५ जानेवारीला आहे. संक्रांतीपासून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून उत्तरायणाला आरंभ होतो. उत्तरायणात सूर्यदेवतेची उपासना करण्याचा प्रघात आहे. मकर रास ही शनि ग्रहाशी संबंधित आहे. शनीला कृष्ण वर्ण प्रिय आहे. काळा रंग हा सर्वसमावेशक आहे, तसेच काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. त्यामुळे काळे वस्त्र धारण केल्याने उबदारपणा जाणवतो.’

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.१.२०१९)

अ. आरोग्यशास्त्रानुसार : ‘हेमंत ऋतूमध्ये येणार्‍या मकरसंक्रांतीच्या सणाच्या काळात हिवाळा असल्याने शरिराला उष्णता मिळण्यासाठी काळी वस्त्रे घालतात. काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. त्यामुळे काळे वस्त्र धारण केल्याने उबदारपणा जाणवतो. या सणाला तिळगूळ खाण्यानेही उष्णता मिळते.

आ. ज्योतिषशास्त्रानुसार : मकरसंक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर रास ही शनि ग्रहाशी संबंधित आहे. श्री शनिदेवाला कृष्ण वर्ण प्रिय आहे. यामुळे रज-सत्त्व कणांचे प्राबल्य असले, तरी सूर्याचे ‘मकर’ या शनीच्या राशीत प्रवेश करण्याच्या संधीकाळात काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्यावर श्री शनिदेवांची कृपा संपादन झाल्याने त्रास होत नाही.

इ. सौंदर्यशास्त्रानुसार : या दिवशी लहान मुलांना बोरन्हाण आणि गरोदर स्त्रियांना ओटी भरतांना हलव्याचे दागिने घालतात. काळ्या रंगाच्या कपड्यांवर हलव्याचे दागिने उठून दिसतात.’

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF