कै. योगेश व्हनमारे यांची मृत्यूत्तर आध्यात्मिक उन्नती घडवून आणणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘मार्गशीर्ष शुक्ल पक्ष अष्टमी (१५.१२.२०१८) या दिवशी रात्री १० वाजता हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश राज्याचे समन्वयक म्हणून कार्यरत असलेले श्री. योगेश व्हनमारे (वय ४० वर्षे) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने उज्जैन (मध्यप्रदेश) येथे निधन झाले. १८.१२.२०१८ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये त्यांच्या निधनाच्या बातमीसहित त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. मी हे छायाचित्र पाहिल्यावर त्यांच्या तोंडवळ्यावर मृत्यूची छाया पडल्यामुळे मला त्यांचा तोंडवळा काळसर रंगाचा दिसत होता. १८.१२.२०१८ या दिवशी मिळालेल्या ज्ञानामध्ये ‘योगेश व्हनमारे यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांची आध्यात्मिक पातळी ५८ टक्के होती आणि काही दिवसांतच ती ६१ टक्के होणार आहे’, असे देवाने मला सांगितले होते. त्याप्रमाणे २४.१२.२०१८ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये ‘कै. योगेश व्हनमारे यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे’, हे प्रसिद्ध झालेले वृत्त माझ्या वाचनात आले. या वृत्तामध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या छायाचित्रातील त्यांचा तोंडवळा उजळ आणि तेजस्वी दिसत होता. त्यांच्यामध्ये हा पालट अवघ्या ९ दिवसांमध्ये झाला होता, याविषयी मला पुष्कळ आश्‍चर्य वाटले.

अ. परात्पर गुरु डॉ. आठवलेरूपी गुरुमाऊली केवळ पृथ्वीवरील साधकांचीच नव्हे, तर ब्रह्मांडात कोणत्याही लोकांत वास करणार्‍या साधकांची सर्वतोपरीने काळजी घेतात; कारण ते ‘१४ भुवनांचे (सप्तलोक आणि सप्तपाताळ यांचे) अधिपति’ आहेत.

आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे कै. योगेश व्हनमारे यांची अवघ्या ९ दिवसांत (१५ ते २४ डिसेंबर) ३ टक्के आध्यात्मिक पातळी वाढली. यावरून परात्पर गुरु डॉ. आठवले साधकाची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी त्याला मनुष्य जन्मात मार्गदर्शन करतात, तसेच एखाद्या साधकाचे निधन झाले, तर त्याचा पुढील जन्म होण्यापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले त्याच्या लिंगदेहाला मार्गदर्शन करून त्याच्याकडून विविध लोकांमध्ये साधना करवून घेतात आणि त्याची आध्यात्मिक उन्नतीही करवून घेतात’, हे वरील उदाहरणातून सिद्ध झाले.

इ. परात्पर गुरु डॉ. आठवले हयात असणारे आणि दिवंगत झालेल्या साधकांच्या लिंगदेहांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण करतात. त्यामुळे साधक कोणत्याही लोकांत निश्‍चिंतपणे आणि सुरक्षितपणे राहून साधना करू शकतात.

ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना गुरुकृपायोगानुसार व्यष्टी साधनेच्या अंतर्गत ‘अष्टांग साधना’ शिकवली आहे. त्यामुळे साधकांकडून झालेल्या चुकांमुळे त्यांना लागलेल्या पापासाठी साधकांनी क्षमायाचना करून प्रायश्‍चित्त घेतल्यावर त्यांच्या पापाचे क्षालन होते. अशा प्रकारे ‘चित्रगुप्ताने साधकांच्या प्रत्येक कर्माचा हिशोब ठेवला, तरी साधक पाप किंवा पुण्य या कर्मांतून मुक्त होऊन उच्च लोकांमध्ये जातात’, हे कै. योगेश व्हनमारे यांच्या उदाहरणातून दिसून आले. यावरून ‘परात्पर गुरु माऊलीने शिकवलेली साधना किती अचूक, परिपूर्ण आणि सर्वतोपरीने कल्याणकारी आहे’, हेच शिकायला मिळते.

उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना गुरुकृपायोगांतर्गत ‘समष्टी साधना’ शिकवली आहे. त्यामुळे मृत्यूनंतर साधकांचे लिंगदेह कोणत्याही लोकांत गेले, तरी त्यांच्याकडून धर्मप्रसार, धर्मरक्षण, धर्मसंघटन आणि अध्यात्मप्रसार अशी समष्टी साधना चालू रहाते. त्यामुळे विविध लोकांमध्ये गेलेल्या साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होऊन ते पुढच्या पुढच्या लोकांत जातात.

देवाच्या चरणी कृतज्ञता आणि प्रार्थना ! : ‘हे भगवंता, तू आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवलेरूपी परात्पर गुरु, ज्ञानगुरु आणि मोक्षगुरु देऊन आमच्यावर कृपावर्षाव केलास आणि आमचा उद्धार केलास’, यासाठी आम्ही तुझ्या चरणी कृतज्ञ आहोत. ‘या मोक्षगुरूंनी सांगितलेली साधना आमच्याकडून मनापासून आणि भावपूर्ण होऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१२.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF