पाकला संवेदनशील माहिती पुरवणार्‍या सैनिकास अटक

‘आयएस्आय’च्या महिला हेराने सैनिकाला ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून मिळवली माहिती !

  • राजकारणी भ्रष्टाचार करतात, पोलीस चोर सोडून संन्याशाच्या मागे लागतात, प्रसारमाध्यमे स्वतःच्या तुंबड्या भरतात, न्यायालयांत खटले वर्षानुवर्षे प्रलंबित रहातात, सीबीआयसारख्या सर्वोच्च अन्वेषण यंत्रणा गुन्हेगारांना साहाय्य करतात आणि उरली-सुरली आशा असलेल्या सैन्यदलातील काही सैनिक शत्रूराष्ट्राला साहाय्य करतात ! यावरून लोकशाहीत सामान्य जनतेला कोणीच वाली नाही, हे सिद्ध होते ! यास्तव लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र हवे !
  • दिवसेंदिवस ‘हनीट्रॅप’च्या घटना उघड होत असतांना त्यावर कठोर उपाययोजना न काढणार्‍या सरकारच्या हातात देश कसा सुरक्षित रहाणार ?

जैसलमेर (राजस्थान) – आयएस्आयच्या ‘हनीट्रॅप’मध्ये (हनीट्रॅप म्हणजे शत्रूराष्ट्राच्या महिला हेरांनी गोपनीय माहिती मिळवण्यासाठी सैनिकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मोहजालात ओढणे) अडकून पाकला सैन्यदलाची संवेदनशील माहिती पुरवणार्‍या सैनिकाला ११ जानेवारी या दिवशी राजस्थान पोलिसांनी जैसलमेर येथून अटक केली. सोमवीर असे त्याचे नाव आहे. आयएस्आयच्या हेरगिरी करणार्‍या एका महिलेच्या जाळ्यात अडकलेला सोमवीर सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे पाकला ही माहिती पुरवत होता. त्यासाठी त्याला पाकने पैसेही पुरवले होते. अटक केल्यानंतर त्यास जयपूर येथे आणून त्याची चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्याने पाकला माहिती पुरवल्याची स्वीकृती दिली आहे. न्यायालयाने त्यास १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली.

१. या संदर्भात राजस्थानचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक उमेश मिश्र यांनी सांगितले की, सोमवीर पाकला भारतीय सैन्याची माहिती पुरवत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे विशेष पथक आणि सैन्यदलाचा गुप्तचर विभाग त्याच्यावर पाळत ठेवून होते. तो पाकला माहिती पुरवत असल्याची खात्री पटताच त्याला अटक करण्यात आली.

२. सोमवीर याची प्रशिक्षणाच्या काळात या महिलेशी ओळख झाली होती.

त्याची प्रथम नगर (महाराष्ट्र) आणि त्यानंतर राजस्थानमधील जैसलमेर येथे नियुक्ती झाल्यावरही तो त्या महिलेच्या संपर्कात होता. या कालावधीत त्याने ‘व्हॉटस्अ‍ॅप’द्वारे या महिलेला नगर येथील सैन्यतळ आणि जैसलमेर येथील ‘अर्जुन’ या स्वदेशी रणगाड्याच्या कवायती यांविषयीचे चलचित्र अन् माहिती पुरवली होती.

३. स्वत:ला ‘नर्सिंग सर्व्हिस’ची कॅप्टन असल्याचे सांगणारी ही महिला सोमवीरसह अन्य काही सैनिकांनाही स्वत:च्या जाळ्यात ओढण्याच्या प्रयत्नात होती, असे सांगण्यात आले. सोमवीर याच्या भ्रमणभाषमध्ये तिची नग्न छायाचित्रेही आढळून आली.


Multi Language |Offline reading | PDF