शंखवाळी येथील पुरातत्व खात्याच्या जागेतील फेस्तच्या आयोजनाच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका !

शासन पुरातत्व खात्याच्या १०० मीटर जागेत कोणतेही खोदकाम करणार नसल्याची अ‍ॅडव्होकेट जनरलची न्यायालयाला ग्वाही !

पणजी, १३ जानेवारी (वार्ता.) – चर्च संस्थेने शंखवाळी (सांकवाळ) येथे पुरातत्व खात्याच्या जागेत (पूर्वी श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेले ठिकाण) अनधिकृतपणे उभारलेल्या अवर लेडी ऑफ हेल्थ चॅपल येथे फेस्तचे आयोजन केले आहे. या पुरातत्व खात्याच्या जागेत कोणताही कार्यक्रम, बैठका किंवा फेस्त यांचे आयोजन करण्यास मनाई करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका बहुतांश स्थानिक ख्रिस्ती आणि काही हिंदु नागरिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात प्रविष्ट केली आहे. उच्च न्यायालयाने ‘पुरातत्व खात्याच्या जागेत कोणतेही खणण्याचे काम केले जाणार नाही, याची शासनाने दक्षता घ्यावी’, असा आदेश शासनाला दिला आहे. शासन पुरातत्व खात्याच्या जागेत १०० मीटरमध्ये कोणतेही खोदकाम करणार नसल्याची ग्वाही राज्याच्या अ‍ॅड्व्होकेट जनरल यांनी न्यायालयाला दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ जानेवारीला होणार आहे.

सविस्तर वृत्त असे की, स्थानिक ख्रिस्ती आणि हिंदू, तसेच ‘नीज गोंयकार’ ही अशासकीय संघटना यांचा विरोध डावलून चर्च संस्था गेल्या वर्षीपासून सेंट जोसेफ वाझ यांचे फेस्त अवर लेडी ऑफ हेल्थ चॅपल या पुरातत्व खात्याच्या जागेत भरवत आहे. वास्तविक हे फेस्त गेली ४०० वर्षे शिंदोळी, सांकवाळ या ठिकाणी होत असे. न्यायालयात याचिकादारांच्या वतीने अधिवक्ता सुबोध कंटक म्हणाले, ‘‘अवर लेडी ऑफ हेल्थ चॅपल’ ही एक पुरातन वास्तू आहे, तरीही या ठिकाणी गतवर्षी खणण्याचे काम करण्यात आले आणि याविषयी अनेकांनी शासनाकडे तक्रारीही केलेल्या आहेत.’’ या प्रकरणी ‘आर्चडायोसेसन ऑफ गोवा, शिंदोळी येथील चर्चचे फादर, शासकीय खाते यांना प्रतिवादी बनवण्यात आले आहे. ही पुरातत्व खात्याची जागा ‘आर्किओलॉजिकल साईट्स अ‍ॅण्ड रिमेन्स अ‍ॅक्ट, १९७८ अ‍ॅण्ड रूल्ड १९८०’ या कायद्याखाली कह्यात घेण्याचा आदेश पुरातत्व खात्याला देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF