कुंभदर्शन

भगवंताप्रतीच्या हृदयस्थ भावाचे दर्शन घडवणारा भक्तीकुंभ !

हिंदु धर्मातील विविधता, विशालता, सर्वसमावेशकता, एकता आणि अखंडता यांचे सर्वांगसुंदर दर्शन घडवणारा जगाच्या पाठीवर एकमेव असलेल्या ‘कुंभमेळ्या’स आजपासून प्रारंभ होत आहे. त्या निमित्ताने ‘कुंभदर्शन’ हे विशेष सदर आरंभ करण्यात आम्हाला विशेष आनंद होत आहे. या सदराच्या माध्यमातून आमच्या वाचकांना प्रयागराजचे स्थलदर्शन, कुंभमेळ्यातील विविध आखाडे, त्यांची पेशवाई मिरवणूक (शोभायात्रा), संत-महंतांचे दर्शन, त्रिवेणी संगमावर भक्तीभावाने स्नान करण्यासाठी आलेल्या हिंदूंच्या तोंडवळ्यावरील उत्कट भाव, हिंदु धर्माची ख्याती ऐकून साता समुद्रापलीकडून येणार्‍या विदेशी लोकांचा सहभाग आदींचे छायाचित्रण अन् वैशिष्ट्यपूर्ण माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल.

यातून वाचकांना हिंदु धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व आणि साधना करणे का आवश्यक आहे, हे उमगेल. या सदरामुळे आपल्याला घरबसल्या भक्तीभावाचा किंचित्सा अनुभव अवश्य येईल. असे असले, तरी या कुंभमेळ्याच्या पवित्र काळात हिंदूंनी साधना करण्याचा संकल्प करावा; कारण आगामी आपत्काळात ही साधनाच आपल्याला तारणार आहे, हे निश्‍चित !

श्री. आनंद जाखोटिया, कुंभमेळा विशेष प्रतिनिधी, सनातन प्रभात

‘कुंभ ! विश्‍वातील सर्वांत मोठा धार्मिक मेळा ! आजपासून प्रयागराज येथे कुंभमेळ्यास प्रारंभ होत आहे. प्रशासनाचे विविध विभाग गेल्या १ वर्षापासून याच्या आयोजनात जोमाने कार्यरत आहेत. जानेवारी मासाच्या प्रारंभीपासून विविध आखाडे, संप्रदाय आणि संस्था कुंभक्षेत्री त्यांचे मंडप उभारण्यासाठी दाखल झाल्या आहेत. या मंडपांना ‘शिबीर’ किंवा ‘पंडाल’, या नावाने येथे ओळखले जाते. काही शिबिरात ‘भंडारा-भजन’, काही ठिकाणी ‘प्रवचन-सत्संग’, काही ठिकाणी ‘कथा’, तर काही ठिकाणी ‘ध्यान-योग’ यांचे आयोजन चालू झाले आहे. प्रत्येकजण श्रद्धेने आणि भक्तीने आपली गुरुपरंपरा पुढे नेत आहे.

काळाच्या कसोटीवर टिकलेल्या सनातन धर्माच्या उपासना !

कुंभाच्या प्रारंभीपासूनच प्रत्येक शिबिरातून नि चहूबाजूंनी भक्तीचे सूर ऐकू येत आहेत. प्रत्येकाच्या तोंडवळ्यावर गंगानदीच्या काठावरील वास्तव्याचा आणि उपासनेचा आनंद दिसून येत आहे. कुठे नामसंकीर्तन, कुठे भजन, कुठे वेदमंत्रपठण, कुठे आरत्या, कुठे पदयात्रा यांनी अवघे वातावरण भक्तीमय बनले आहे. टाळ, ढोलक, पेटी, झांझ यांच्या निनादात चालणार्‍या या भक्तीचा आनंद ‘डॉल्बी’ लावून मिळत नाही, हे भाविक येथे अनुभवत आहेत.

कुंभच्या विशाल क्षेत्रातून पदभ्रमण करतांना प्रत्येक २०-३० पावलागणिक लागलेल्या विविध मंडपांमध्ये भक्तीचा वेगवेगळा आविष्कार पहायला मिळतो आणि सनातन धर्माच्या विशाल वटवृक्षातील एकेक फांदीची ओळख होते. रस्त्यावरून जाणारे भाविकांचे जत्थेही भजन किंवा पारंपरिक गीते म्हणत देवाला आळवत आहेत. सनातन धर्मातील विविध उपासनापद्धतींचे दर्शन कुंभक्षेत्री घडते. अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींनी प्रारंभ केलेल्या उपासनापद्धतींना काळाच्या ओघातही अनुयायी लाभतात, हे त्या परंपरा चिरंतन असल्याचे स्पष्ट करतात.

सनातन धर्माला अक्षय ठेवणारी गुरु-शिष्य परंपरा !

हिंदु धर्मावर अनेक संकटे आली; पण हा सनातन धर्म अक्षय का राहिला, हे प्रत्येकाच्या हृदयापासून चालणार्‍या भक्तीला पाहिले की लक्षात येते. स्वामी विवेकानंद एकदा म्हणाले होते, ‘‘भारत ईश्‍वराच्या शोधात रत राहिला, तर अमर होईल; पण राजकारणाच्या घाणीत लोळत राहिला, तर त्याचा विनाश अटळ आहे.’’ आज राजकारणाच्या घाणीतही भारताचे अस्तित्व का टिकून आहे, हे कुंभमेळ्यात आलेल्या भाविकांच्या ईश्‍वर शोधासाठी चाललेल्या उपासनेला पाहून लक्षात येते. कुंभनगरी पाहिल्यावर हेच वाटते की, कुंभ एक घागर आहे. अशी घागर ज्यात सागर सामावून गेला आहे. भक्तीरसाची जितकी विविधता आणि विशेषता आहे, ती येथे एकत्र आहे. आज तणावात जीवन जगणार्‍या शहरातील नागरिकांनी अवश्य कुंभक्षेत्राचे दर्शन घ्यावे. निश्‍चितच येथील भक्तीचा ओलावा त्यांना जगण्याचा नवीन मार्ग दाखवल्याविना रहाणार नाही. हा मार्ग दाखवणार्‍या गुरु-शिष्य परंपरेच्या प्रती आपण कृतज्ञ रहायला हवे. ‘राष्ट्राचा आत्मा धर्म आहे’, असे म्हटले जाते. या आत्म्याला जिवंत ठेवणार्‍या गुरु-शिष्य परंपरेच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो.’

(श्री. आनंद जाखोटिया हे हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांचे समन्वयकही आहेत.)


Multi Language |Offline reading | PDF