किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त शास्त्रीय गायन सादर करतांना श्री. प्रदीप चिटणीस यांना गायनापूर्वी झालेले त्रास आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर अभिव्यक्त झालेली अजोड स्वराकृती !

संगीत सदर

ईश्‍वरप्राप्तीसाठी कला

प.पू. देवबाबा

१. गायनापूर्वी झालेले त्रास

१ अ. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सर्दीचा त्रास होऊ लागल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मनोमन प्रार्थना केल्यावर त्यांनी सांगितलेला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करणे आणि अंगात ताप असतांनाच गोव्याहून कर्नाटकपर्यंतचा प्रवास करणे : ‘१४.१२.२०१८ या दिवशी प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात जाण्यासाठी मी आगगाडीत बसल्यावर मला लगेचच सर्दी झाली. एरव्ही माझी सर्दी ८ – १० दिवस रहाते आणि पहिले ३ – ४ दिवस तिचा जोर अधिक असतो. त्या वेळी कोणत्याही औषधाचा सर्दीवर काहीच परिणाम होत नाही. यामुळे ‘आता कार्यक्रमाच्या वेळी कसे होणार ?’, असे काळजीचे विचार माझ्या मनात येऊ लागले. तेव्हा मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मनोमन प्रार्थना केली आणि त्यांनी सांगितलेला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू ठेवला. नंतर मला काही प्रमाणात बरे वाटू लागले. मी रात्री ठाण्याहून गोव्याला पोेचलो. तेव्हा माझ्या अंगात ताप होता. रात्री झोपण्यापूर्वी मी औषध घेतलेे, तरी सकाळी माझ्या स्थितीत विशेष पालट न झाल्याने तशा आजारपणातच मी कर्नाटकपर्यंतचा प्रवास केला.

१ आ. प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात पोहोचल्यावर थोडे बरे वाटून गायनाच्या सरावाच्या वेळी आवाज थोडा सुधारणे; पण रात्री पुन्हा ताप भरणे : सायंकाळी प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात प्रवेश करताच पुष्कळ चैतन्य जाणवून मला थोडे बरे वाटू लागले. तेथे गायनाचा सराव केल्यावर ‘माझा आवाज थोडा सुधारला आहे’, असे जाणवून मला थोडे आशेचे किरण दिसू लागले; परंतु रात्री पुन्हा ताप भरला. सकाळी उठल्यावरही फारसे बरे वाटत नव्हते.

२. गायनाचा कार्यक्रम चालू होण्यापूर्वी आश्रमातील सर्व गायींना नमस्कार करून प्रार्थना केल्यावर ‘मुरली’ नावाच्या बैलाने हंबरून सकारात्मक प्रतिसाद देणे

या आश्रमातील गायी आणि इतरत्रच्या गायी यांच्यामध्ये पुष्कळ भेद आहे. येथील गायींच्या डोळ्यांत पुष्कळ सात्त्विकता जाणवते. ‘विविध त्रास होत असतांना आश्रमातील गायींना प्रार्थना केल्यावर त्रास उणावतो’, असे समजल्याने मी गायनाचा कार्यक्रम चालू होण्यापूर्वी सर्व गायींना नमस्कार करून प्रार्थना केली, ‘हे गोमाते, माझा आवाज चांगला लागू दे !’ त्यावर तेथे असलेला ‘मुरली’ नावाचा बैल जोरात हंबरला. त्या वेळी ‘त्याने हुंकार दिला’, असे मला वाटले. कार्यक्रम संपल्यावरही मी त्या गायींना पुन्हा नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. त्या वेळीही त्याने तसाच प्रतिसाद दिला. तेव्हा त्याचा आणि तेथे असलेल्या अन्य गायींचाही आशीर्वाद मिळाल्याची मला प्रचीती आली.

३. प.पू. देवबाबा यांच्यासमोर प्रत्यक्ष सादर केलेली गायनसेवा !

डावीकडे तबला वाजवतांना श्री. गिरिजय प्रभुदेसाई आणि गायन सादर करतांना श्री. प्रदीप चिटणीस

३ अ. सर्दीमुळे, तसेच कार्यक्रमाच्या वेळी वीज गेल्याने ‘ध्वनीक्षेपकाविना कसे गाणार ?’, अशी काळजी वाटणे आणि नंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करून गाण्यास आरंभ करणे : प.पू. देवबाबांसमोर संगीत सेवा सादर करण्यासाठी मी व्यासपिठावर बसलो. तेव्हा तेथील वीज गेली आणि ‘इन्व्हर्टर’ही बिघडला. आधीच माझा आवाज बसला होता आणि त्यात वीज नाही, म्हणजे ‘दुष्काळात तेरावा महिना’, असे मला वाटले. ध्वनीयंत्रणा (‘साऊंड सिस्टीम’) म्हणजे माझा जीव कि प्राण ! मी १० × १० च्या खोलीत कार्यक्रम केला, तरी ध्वनीक्षेपकाविना (माईकविना) कधीच न गाणारा माणूस आणि ‘येथे एवढ्या मोठ्या सभागृहात ध्वनीक्षेपकाविना अन् बसक्या आवाजात कसे गाणार ?’, असे मला त्या वेळी वाटले. तेव्हा मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मनोमन प्रार्थना केली, ‘माझा आवाज फारसा ठीक नाही, तरी जी काही मोडकी-तोडकी सेवा माझ्या हातून घडेल, ती गोड मानून घ्या.’

३ आ. ‘गुसाई परंपरे’चा मंत्र म्हणून गायनाचा आरंभ करणे, हळूहळू आवाज मोकळा होऊन गळ्यातून पुष्कळ रंजक अशा स्वराकृती बाहेर पडणे, गायी गायनाच्या योग्य जागीच हंबरणे आणि आरंभी म्हटलेल्या मंत्राच्या अर्थाप्रमाणे ‘प्रत्यक्ष नारायणानेच तारले’, याची अनुभूती येणे : त्यानंतर आमच्या ‘गुसाई परंपरे’चा ‘तारन तारन तूही हरि ॐ अनंत नारायण ।’ हा मंत्र अहीरभैरव रागात गाऊन मी आरंभ केला. माझ्या गुरुजींनी (पं. राजाराम शुक्ल यांनी) दिलेल्या तालमीनुसार षड्जाची पायाभरणी केली. ‘आवाज थोडा साथ देत आहे’, असे जाणवल्यावर मी अगदी संथ लयीत एकेक स्वरांचा विस्तार करू लागलो. मी ‘आलापीच जास्त वेळ गायची’, असे ठरवले; कारण बसलेल्या आवाजामुळे तान किती फिरेल, याची मला शाश्‍वती नव्हती. त्या वेळी श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांनी तबल्यावर इतका छान ठेका धरला होता की, सूक्ष्म अंतर्गत लय (तबल्याच्या लयीचे अती सूक्ष्म भाग) आणि स्वराकृती यांची एकरूपता छान जुळून आली होती. माझा आवाज आता बर्‍यापैकी सुटू लागला होता. तारसप्तकातही तो ठीक लागला. विशेष म्हणजे त्या वेळी आश्रमातील गायी गायनाच्या योग्य जागीच हंबरत होत्या आणि छान दाद देत होत्या. मी आलापी अगदी मनसोक्त केली. ती करतांना मनाची एकाग्रता होऊन मला ध्यान लागल्याची अनुभूती आली. मेरुखंड पद्धतीची सरगमही छान जमली. नंतर मी ‘बोल तान’ आणि ‘तान’ गाण्याचे धाडस केले, तर अशी गंमत झाली की, गळ्यातून खूप रंजक अशा स्वराकृती बाहेर पडू लागल्या ! त्या वेळी माझाच माझ्या गाण्यावर विश्‍वास बसेना. खरोखरंच गुरुजनांचे आशीर्वाद कामी येऊन आरंभी म्हटलेल्या मंत्राच्या अर्थाप्रमाणे त्या नारायणानेच मला तारले होते.

षड्जाची पायाभरणी : राग गायनाच्या वेळी षड्ज आणि षड्ज लगतच्या स्वरांना घेऊन केलेला स्वरविस्तार

स्वराकृती : रागातील स्वरसमुहांचा रंजकतेने केलेला स्वरविस्तार

आलाप : राग गायनात स्वरांचा संथ गतीने केलेला विस्तार

ताना : रागातील स्वरांचा जलद गतीने केलेला विस्तार

बोल तान : बंदीशीतील शब्दांना घेऊन म्हटलेली तान

मेरुखंड : स्वरांचा विस्तार करण्याची एक पद्धत

३ इ. राग अहीरभैरवचे गायन ४० मिनिटे करायचे ठरवूनही ते १ घंटा होणे आणि प.पू. देवबाबा यांनी गायनाचे कौतुक करणे : आरंभी मी राग अहीरभैरवाचे गायन ४० मिनिटे करायचे ठरवले होते; परंतु नंतर ‘एक घंटा केव्हा उलटून गेला ?’, हे मला कळलेच नाही. या गायनाविषयी प.पू. देवबाबा कौतुकाने म्हणाले, ‘‘आपके गाने का शास्त्र बिल्कुल सही है । वह जो सर्दी है, वह आपको लग रही है; परंतु हमें सूक्ष्म रूप में भी उसका अस्तित्व बिल्कुल नहीं लगा । आपने अहीरभैरव राग बहुत अच्छे सेे गाया ।’’

३ ई. मध्यंतरानंतर आवाज बिघडल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांना पुन्हा प्रार्थना करणे आणि ३ – ४ मिनिटांतच आवाज मूळ पदावर येऊ लागणे : मध्यंतर झाल्यानंतर माझा आवाज पुन्हा बिघडला आणि ‘आता मात्र माझा आवाज लागणार नाही’, अशी माझी निश्‍चिती झाली. तेव्हा मी पुन्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केली, ‘आतापर्यंत जी काही मोडकी-तोडकी सेवा झाली, ती गोड मानून घ्यावी.’ नंतर मी राग दरबारी गाण्यास आरंभ केला आणि ३ – ४ मिनिटांतच आवाज मूळ पदावर येऊ लागला. ‘लगन लागी मोहन संग..।’ ही बंदिश नेहमीप्रमाणेच रंगली. त्यानंतर दरबारी रागातीलच ‘सुखके सब साथी, दुखमें न कोई…।’ हे भजन सादर करून कार्यक्रमाचा शेवट भैरवीने केला.

३ ई १. अनुभूती – भैरवी गातांना आजपावेतो कधी न गायलेल्या स्वराकृती गळ्यातून निघून त्यातून प्रभु श्रीरामचंद्रांची व्याकुळता व्यक्त होणे : भैरवीमध्ये संत तुलसीदासांचे ‘तब मैं जानकीनाथ कहाऊँ…।’ हे भजन गातांना आलेली अनुभूती खरोखरंच दैवी होती. विविध स्वराकृती, ज्या मी आजपावेतो कधीही गायल्या नव्हत्या, ‘त्या गळ्यातून कशा येत होत्या ?’, ते माझे मलाच कळत नव्हते. अतिशय आर्ततेने प्रभु श्रीरामचंद्रांची व्याकुळता गळ्यातून व्यक्त होत होती. ‘भजनातील एकेक शब्द किती आळवू ? किती प्रकारे आळवू ?’, असे मला झाले होते. त्या स्थितीचे शब्दांत वर्णन करणे खरोखरंच अशक्य आहे. नंतर माझ्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

कार्यक्रम संपल्यावर प.पू. देवबाबा यांनी मला आशीर्वाद देऊन गायनाचे कौतुक केले. त्या वेळी त्यांचे शब्द ऐकून माझे नयन आनंदाश्रूंनी भरून आले. ‘कार्यक्रमाच्या वेळी वीज गेली, तरी मी शरणागत भावाने गायनसेवा सादर करू शकलो. तेव्हा ही ईश्‍वरेच्छा असून ‘मला घडवण्यासाठीच हे सर्व झाले’, असे मला जाणवले.

(बंदिश : शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत. यालाच ‘छोटाख्याल’ किंवा ‘चीज’ असेही म्हणतात. ही मध्य किंवा दृत लयीत गातात.)

४. शांत आणि निसर्गरम्य वातावरणात असलेला प.पू. देवबाबा यांचा आश्रम ! : प.पू. देवबाबांचा किन्नीगोळी येथील आश्रम निसर्गरम्य ठिकाणी असून तेथील वातावरण पुष्कळ शांत आहे. येथील ध्यानमंदिर आणि ‘पिरॅमिड्स’ पाहून त्या एकांतात साधना करण्याची इच्छा होते. आश्रमातील सर्व साधक अत्यंत प्रेमळ आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच माझ्याकडून ही गायनसेवा करवून घेतली. प.पू. देवबाबांसारख्या सिद्ध संतांच्या आशीर्वादानेच माझे गायन चांगले झाले. खरेतर त्या वेळी मी गात नव्हतोच. मी केवळ एक माध्यम होतो. माझ्या गळ्यातून प्रत्यक्ष आपणच (प.पू. देवबाबाच) गात होतात. ‘माझ्यावर आपली कृपादृष्टी सदैव रहावी’, हीच आपल्या चरणी प्रार्थना !’

– श्री. प्रदीप चिटणीस, ठाणे, महाराष्ट्र. (२४.१२.२०१८)   

सूक्ष्म स्तरावरील घडामोडींचे आकलन होण्यासाठी व्यक्तीने स्वतःची साधना वाढवणे आवश्यक !

‘संगीतातील विविध रागांचा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अनुभवण्यासाठी स्वतःची साधना असणे आवश्यक आहे. हा अभ्यास सूक्ष्म स्तरावरील असल्याने सूक्ष्मातील घडामोडी अनुभवण्यासाठी साधनेत प्रगती करणे महत्त्वाचे आहे.

समाजातील साधारण ८० टक्के लोकांना आध्यात्मिक स्वरूपाचा, उदा. वाईट शक्ती, अतृप्त पूर्वज यांचा त्रास असतो. या त्रासामुळे व्यक्तीला सूक्ष्मातील गोष्टी अचूक कळण्यात वाईट शक्तींचा अडथळा येऊ शकतो. त्यामुळे सूक्ष्म स्तरावरील अनुभव येण्यासाठी वाईट शक्तींच्या त्रासाचे प्रमाण न्यून करण्यासह साधनेत प्रगती करणेही महत्त्वाचे आहे.

यासाठी साधनेच्या आरंभीच्या टप्प्याला आपल्या कुलदेवतेचा नामजप, उदा. श्री रेणुकादेवी कुलदेवी असल्यास ‘श्री रेणुकादेव्यै नमः ।’ किंवा कुलदेवता ठाऊक नसल्यास ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ असा नामजप अधिकाधिक करावा. यासमवेत पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप दिवसभरात ४५ मिनिटे करावा. याप्रमाणे नामजप केल्याने साधना वाढल्यावर व्यक्तीला सूक्ष्मातील घडामोडींविषयी थोडे थोडे कळायला लागते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले          

‘संगीत आकाशतत्त्वाशी संबंधित आहे; म्हणून पृथ्वी, आप, तेज आणि वायू या तत्त्वांशी संबंधित असलेल्या कलांपेक्षा संगीताशी संबंधित अनुभूती वरच्या स्तराच्या असतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF