दिंड्या, सामूहिक रामनामजप, निवेदन, आंदोलन, फलकप्रसिद्धी, स्वाक्षरी मोहीम यांद्वारे सहस्रावधी रामभक्तांची राममंदिरासाठी अध्यादेश काढण्याची मागणी !

भव्य राममंदिर उभारणीचा संकल्प करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने केलेल्या आवाहनाला देशभरातील ६ राज्यांमधील १० सहस्रांहून अधिक धर्मनिष्ठ आणि रामभक्त यांचा अभूतपूर्व प्रतिसाद !

  • उत्तरप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तमिळनाडू या ६ राज्यांमध्ये हे अभियान राबवण्यात आले.

  • २५० ठिकाणी सामूहिक नामजपाचे कार्यक्रम घेण्यात आले.

  • ५ ठिकाणी दिंड्यांचे आयोजन करण्यात आले.

  • १० ठिकाणी आंदोलन आदी प्रकारे अभियान राबवण्यात आले.

  • एकूण ६ राज्यांमध्ये मिळून २६५ ठिकाणी अभियान राबवले गेले.

  • १० सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी हिंदू, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते यांनी उत्साहाने अभियानामध्ये भाग घेतला.

कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी ही प्रभु श्रीरामाची जन्मभूमी आहे, हे ऐतिहासिक सत्य आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये याचे अनेक पुरावे आहेत. विविध पौराणिक स्थळे याचे साक्षीदार आहेत. न्यायालयात पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे हे पुन्हा सिद्ध झाले आणि वर्ष २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणी ‘श्रीरामजन्मभूमी ही श्रीरामाचीच आहे’, असा शिक्कामोर्तबही केला. असे असतांनाही गेली आठ वर्षे आता हा वाद सर्वोच्च न्यायालयात पडून आहे. हिंदूंनी राममंदिरासाठी आणखी किती काळ वाट पहायची ? त्यामुळे हिंदु जनजागृती समितीने  देशभरातील हिंदु भाविकांना राममंदिर उभारणीत येत असलेले विविध अडथळे दूर होण्यासाठी श्रीरामालाच साकडे घालण्याचे आवाहन केले. या आवाहनाला देशभरातील श्रीरामभक्तांनी प्रतिसाद दिला. यात प्रामुख्याने दिंड्या, सामूहिक रामनामजप, निवेदन, आंदोलन, फलकप्रसिद्धी, स्वाक्षरी मोहीम यांद्वारे सहस्रावधी श्रीराम भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राममंदिरासाठी अध्यादेश काढण्याची जोरकस मागणी केली.

श्रीरामाचे चित्र घेऊन आणि श्रीरामाचे स्मरण करत दुमदुमल्या नामदिंड्या !

कोल्हापूर, पनवेल, नालासोपारा, कल्याण आणि बीड अशा पाच शहरांमध्ये श्रीरामाचे चित्र घेऊन दिंड्या काढण्यात आल्या. दिंड्यांमध्ये श्रीरामाचा सामूहिक नामजप करण्यात येत होता. विविध मार्गांवरून जाऊन समारोपप्रसंगी सहभागी हिंदुत्वनिष्ठ, श्रीरामभक्त यांनी मनोगत व्यक्त केले. दिंडीद्वारे नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. अनेक ठिकाणी दिंडीमध्ये संत उपस्थित होते. नामजपामुळे लोक परत एकदा नामजप करण्यास प्रवृत्त झालेच, तसेच वातावरणही सात्त्विक झाले. शेकडोंच्या संख्येने शांतपणे नामजप करणार्‍या या दिंड्या म्हणजे जणू विठ्ठलाच्या भेटीला निघालेले वारकरीच भासत होते !

भगवंताचे अधिष्ठान असल्याविना यश नाही !

आजपर्यंत राममंदिराच्या उभारणीसाठी प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न केले; मात्र त्याला यश का आले नाही, याच्या मुळाशी कोणी गेले नाही. समर्थ रामदासस्वामी यांनी म्हटलेच आहे की,

‘सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥’

यानुसार कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी केवळ चळवळ उपयोगी नाही तर ईश्‍वरी पाठबळ हे हवेच ! यानुसार राममंदिर जर उभारायचे असेल, तर या उभारणीमागे आध्यात्मिक अधिष्ठान हे हवेच. या अधिष्ठानाचे महत्त्व लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समितीने ठिकठिकाणी हिंदूंना रामनामजप यज्ञ करण्याचे आवाहन केले. या ठिकाणी स्वा. सावरकर यांचे एक महत्त्वाचे उदाहरण लागू पडते. स्वा. सावरकर म्हणाले होते, ‘स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे प्रत्यक्ष प्रयत्न करत आहेत, तितकेच महत्त्व घरी असलेल्या प्रत्येक हिंदूने स्वातंत्र्यासाठी केलेल्या प्रार्थनेला आहे.’ या उक्तीप्रमाणे ठिकठिकाणी प्रभु श्रीरामांना प्रार्थनाच करण्यात आली. ‘राममंदिर उभारणीत येत असलेले विविध अडथळे दूर करावेत, सरकारमधील मंत्र्यांना राममंदिर उभारणीसाठी अध्यादेश काढण्यासाठी बळ मिळावे आणि न्यायालयातील संबंधित न्यायाधिशांना या प्रकरणी शीघ्रतेने निर्णय घेता यावेत.’’

कुंभनगरी प्रयागराज येथे रामनामाचे संकीर्तन !

प्रयागराज येथील संकटमोचन हनुमान मंदिराजवळ आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आणि साधू

अयोध्येत भव्य राममंदिराच्या उभारणीसाठी कुंभनगरी प्रयागराज येथे सुप्रसिद्ध संकटमोचन श्री हनुमान मंदिरात हिंदु जनजागृती समितीने साधू-संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या प्रमुख उपस्थितीत रामनामाचे संकीर्तन केले. या वेळी उत्तर प्रदेश आणि बिहार राज्याचे हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी म्हणाले, ‘‘राममंदिर उभारण्यासाठी या नामसंकीर्तनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आध्यात्मिक बळ देऊया.’’ या वेळी ज्योतिष आणि आचार्य शिवदत्त पांडे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, संकटमोचन हनुमान मंदिराचे पुजारी श्री. शिवशंकर पांडे, समितीचे मध्यप्रदेश अन् राजस्थान राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया आणि समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्र-धर्माचे कार्य करणारी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या हस्तपत्रकांचे वितरण केले.

क्षणचित्रे

१. साधू-संतांनी समितीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

२. तीर्थराज प्रयाग येथे आलेल्या भाविकांनीही या नामसंकीर्तनात सहभाग घेतला.

३. संंतांच्या आवाजात मुद्रित करून लावलेला नामजप ऐकून भाविक आंदोलनाकडे आकृष्ट झाले.

४. मंदिराजवळील अतिप्राचीन अक्षयवट आणि सरस्वती कूप लोकांसाठी खुले करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते होणार होता. त्याला कडेकोट सुरक्षा असतांनाही समितीचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला.

चेन्नई येथे विशेष सत्संगात रामनामाचा गजर !

चेन्नई – पट्टालम, चेन्नई येथील श्री अंजनेय मंदिरात १० जानेवारी २०१९ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित विशेष सत्संगात रामनामाचा गजर करण्यात आला. या विशेष सत्संगाला प्रार्थनेने प्रारंभ करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी रामनामाचा गजर करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर उपस्थितांनी २० मिनिटे रामनामाचा जप केला. सनातनच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी या वेळी भावप्रयोग घेतला. त्यानंतर पू. रविचंद्रन् यांनी रामनामजपाचे महत्त्व विशद केले. या वेळी उपस्थितांनी प्रभु श्रीराम, श्री लक्ष्मीदेवी आणि श्री अंजनेय यांची भजने गायली.

या प्रसंगी शिवसेनेचे तमिळनाडू राज्याचे अध्यक्ष श्री. राधाकृष्णन् आणि श्री. पद्मनाभन्, भारत हिंदु मुन्नानीचे श्री. प्रभु, हिंदु मक्कल मुन्नानीचे श्री. नारायण, अखिल भारत हिंदु सत्य सेनेचे श्री. रामाभूपती आणि श्री गडदारा स्वामिगलचे श्री. हरि यांच्यासह ३५ भाविक उपस्थित होते.

सौ. कल्पना बालाजी आणि सौ. सुधा बालकृष्णन् यांनी ग्रंथप्रदर्शनाची सेवा केली. सौ. भुवनेश्‍वरी यांनी प्रसादवाटप केले. सर्वश्री मणिकंदन, जयकुमार आणि रविचंद्रन् यांनी छायाचित्रे काढण्याची सेवा केली.

  • जळगाव जिल्ह्यातील शिरसोली, डिकसाई, धानोरा येथे, तसेच नंदुरबार शहरातील मोठा मारुति मंदिर आणि श्रीराम मंदिर, घोटाणे (नंदुरबार) येथे रामाचा नामजप करून सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण अनुभव आणि अनुभूती !

सांगली

१. मिरज

अ. गोपाळकृष्ण मंदिरात नामजप करतांना महिलांना भावाश्रू आले.

आ. लोकमान्य वसाहतीमध्ये सर्वांनी एकमुखाने ‘राममंदिर होईपर्यंत प्रतिदिन रामनामजप आणि प्रार्थना करणार’, असे सांगितले.

२. विटा येथे सिंह सेनेचे संस्थापक श्री. शिव शिंदे यांनी कार्यालयात धर्मप्रेमी युवकांना घेऊन नामजप केला.

३. कौलगे या ठिकाणी धर्मप्रेमींनी जप केल्यावर प्रतिदिन हनुमानाच्या मंदिरात १५ मिनिटे आरती करण्याचे ठरवले.

सोलापूर

१. खंडाळी येथे मंदिरात साकडे घातल्यावर भाविक म्हणाले, ‘‘आम्हालाही धर्मशिक्षण मिळावे, यासाठी वर्ग घ्या. तुमच्यामुळे आम्हाला राममंदिर उभारणीसाठी नामजप प्रार्थना करण्याची संधी मिळाली, अन्यथा आमचा हा वेळ असाच गेला असता.’’

२. अकलूज येथील राममंदिरात रामनामाचा जागर करतांना अनेकांना ‘श्रीरामाची मूर्ती हसत सर्वांकडे पहात आहे’, असे दिसले. सौ. खाडे यांना सुगंध येऊन ‘देवतांचे आगमन होत आहे’, असे जाणवले.

३. अकलूज येथील साप्ताहिक सनातन प्रभातच्या वाचक श्रीमती पावसे आजी यांना राममंदिर मोहिमेविषयी सांगितले असता त्यांनी भजनीमंडळातील सर्व महिलांना एकत्र करून रामनामाचा गजर केला. या वेळी सर्वांना वेगळा उत्साह आणि आनंद जाणवत होता.

४. नामजप करतांना पुरुषाचा आवाज येणे आणि गोंदवलेकर महाराजच नामजप करत असल्याचे दिसणे : अकलूज (जिल्हा सोलापूर) येथे एका मंदिरात रामनामाचा गजर करतांना ३ जणींना ‘एक पुरुष नामजप करत आहे’, असा आवाज येत होता. प्रत्यक्षात कोणीही पुरुष मंदिरात नव्हता. सौ. खामणे यांना ‘१ घंटा प्रत्यक्ष गोंदवलेकर महाराज समोर बसून मोठ्या आवाजात जप करत आहेत’, असे दिसले.

५. अकलूज येथे मंदिरात रामनामाचा गजर केल्यानंतर महिलांनी विचारले, ‘‘आम्ही राममंदिरासाठी किती वेळ जप करू ?’’ एका महिलेने ‘प्रतिदिन राममंदिरासाठी नामजप करीन’, असे सांगितले.

६. मंगळवेढा येथील दैनिक सनातन प्रभातचे वाचक श्री. सुरेश जोशी यांनी पुढाकार घेऊन येथील तहसीलदारांना निवेदन दिले.

७. ७ मासाच्या बालिकेने जपाच्या वेळी टाळ्या वाजवून नमस्कार करणे : बार्शी येथील राममंदिरात सामूहिक नामजप करतांना चि. ईश्‍वरी गलांडे (वय ७ मास) ही शांत बसली होती. ती मधे मधे टाळ्या वाजवत होती, डोके टेकून नमस्कार करत होती.

८. राममंदिराचा निर्णय आपल्या बाजूनेच लागणार असल्याचे सर्व महिलांनी सांगणे : सोलापूर येथील जगदंबा चौकातील दत्त मंदिरात दिव्य गीता भजनी मंडळातील महिलांना राममंदिर मोहिमेविषयी सांगितल्यावर त्यांनी त्वरित श्रीरामाचे पूजन करून सामूहिक नामजप केला, तसेच साकडे घातले. या वेळी सर्व महिलांनी धर्मशिक्षणवर्गाची मागणी केली आणि ‘आज पुष्कळ आनंद मिळाला’ असे सांगितले. सर्व महिला ‘राममंदिराचा निर्णय आपल्या बाजूनेच लागणार’, असे म्हणाल्या.

९. सामूहिक नामजप करतांना एका महिलेला ‘श्रीराम धनुष्यबाण हातात घेऊन उभे आहेत’, असे दिसले.

१०. लातूर येथे नुकत्याच झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेनंतर धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे धर्मकार्यात सहभागी होण्याचा नि:श्‍चय केला. राममंदिर मोहिमेविषयी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी अनेक धर्मप्रेमी उपस्थित राहिले.

मालाड (मुंबई) येथे राममंदिराच्या उभारणीसाठी हिंदुत्वनिष्ठांचा रामनामाचा गजर !

मालाड – येथेही सोमवार बाजारातील राममंदिरात रामनामाचा गजर करण्यात आला. प्रारंभी रामाला प्रार्थना करून नामजप करण्यात आला. ‘सरकारने राममंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा करावा’, या मागणीच्या निवेदनावर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. ‘सर्व हिंदूंनी राममंदिरासाठी रस्त्यावर उतरायला हवे’, अशी प्रतिक्रिया श्री. ठाकरशी यांनी व्यक्त केली.

राममंदिरासाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी घेतलेला पुढाकार मनाला भावणारा ! – शरद माळी, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, कोल्हापूर

गेली ७० वर्षे राममंदिर होण्यासाठी न्यायालयीन, तसेच विविध मार्गांनी हिंदू प्रयत्नशील आहेत. या लढ्याला आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी समिती आणि सनातन यांनी घेतलेला पुढाकार मनाला भावणारा आहे.

दिंड्यांमधील सामाईक क्षणचित्रे

१. दिंडी विविध मार्गांवरून पुढे पुढे जात असतांना अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वत:हून पूजा केली. रस्त्यावरच्या काही फूलवाल्यांनी श्रीरामाच्या प्रतिमेला फुले अर्पण केली. रस्त्यावरील अनेक नागरिक दिंडी आणि श्रीरामाची प्रतिमा यांना नमस्कार करत होते.

२. आरती झाल्यावर ‘आज आरती ऐकून पुष्कळ चांगले वाटले’, अशी प्रतिक्रिया स्थानिक पोलिसांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील प्रमुख मागणी

या विषयासाठी अनेक ठिकाणी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. आंदोलनात ‘सरकारने तात्काळ कायदा करून राममंदिर उभारावे’, हीच प्रमुख मागणी होती. आंदोलनात ठेवलेल्या निवेदनावर शेकडो हिंदूंनी स्वाक्षरी केली. यानंतर ठिकठिकाणी ही निवेदने प्रशासनास सादर करण्यात आली.

सरकारने तात्काळ कायदा करून राममंदिर उभारावे ! – हिंदु जनजागृती समिती

सध्या श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामाची मूर्ती एका कापडी तंबूत ठेवून तिची एकप्रकारे विटंबनाच केली जात आहे. या ठिकाणी भाविकांना कोणत्याही प्रकारे पूजा-अर्चा करता येत नाही. हिंदूबहुल भारतात श्रीरामजन्मभूमीवर हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार नाकारला जाणे, हे लज्जास्पद आहे. केंद्रात आणि उत्तर प्रदेश राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपचेच पूर्ण बहुमतातील शासन आहे. त्यामुळे राममंदिर उभारणीसाठी संसदेत तात्काळ कायदा बनवून अयोध्येत भव्य राममंदिर उभारावे, अशी मागणी ठिकठिकाणच्या आंदोलनात करण्यात आली.

राममंदिराच्या निर्मितीसाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याप्रती विश्‍वास निर्माण !

देशभरात अनेक ठिकाणी सामूहिक प्रार्थना आणि नामजप करण्यात आला. यात अनेक ठिकाणी धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या धर्मप्रेमींनी सहभाग घेतला. अनेक ठिकाणी मंदिरांचे अध्यक्ष, विश्‍वस्त यांनीही नामजपात सहभाग घेतला. रामाच्या नावावर मते मागून सत्तेवर आलेल्या सरकारकडून काहीच होत नसल्याने आता ‘सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती काहीतरी करेल’, असा विश्‍वास अनेक ठिकाणी पहावयास मिळाला.

  • ‘आतापर्यंत राममंदिरासाठी सरकारने काही केले नाही. ही दिंडी पाहून सनातन संस्था काहीतरी करेल, अशी आशा निर्माण झाली आहे !’ – कोल्हापूर येथे एका श्रीरामभक्ताची प्रतिक्रिया

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now