प.पू. गुरुदेवांप्रती अपार भाव असलेले आणि भावबळावर प्रतिकूल परिस्थितीतही विहंगम मार्गाने साधनेत प्रगती करणारेे एस्.एस्.आर.एफ्.चे ४ थे संतरत्न इंडोनेशियातील पू. रेन्डी इकारांतियो !

पू. रेन्डी इकारांतियो

१. ‘नम्रपणा’ हा स्थायी गुण असणे

‘पू. रेन्डीदादा इंडोनेशियातील एका प्रतिष्ठित आणि सधन घराण्यातील आहेत. ते स्वतः अभियंता असून एका आस्थापनात उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. असे असूनही त्यांना कर्तृत्व अथवा संपत्ती यांचा जराही अहं नाही. साधक इतकी वर्षे त्यांच्या संपर्कात असूनही त्यांनी ते उच्चभ्रू घराण्यातील असल्याचे कधी जाणवू दिले नाही. ते सर्वांशी अत्यंत नम्रपणाने वागतात. त्यांच्याकडे पाहिल्यावर ‘नम्रपणा’ हा त्यांचा स्थायी गुण असल्याचे लक्षात येते.

२. प्रेमभाव असल्याने इतरांची आपुलकीने काळजी घेणे

इंडोनेशियामधील जकार्ता येथे सर्व सोयी-सुविधांनी युक्त असा त्यांचा मोठा बंगला आहे. काही वेळा साधक त्यांच्या घरी वास्तव्याला असतात. ‘साधक घरी येणार’, हे कळल्यानंतरच त्यांना पुष्कळ आनंद होतो. ते स्वतः लक्ष देऊन साधकांची प्रेमाने आणि आपुलकीने काळजी घेतात. एकदा एक साधिका (सौ. श्‍वेता क्लार्क) सेवेसाठी इंडोनेशियामध्ये गेली असता पू. रेन्डीदादांच्या घरी तिची निवासव्यवस्था केली होती. ती साधिका रात्री उशीरा आल्याने सकाळी तिची झोपमोड होऊ नये; म्हणून नोकरीला जाण्यापूर्वी पू. रेन्डीदादांनी तिच्या खोलीबाहेर चिठ्ठी लावली, ‘तुमच्यासाठी अल्पाहार ठेवला आहे. तुम्हाला अजून काही हवे असेल, तर मला संपर्क करू शकता.’ या उदाहरणावरून ‘ते इतरांचा किती विचार करतात ?’, हे लक्षात येते.

३. प.पू. गुरुदेवांप्रती अपार भाव

३ अ. ‘जणू गुरुदेवांच्या आश्रमात रहात आहोत’, या भावाने स्वतःच्या घरी रहाणे : ते स्वतःच्या घरात रहातांना ‘जणू गुरुदेवांच्या आश्रमातच रहात आहोत’, या भावाने रहातात. पत्नीला साहाय्य करणे, मुलांची काळजी घेणे आदी कृतीही ते सहजतेने करतात. यावरून त्यांनी ‘घराला आश्रम बनवून साधना कशा प्रकारे आत्मसात केली आहे’, हेे लक्षात येते. रामनाथी आश्रमजीवन अत्यल्प काळ अनुभवलेल्या पू. रेन्डीदादांची ‘गुरुदेवांवर असलेली अनन्य निष्ठा’ आणि ‘शिकण्याची तळमळ’ या गुणांमुळेच त्यांनी हे साध्य केले आहे. ‘इंडोनेशियातील अध्यात्मप्रसाराचे कार्य वाढल्यावर आपण घराचा मोठा आश्रम बनवूया’, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

३ आ. भावपूर्ण आणि इतरांचा भाव जागृत करणारे बोलणे : ते सतत भावावस्थेत आणि ईश्‍वराच्या अनुसंधानात असल्यामुळे साधकांना त्यांचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते आणि इतरांची भावजागृती होते.

३ इ. प्रत्येक कृती भावपूर्ण असल्याने साधनेत कोणतीच अडचण न येणे : प्रत्येक साधकाला कधी ना कधी किंवा कुठल्यातरी टप्प्यावर अडचणी येतात. इंडोनेशियासारख्या रज-तमात्मक वातावरणात राहून साधना करणे तर अत्यंत कठीण आहे; मात्र पू. रेन्डीदादांमध्ये गुरुदेवांप्रती अपार भाव असल्यामुळे त्यांना साधनेत किंवा सेवेत कधीच कोणतीही अडचण आली नाही. ‘भाव तेथे देव’ ही उक्ती त्यांच्या संदर्भात १०० टक्के लागू पडते.

४. पू. रेन्डीदादांच्या मार्गदर्शनानुसार साधनेचे प्रयत्न करणार्‍या फ्रान्सिकस यांनी अल्पावधीत ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे

इंडोनेशियातील साधक श्री. फ्रान्सिकस बुडाआजी मागील २ – ३ वर्षांपासून एस्.एस्.आर.एफ्.च्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. पू. रेन्डीदादांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी अल्पावधीत ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. पू. रेन्डीदादांप्रमाणेच फ्रान्सिकस यांच्यामध्येही काही दैवी गुण आहेत. यावरून ‘पू. रेन्डीदादा साधकांना स्वतःसारखे घडवत आहेत आणि साधनेत पुढे नेत आहेत’, असे लक्षात येते. (‘३.१.२०१९ या दिवशी श्री. फ्रान्सिकस यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित करण्यात आले.’ – संकलक)

५. पू. रेन्डीदादांची सेवेची अतीव तळमळ !

ते नोकरी करत असल्याने, तसेच त्यांच्यावर कौटुंबिक दायित्व असल्याने त्यांना सेवेसाठी थोडा वेळ मिळतो, तरीही ते अधिकाधिक वेळ साधनेसाठी देण्यासाठी प्रयत्नरत असतात. ते प्रतिदिन नोकरीसाठी जात असतांना वाहनामध्ये साधकांचा ‘ऑनलाईन’ सत्संग घेऊन त्या वेळेचाही सदुपयोग करतात.

६. पू. रेन्डीदादांच्या तळमळीमुळे इंडोनेशियामध्ये वाढत चाललेले अध्यात्मप्रसाराचे कार्य !

काही वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांनी रेन्डीदादांना इंडोनेशियामध्ये अध्यात्मप्रसार करण्यास सांगितले होते. त्या वेळी ‘गुरुदेवांना अपेक्षित असा अध्यात्मप्रसार व्हायला हवा’, या तळमळीने त्यांनी प्रसारकार्य चालू केले. तेथील कार्य आता वाढत चालले आहे. ते जिज्ञासूंसाठी प्रवचन, सत्संग आणि कार्यशाळा यांचे आयोजन करतात. निरनिराळी व्यावसायिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पार्श्‍वभूमी असलेले जिज्ञासू या सत्संगांना उपस्थित असतात. यातील अनेक जणांनी आता सेवा आणि साधना यांना आरंभ केला आहे.

७. प्रत्येक क्षणी शिकण्याच्या स्थितीत असलेल्या पू. रेन्डीदादांनी रामनाथी आश्रमातील वास्तव्याचा लाभ करून घेणे

सध्या रामनाथी आश्रमात एस्.एस्.आर.एफ्.च्या साधकांचे शिबीर चालू आहे. काही वेळा रात्री उशिरा आम्ही सत्संगासाठी एकत्र बसतो. सत्संगामध्ये पू. रेन्डीदादांना झोप येत असल्यास आम्ही त्यांना विश्रांती घेण्यास सांगतो, तर ते सांगतात, ‘मला या सत्संगातून शिकायचे आहे’ आणि सर्व सत्संगांना शेवटपर्यंत उपस्थित रहातात.

त्यांची व्यष्टी प्रकृती असून स्वभाव अबोल आहे. असे असूनही त्यांच्यातील साधनेची तीव्र तळमळ आणि प्रेमभाव यांमुळेच भगवंत त्यांना ‘समष्टी संत’ म्हणून घडवत आहेत.

पू. रेन्डीदादांसारखे संतरत्न पाहिल्यावर ‘आंतरिक साधनेला स्थळ, संस्कृती, प्रांत, भाषा आदी कोणत्याच गोष्टींचे बंधन नसून त्यासाठी केवळ ‘भाव’ आणि ‘तळमळ’ आदी गुण आवश्यक असतात’, हे लक्षात येते. पू. रेन्डीदादांसारखे अनमोल संत घडवणार्‍या परात्पर गुरुदेवांसारख्या जगद्गुरूंप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे !’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१.२०१९)

साधकांनो, पू. रेन्डी इकारांतियो यांच्याकडून पूर्णवेळ साधना करण्याची तीव्र तळमळ शिका !

‘३.१.२०१९ या दिवशी एस्.एस्.आर.एफ्.च्या शिबिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्या वेळी पू. रेन्डीदादा कोणत्या तरी विचारांत असल्याचे मला जाणवले. मी त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘माझी पूर्णवेळ साधक होण्याची इच्छा आहे; पण काही अडचणींमुळे पूर्णवेळ साधनेचा निर्णय घेण्यात विलंब होत आहे.’’ त्यांच्या त्या बोलण्यात साधनेची तीव्र तळमळ आणि ‘आपल्याला पूर्णवेळ साधक होता येत नाही’, ही आंतरिक खंत जाणवत होती. ते दोन्ही पाहून माझ्या मनात विचार आला, ‘पूर्णवेळ साधक न होताही पूर्णवेळ साधक झाल्याचे फळ ईश्‍वराने पू. रेन्डीदादांना दिलेले आहे.’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१.२०१९)


Multi Language |Offline reading | PDF