‘हिंदु धर्मात हिंदु धर्मातील शाश्‍वत मूल्ये आणि सिद्धांत समजून घेऊन त्यानुसार आचरण करून धर्माची, म्हणजेच साक्षात भगवंताची अनुभूती घेण्याला महत्त्व आहे’, या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या विधानातील शाश्‍वत मूल्यांविषयी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी केलेले विश्‍लेषण

‘१२.११.२०१८ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या तेजस्वी विचारांत ‘धर्माचे मूळ काय ?’, ते सांगितले आहे. ते म्हणतात, ‘‘हिंदु धर्मात धर्मप्रसाराला महत्त्व नाही, तर धर्माच्या खोलात, सूक्ष्मात जाण्याला महत्त्व आहे.’’ या विधानाचे स्पष्टीकरण त्यांनी १८.११.२०१८ या दिवशीच्या दैनिकात केले आहे. त्याविषयी ते म्हणतात, ‘‘हिंदु धर्मात हिंदु धर्मातील शाश्‍वत मूल्ये आणि सिद्धांत समजून घेऊन त्यानुसार आचरण करून धर्माची अनुभूती, म्हणजेच साक्षात भगवंताची अनुभूती घेण्याला महत्त्व आहे.’’ या विधानातील शाश्‍वत मूल्यांविषयी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी केलेले विश्‍लेषण पुढे देत आहोत.

परात्पर गुरु पांडे महाराज

१. विविध संतांनी शाश्‍वत मूल्य असलेल्या चैतन्यशक्तीला, म्हणजेच आत्मशक्तीला दिलेले महत्त्व

१ अ. संत ज्ञानेश्‍वर महाराज

१ अ १. संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी ज्ञानेश्‍वरीमध्ये शाश्‍वत मूल्य असलेल्या आत्मशक्तीला महत्त्व देऊन तिला प्रथम नमन करणे : शाश्‍वत मूल्य हे आत्मशक्ती असल्याने संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी ज्ञानेश्‍वरीमध्ये ‘नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥’, असे म्हणत आत्मशक्तीला महत्त्व देऊन तिला प्रथम नमन केले आहे; कारण ती आत्मस्वरूपातून कार्य करणारी स्वसंवेद्य (कुठल्याही रूपात परिवर्तित होऊ शकेल, अशी) अशी महान शक्ती आहे. ती प्रथम अनामिक आहे. यासाठी भगवंताने तिला ‘ॐ’कार या स्वरूपातून प्रथम निरनिराळ्या नामकरणात आणले. (याचाच अर्थ सृष्टीतील प्रत्येक घटकाला ओळखण्यासाठी त्याला विशिष्ट नाम दिले.) त्यामुळे आपण आज या सृष्टीच्या सर्व घटकांना ओळखू शकतो आणि त्यांचा उपभोग घेऊ शकतो.

१ अ २. संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी शाश्‍वत मूल्य असलेली आत्मशक्ती चैतन्यमय असून सत्-चित्-आनंदमय असल्याचे सांगणे : तीच शक्ती दृश्य आणि अदृश्य स्वरूपांत कार्य करत आहे; म्हणूनच संत ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात, ‘तुज सगुण म्हणू कि निर्गुण रे । सगुण निर्गुण एक गोविंदु रे ॥’ ही शक्ती चैतन्यमय असून सत्-चित्-आनंदमय आहे. तिलाच आपण ‘भगवंत’ असे म्हणतो. ही आत्मशक्ती देहातून (देह हासुद्धा तिच्याद्वारेच निर्माण झाला आहे.) कार्य करत असून ‘तिच्याद्वारे अनुभूती घेणे’, हेच महत्त्वाचे आहे. हे समजल्यामुळेच आपल्याला जीवनात आनंद मिळून आपले जीवन सुखी होणार आहे.

१ आ. समर्थ रामदासस्वामी यांनी याविषयी म्हटले आहे, ‘मूलाधार आधार तो निर्गुणाचा ।’

२. शाश्‍वत अशा चैतन्यशक्तीची, म्हणजेच गुरुकृपायोगानुसार साधना करून भगवंताची अनुभूती घेतल्यास मानवी जीव जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून सुटू शकतो !

केवळ भौतिक सुखात रममाण झाल्यामुळे आपल्याला जन्म-मरणाच्या फेर्‍यांत अडकावे लागते. शाश्‍वत अशा चैतन्यशक्तीची, म्हणजेच गुरुकृपायोगानुसार साधना करून भगवंताची अनुभूती घेतल्यास मानवी जीव जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून सुटू शकतो. हेच मानवी जीवनाचे महत्त्व आहे. यासाठीच भगवंताने मानवाची निर्मिती केली आहे.

३. समाजात नियमितपणे चैतन्याविषयी सांगत राहून त्याविषयीची जागृती चालू ठेवा, जेणेकरून सर्वांच्या अंतर्मनावर त्याचा परिणाम होईल आणि ते चैतन्यवृद्धीसाठी कृतीच्या स्तरावर कार्यान्वित होईल !

शाश्‍वत अशी चैतन्यशक्ती सर्वांत महत्त्वाची आहे. आपण नेहमी चैतन्यशक्तीविषयी बोलतो. ते हेच आहे. यासाठी वरील सूत्राचा आधार घेऊन साधकांनी धर्मप्रसार करतांना चैतन्यशक्तीला पुढे करावे. आपण समाजात नियमितपणे चैतन्याविषयी सांगत राहून त्याविषयीची जागृती चालू ठेवावी. त्यामुळे सर्वांच्या अंतर्मनावर त्याचा परिणाम होईल आणि ते चैतन्यवृद्धीसाठी कृतीच्या स्तरावर कार्यान्वित होतील.

४. सृष्टीतील शाश्‍वत अशा चैतन्याची वृद्धी होण्यासाठी सातत्याने भगवंताचे महत्त्व जाणा !

४ अ. भगवंताची स्तुती केल्याने त्याच्याविषयी भाव निर्माण होऊन भावजागृती होईल आणि आनंद मिळेल ! : भगवंतच सर्वत्र ठासून भरला आहे. तोच सर्व कार्य करत आहे. त्याचेच सर्वत्र अधिराज्य आहे. सर्वांना ‘भगवंताची स्तुती करा’, असे सांगा. स्तुती म्हणजे भगवंताचे महत्त्व समजून घेणे, त्याचे मूल्य जाणणे, त्याचा भाव जाणणे ! त्याचा भाव जाणल्यामुळे त्याच्याविषयी भाव निर्माण होऊन भावजागृती होईल आणि आनंद मिळेल. या आनंदाच्या आवेशात होणारे कार्य आनंदमय होईल. यासाठी श्रीकृष्ण श्रीमद्भगवद्गीतेतील अध्याय २, श्‍लोक ५० मध्ये सांगतो, ‘योगः कर्मसु कौशलम् ।’, म्हणजे ‘प्रत्येक कर्म चांगल्या प्रकारे करणे, म्हणजे योग साधणे.’ यामुळे कार्य सहजसुलभ होऊन कौशल्यपूर्ण होते. त्यामुळे स्वतःसमवेत सर्वांनाच आनंद मिळतो.

४ आ. प्रत्येक कर्म भगवंतच करत असल्याने ते करतांना भगवंताचा उल्लेख करा ! : श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत म्हटले आहे,

नैव किञ्चित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् ।

पश्यञ्शृृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्‍नन्गच्छन्स्वपञ्श्‍वसन् ॥ ८ ॥

प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि ।

इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥ ९ ॥

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ५

अर्थ : सांख्ययोगी तत्त्ववेत्त्याने पहात असता, ऐकत असता, स्पर्श करत असता, वास घेत असता, भोजन करत असता, चालत असता, झोपत असता, श्‍वासोच्छ्वास करत असता, बोलत असता, टाकत असता, घेत असता, तसेच डोळ्यांनी उघड-झाप करत असतांनाही ‘सर्व इंद्रिये आपापल्या विषयांत वावरत आहेत’, असे समजून निःसंशय असे मानावे की, मी काहीच करीत नाही.

४ इ. कुणी स्तुती केल्यास ‘ही स्तुती आत्मशक्तीची आहे’, हे जाणा आणि ती स्तुती भगवंतालाच अर्पण करा ! : जेव्हा कुणी एखाद्याची स्तुती करतो, तेव्हा त्याला वाटते, ‘माझीच’ स्तुती होत आहे.’ त्यामुळे त्याचा अहं सुखावतो; परंतु येथे हे लक्षात घेतले पाहिजे, ‘हे कार्य व्यक्तीच्या आत्मशक्तीद्वारे घडत असते. त्यामुळे केली गेलेली स्तुती त्या आत्मशक्तीची असते. याची जाणीव ठेवल्यास (म्हणजेच त्याची स्तुती त्यालाच अर्पण केल्यास) आनंद तर मिळेलच आणि अहंकारही वाढणार नाही. यासाठीच अध्यात्मामध्ये त्यागाला महत्त्व दिले आहे.

याविषयी श्रीकृष्ण म्हणतो,

यत्करोषि यदश्‍नासि यज्जुहोषि ददासि यत् ।

यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्‍लोक २७

अर्थ : हे कौन्तेया (कुंतीपुत्र अर्जुना), तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर.

५. मायेत असतांना सत्याला धरून, म्हणजेच शाश्‍वत अशा चैतन्याला धरून कार्य केल्याने त्याचा अंतर्मनावर संस्कार होईल आणि ‘सर्वत्र चैतन्यच आहे’, याची जाणीव सतत राहील !

मायेत असतांनाही सत्याला धरून, म्हणजेच शाश्‍वत चैतन्याला धरून कार्य करावे, म्हणजेच मायेला कारण करून, मायेलाच चैतन्याने भारित करून कार्य केल्यास मायेचा प्रभाव रहाणार नाही. ते कार्य शाश्‍वत अशा चैतन्याशी समरस होऊन होत राहील. त्यामुळे मायेचा, भौतिकाचा संबंध रहाणार नाही. याविषयीचा अभ्यास सतत केल्यास याचा अंतर्मनावर संस्कार होईल आणि ‘सर्वत्र चैतन्यच आहे’, याची जाणीव सतत राहील. (परात्पर गुरु डॉ. आठवले ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ ही प्रक्रिया राबवून हेच उद्दिष्ट साध्य करत आहेत.)

६. सनातन धर्म म्हणजे शाश्‍वत अशा चैतन्याचा, म्हणजेच सत्याचा प्रसार होय !

सनातन संस्थेकडील मुख्य सूत्र ‘चैतन्य’ हे आहे. तेच मुख्य असल्याने त्याच्यापुढे कुणाचे काही चालत नाही; म्हणून चैतन्याला पुढे आणायचे आहे. त्याच्याद्वारेच कार्य करायचे आहे. सनातन धर्म म्हणजे चैतन्याचा, म्हणजेच सत्याचा प्रसार होय ! नाहीतर ‘विकृतीमुळे सर्व घोटाळे होतात’, हे बाहेरच्या जगात सर्वत्र दिसत आहे.

७. ‘आध्यात्मिक उन्नती करून त्याच्यातील चैतन्याची वाढ करणे’, हा उद्देश ठेवून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित असा धर्मप्रसार करा !

येथे ‘केवळ धर्मप्रसार करून माणसांची संख्या वाढवणे’, हा उद्देश नाही, तर ‘माणसातील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून त्याला घडवणे अन् त्याला समर्थतेने उभा करणे, त्याची आध्यात्मिक उन्नती करून त्याच्यातील चैतन्याची वाढ करून त्याला जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून मुक्त करणे’, हा धर्मप्रसारामागील उद्देश आहे. अशा चैतन्यशक्तीद्वारे प्रसारकार्य केल्यास खर्‍या अर्थाने जागृती होऊ शकते.

इतर पंथांत केवळ संख्याबळ वाढवण्यासाठी कोणतेही दुष्कृत्य करतात. त्यामुळे सर्वत्र रज-तमाचा प्रभाव वाढला आहे. त्याचा परिणाम वातावरणावर होऊन निसर्ग कोपला आहे. याचाच प्रभाव परत मानवाच्या मनावर होत असल्यामुळे सत्य (शाश्‍वत मूल्य) लोपून दुर्विचार वाढले आहेत.

अशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित असा खोलात जाऊन धर्मप्रसार केला पाहिजे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे धर्मप्रसार करणे महत्त्वाचे आहे. धर्मप्रसाराचा खरा अर्थ स्पष्ट करून सर्वांना त्याविषयी जागृत केल्याबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी आम्ही कोटी-कोटी कृतज्ञ आहोत.’

– (परात्पर गुरु) परशराम पांडे (महाराज), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.११.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF