हिंदूंना त्यांच्या श्रद्धास्थानाचे प्रमाण द्यावे लागणे हे दुर्भाग्यपूर्ण ! – प्रशांत परब, प्रखर राष्ट्रप्रेमी

राममंदिराच्या मागणीसाठी सांताक्रूझ (मुंबई) येथे आंदोलन

मुंबई, ११ जानेवारी (वार्ता.) – अनेक धर्मग्रंथ, पौराणिक स्थळे रामजन्मभूमीचे प्रत्यक्ष प्रमाण असताना हा वाद न्यायालयात जाणे अपेक्षित नव्हतेच. हिंदूंना त्यांच्या श्रद्धास्थानाचे प्रमाण द्यावे लागणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे, असे मत प्रखर राष्ट्रप्रेमी श्री. प्रशांत परब यांनी येथे व्यक्त केले. कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या रामाचे भव्य मंदिर अयोध्येत विनाविलंब निर्माण व्हावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदु परिषद, भाजप आणि समविचारी संघटना, तसेच धर्मप्रेमी यांच्या वतीने सांताक्रूझ येथे आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

मान्यवरांचे विचार

हिंदूंनी राममंदिरासाठी सर्व राजकीय पक्ष आणि न्यायालय यांना प्रमाणापेक्षा अधिक वेळ देऊनही प्रगती झालेली नाही. त्यामुळे हिंदूंनी आता कोणाचीही आशा न बाळगता मंदिर निर्माणासाठी स्वतः कृती केली पाहिजे. – श्री. प्रकाश सिंग, विश्‍व हिंदु परिषद

सरकार केवळ विकासाचे गाजर दाखवून समस्त हिंदूंची दिशाभूल करत आहे. हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन राममंदिराचे निर्माण त्वरित करावे. – श्री. करन पाठक, बजरंग दल

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनिल ठाकूर आणि  सनातन संस्थेच्या सौ. नीता चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले.

क्षणचित्रे

१. सरकारने राममंदिर निर्माणासाठी संसदेत कायदा करावा, या मागणीच्या निवेदनावर केवळ दोन घंट्यांत ७५६ रामभक्तांनी स्वाक्षर्‍या केल्या.

२. वडिलांच्या उपचारासाठी प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथून मुंबईत आलेले श्री. प्रशांत सिंग यांना आंदोलनाचा विषय कळताच ते या आंदोलनात सहभागी झाले.

३. कामावरून परतणारे घाई असूनही थांबून निवेदनावर स्वाक्षरी करत होते, तसेच काहींनी आंदोलनातही सहभाग घेतला.

राममंदिराचा निर्णय न होणे हा देशातील कोट्यवधी रामभक्तांवर झालेला फार मोठा अन्याय ! – प्रसाद मानकर, हिंदु जनजागृती समिती

अयोध्येतील राममंदिराच्या संदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वर्ष २०१० च्या निर्णयानुसार तेथे राममंदिर होते, हे स्पष्ट झाले आहे. तरीही तेथे मंदिर निर्माणासाठी त्वरित निर्णय न घेणे, हा देशातील कोट्यवधी रामभक्तांवर झालेला फार मोठा अन्याय आहे.


Multi Language |Offline reading | PDF