कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळ थांबवा आणि राममंदिर उभारणीसाठी संसदेत त्वरित कायदा करा ! – हिंदु जनजागृती समिती

अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी खेड येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सहभागी झालेले हिंदु धर्मप्रेमी

खेड, ११ जानेवारी (वार्ता.) – कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी ही प्रभु श्रीरामाची जन्मभूमी आहे, हे ऐतिहासिक सत्य आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. विविध पौराणिक स्थळे याची साक्षीदार आहेत. असे असतांना हा वाद न्यायालयात जाणे अपेक्षित नव्हते. आज हिंदूंना त्यांचे श्रद्धास्थान असलेले श्रीरामाचे मंदिर होते का ? हे हिंदुस्थानातच सिद्ध करावे लागत आहे, हे कोट्यवधी हिंदूंचे दुर्दैव आहे. त्यामुळे आता कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळ करणे थांबवा, राममंदिर उभारणीसाठी संसदेत त्वरित कायदा करा, अशी जोरदार मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली.

प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांना निवेदन देतांना १. ह.भ.प. गणपत महाराज येसरे २. प्रशांत खातू ३. विलास भुवड, ४. विनय माळी, ५. सद्गुरु सत्यवान कदम आणि अन्य धर्मप्रेमी

१० जानेवारीला येथील हुतात्मा अनंत कान्हेरे चौकात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राममंदिर उभारण्यासह, सरकारीकरण झालेली मंदिरे भक्तांच्या कह्यात देण्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर येथील प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचे सूत्रसंचालन डॉ. हेमंत चाळके यांनी केले. येथील ‘दीप केबल’ने या आंदोलनाचे चित्रीकरण केले.

हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेशी खेळणार्‍यांना श्रीराम शिक्षा केल्याशिवाय रहाणार नाही ! – ह.भ.प. गणपत महाराज येसरे, खेड वारकरी संप्रदायिक व भाविक मंडळाचे सचिव

श्रीराम प्रत्येक हिंदूच्या हृदयस्थानी आहे. श्रीरामाविना हिंदूंची स्थिती मृतवत होईल. एवढे महत्त्व श्रीरामाचे आहे. भगवंताचा अवतार हा दुष्टांच्या संहारासाठी झाला आहे, त्यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेशी खेळणार्‍यांना श्रीराम शिक्षा केल्याशिवाय रहाणार नाही.

मंदिर होईल या बाता पुरे झाल्या, आता मंदिर उभारण्यासाठी कायदा करा ! –  प्रशांत खातू , धारकरी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

आमच्या लहानपणापासून आम्ही राममंदिर उभारणीचा विषय ऐकत आहोत. किती काळ हिंदूंनी वाट पहावी? हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. अनेक परकीय आक्रमणे परतवून लावणारे हिंदू राममंदिरासाठी प्राणपणाने लढा देतील.

हिंदूंना कमकुवत समजण्याची चूक शासनाने करू नये ! – ह.भ.प. सखाराम तुकाराम जाधव

हा देश आम्हा हिंदूंचा असल्याने येथील न्याययंत्रणेचा मान आम्ही राखतो. त्यामुळे इतकी वर्षे आम्ही राममंदिर उभारणीचा मार्ग न्यायालयाच्या माध्यमातून सुटेल, याची वाट पाहिली; पण आता फारच विलंब झाला आहे. शासनाने राममंदिरासाठी कायदा करणे अपेक्षित आहे. शासन बोटचेपे धोरण अवलंबणार असेल, तर कायद्याची बूज राखणार्‍या हिंदूंना कमकुवत समजण्याची चूक शासनाने करू नये.

राममंदिराची उभारणी हा हिंदूंचा निर्धार ! – महेश सातपुते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राममंदिर निर्माण करण्यासाठी लागणारी सामग्री सिद्ध आहे. आम्ही केवळ शासन आदेशाची वाट पहात आहोत.आता अधिक वेळ शासनाने लावू नये. राममंदिर उभारणी हा हिंदूंचा निर्धार आहे.

भारतातील सात्त्विकता भ्रष्ट करण्याचे पाप करू नका ! – सुरेश खेडेकर, श्रीसंत रोहिदास समाज सेवा मंडळ राज्याध्यक्ष

जगात कुठेही नसतील  इतकी प्राचीन मंदिरे भारतात आहेत. या मंदिरांमुळेच भारतात सात्त्विकता टिकून आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मद्य, मांस यांची विक्री होत असल्याने तेथील सात्त्विकता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मद्य, मांस विक्री, उत्पादन, साठा आणि वाहतूक यावर शासनाने त्वरित बंदी आणावी. मंदिरांची सात्त्विकता नष्ट करण्याचे पाप शासनाने करू नये.

हिंदूंची मंदिरे ही शासन नियुक्त समितीकरता भ्रष्टाचाराची कुरणे झाली आहेत ! – अधिवक्ता (सौ.) अपर्णा कुलकर्णी, हिंदु विधीज्ञ परिषद

तब्बल ३ सहस्र ६७  मंदिरे कह्यात असणार्‍या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने देवस्थानाच्या व्यवस्थापन आणि कारभार यांमध्ये प्रचंड घोटाळे केले आहेत. हिंदु विधीज्ञ परिषदेने हा भ्रष्टाचार उघड केला आहे.

अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी त्वरित कायदा करावा ! – सुरेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

अलाहाबाद न्यायालयाने अयोध्येची भूमी ही रामजन्मभूमीच आहे असा निकाल दिला आहे. यामुळे आजही श्रीरामजन्मभूमीवर हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार नाकारला जाणे, यापेक्षा हिंदूंसाठी दुर्दैव ते काय ? या आंदोलनाद्वारे केंद्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की, कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामजन्मभूमी  येथे राममंदिर बांधण्यासाठी त्वरित कायदा करावा.

उपस्थित संत आणि मान्यवर

या आंदोलनाला सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

उधळे येथील ह.भ.प. चंद्रकांत पंडव; तळे येथील ह.भ.प. रघुनाथ सापिलदे; संस्कार भारती खेडचे अध्यक्ष विनय माळी; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजय कृष्णा तांबडे; प्रशांत प्रकाश वैद्य; नितीन विठोबा दिवटे; योग्य वेदांत समितीचे आकेश कुराडे; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेे नगरसेवक भूषण चिखले; युवा सेना उपशहर अधिकारी राजेश मोरे; शिवसेना उपविभाग प्रमुख सचिन खेडेकर; चिंचघर येथील श्री भैरवनाथ देवस्थानाचे हरिश्‍चंद्र जाधव; त्रिमूर्ती मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र खेडेकर; गणेश भोसले, खेमनाथ मित्रमंडळ, सुसेरी क्र. २ चे वसंत पवार; हिंदुराज मित्र मंडळाचे संजय शिंदे; शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे प्रशांत सावंत; हिंदु जनजागृती समितीचे विलास भुवड; संतोष घोरपडे; परेश गुजराथी आणि सनातन संस्थेचे केशव अष्टेकर आदी ५० जण उपस्थित होते.

राष्ट्रीय हिंदू आंदोलनात श्रीरामाचा गजर

खेड वारकरी सांप्रदायिक व भाविक मंडळाचे सचिव ह.भ.प. गणपत महाराज येसरे यांनी टाळ आणि मृदुंग यांसह सर्व उपस्थित धर्मप्रेमींच्या साथीने श्रीरामाचा गजर केला, तेव्हा वातावरण भक्तीमय झाले.


Multi Language |Offline reading | PDF