कुंभक्षेत्री संतांनी उपस्थित केलेल्या राममंदिराच्या सूत्राला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून बगल

कुंभमेळा प्रयागराज २०१९

भाविकांचा अपेक्षाभंग !

  • राममंदिराविषयी भाष्यही न करणारे भाजप सरकार मंदिर कधी उभारील का ?
  • मते मागण्यासाठी श्रीरामाचा वापर करणारे भाजपवाले सत्ता मिळाल्यानंतर मात्र रामाचे नावही घेत नाहीत, हे लक्षात घ्या ! ही हिंदूंची भाजपपुरस्कृत फसवणूक आहे ! याची किंमत भाजपला आगामी निवडणुकीत मोजावी लागल्यास आश्‍चर्य वाटू नये !

प्रयागराज, ११ जानेवारी (वार्ता.) – कुंभक्षेत्री झालेल्या एका कार्यक्रमात संतांनी उपस्थित केलेल्या राममंदिराच्या सूत्राला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बगल दिली.

कुंभक्षेत्री सेक्टर १६ च्या जगन्नाथ धाम आश्रमातील छावणीचे उद्घाटन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते झाले. या वेळी अखिल भारतीय संत समितीचे निर्देशक जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी हंसदेवाचार्य महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज, महानिर्वाणी आखाड्याचे महंत रवींद्रपुरी महाराज, महंत राजेंद्रदास महाराज, सेवक रघुनाथ द्विवेदी महाराज, श्री. दीपक दुबे, श्री. सुरेंद्र चौधरी, श्री. सुधीरकुमार साहू आदी उपस्थित होते.

या वेळी जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी हंसदेवाचार्य महाराज म्हणाले, ‘‘मूळ राममंदिराच्या प्रतिकृतीप्रमाणेच अयोध्येत राममंदिर उभारले जाईल. ज्या ठिकाणी मंदिर व्हायला हवे, तेथे राममंदिरच होईल. कोणत्याही परिस्थितीत रामजन्मभूमीवर बाबरी मशीद होणार नाही.’’ याविषयी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या भाषणात चकार शब्दही काढला नाही. ते म्हणाले, ‘‘आता अक्षयवट खुले केले असून पुढे आणखी मोठी कार्ये पूर्ण होतील.

कुंभमेळ्यात नकारात्मक ऊर्जेचे हरण होऊन तेथे सकारात्मक ऊर्जा मिळते. या कारणास्तव या भूमीचे नाव ‘प्रयागराज’ ठेवले आहे.’’ मुख्यमंत्र्यांनी राममंदिराविषयी भाष्य न केल्यामुळे उपस्थित भाविकांचा अपेक्षाभंग झाला.

गेल्या मासात काही जणांनी हनुमानाला दलित संबोधल्याविषयी नागाबाबा शांतानंद महाराज यांनी याविषयी त्याचे खंडण केले. ते म्हणाले, ‘‘हनुमान वानर नव्हते, तर हनुमानाने अहंकारी लोकांचा मान नष्ट केला. त्यामुळे त्यांना हनुमान नाव पडले आहे.’’

कुंभमेळ्यावरील संस्कृत भाषेतील माहितीपर पुस्तकाचे प्रकाशन

या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लेखिका डॉ. वंदना द्विवेदी यांच्या कुंभमेळ्यावरील संस्कृत भाषेतील माहितीपर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. वंदना द्विवेदी या मऊ येथील मुख्य विकास अधिकारी आशुतोष द्विवेदी यांच्या पत्नी, तसेच अग्रसेन महिला पीजी महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्या प्रमुख आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now