ज्येष्ठ बासरीवादक पूजनीय पं. केशव गिंडे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित !

डावीकडून उस्मानखा, पं. नाथ नेरलकर, पं. गिंडे, मा. विनोद तावडे, सौ. मेधा कुलकर्णी

पुणे, ११ जानेवारी (वार्ता.) – पं. पन्नालाल घोष यांच्या शिष्य परंपरेतील ज्येष्ठ बासरीवादक आणि विविध प्रकारच्या बासर्‍यांचे जनक अन् संशोधक पूजनीय डॉ. पं. केशव गिंडे यांना महाराष्ट्र शासनाच्या २०१८-१९ च्या जीवनगौरव पुरस्काराने १० जानेवारीला सन्मानित करण्यात आले. वर्ष २०१२ पासून भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावाने शास्त्रीय संगीतात योगदान देणार्‍यांसाठी हा पुरस्कार दिला जातो. ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. नाथ नेरलकर यांच्या हस्ते, तसेच सांस्कृतिक आणि क्रीडा मंत्री मा. श्री. विनोद तावडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि ५ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे पार पडला. या वेळी संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार आणि रसिक श्रोते उपस्थित होते. प्रसिद्ध सतारवादक उस्मान खान, शुभदा पराडकर आणि कोथरूड येथील विधानसभा सदस्या सौ. मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या.

प्रतिवर्षी याला जोडूनच ३ दिवस पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचेही आयोजन करण्यात येते. कार्यक्रमाचा प्रारंभ प्रसिद्ध जलतरंग वादक पं. मिलिंद तुळाणकर यांच्या वादनाने झाला. सत्कारानंतर पूजनीय पं. केशव गिंडे आणि त्यांच्या शिष्यांचे बासरीवादन झाले. यात त्यांनी संशोधित केलेल्या २ इंच लांबीच्या चैतन्य वेणूपासून ते केशव वेणू, माधव वेणू आणि १२ फूट लांबीच्या अनाहत वेणूपर्यंत विविध प्रकारच्या बासर्‍यांचे वादन सादर केले. यातून ७० हर्ट्झ पासून ते ७००० हर्ट्झपर्यंतच्या नादाची निर्मिती करून समाधी अवस्थेत नेण्याची विलक्षण ताकद आणि अनुभूती श्रोत्यांना अनुभवता आली.

हा माझा सत्कार नसून माझ्या गुरूंचा सन्मान असल्याने त्यांना अर्पण करतो ! – पूजनीय डॉ. पं. केशव गिंडे

सत्काराला उत्तर देतांना पू. पं. गिंडे म्हणाले, ‘‘आज मला भरून आले आहे. हा माझा सत्कार नसून माझ्या गुरूंचा सन्मान आहे. मी तो त्यांनाच अर्पण करतो. आई, वडील, संगीतातील गुरु आणि शिष्य यांच्याकडून मी पुष्कळ काही शिकलो. श्रोत्यांचे प्रेम आणि कुटुंबियांचा त्याग या सर्वांचा त्यात मोलाचा वाटा आहे; म्हणूनच आज मिळालेला पुरस्कार मी स्वतःसाठी न वापरता माझे संशोधन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यय करणार आहे.’’ शासनाने हा पुरस्कार दिल्याविषयी त्यांनी शासनाचेही आभार मानले.

६ आणि १२ छिद्रांच्या बासरीविषयी ‘यू ट्यूब’वर शैक्षणिक दृकश्राव्य (व्हिडिओ) सिद्ध करणार असल्याचे प्रतिपादन

‘पारंपरिक ६ छिद्रांच्या बासरीपासून मी १२ छिद्रांची बासरी सिद्ध केली आहे. ती खर्ज सप्तकापासून अतितार मध्यमापर्यंत ४ सप्तकात वाजते. ती सिद्ध करण्याचे आणि वाजवण्याचे तंत्र सर्वांना अवगत व्हावे, तसेच कोणालाही ही १२ छिद्रांची बासरी सहजतेने वाजवता यावी, यासाठी ‘यू ट्यूब’वर त्याचे शैक्षणिक दृकश्राव्य (व्हिडिओ) सिद्ध करून येत्या काही दिवसांतच चालू करणार आहे’, असेही त्यांनी सांगितले.

शालेय शिक्षणात संगीत गांभीर्याने शिकवले जाण्याची मंत्री महोदयांकडे मागणी केली आहे ! – पूजनीय डॉ. पं. केशव गिंडे

श्रीकृष्णाच्या बासरीवादनात गोप-गोपींना समाधीअवस्थेत नेण्याचे, यमुना जळ थांबवण्याचे सामर्थ्य होते. बासरी हे प्राणाशी निगडित वाद्य असल्याने तिचे सामर्थ्य इतर वाद्यांपेक्षा अधिक आहे. बासरीमुळे मनःशांती लाभते. बासरी आध्यात्मिक उन्नतीला पोषक आहे. तिच्याद्वारे रोग उपचार केले जाऊ शकतात. शालेय शिक्षणात संगीत गांभीर्याने शिकवले जावे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात भ्रमणभाषपेक्षा बासरी, तानपुरा, सतार दिसेल, अशी सोय उपलब्ध करून द्यावी’, अशी विनंतीही मी माननीय मंत्री महोदयांकडे केली आहे.

पं. गिंडे यांच्या भरीव योगदानामुळे  माझे १ मासाचे मंत्रीपदाचे वेतन रुपये दीड लाख त्यांना देत आहे ! – विनोद तावडे, सांस्कृतिक आणि क्रीडा मंत्री

श्री. विनोद तावडे म्हणाले, ‘‘पं. गिंडे यांनी सांगितल्यानुसार आम्ही क्रीडा, कला, तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खुले एस्.एस्.सी. बोर्ड ही योजना आजपासून चालू केली आहे. यात मुलांना आपल्या आवडीचे शिक्षण घेऊन ५ वी, ८ वी, १० वी आणि १२ वी ची परीक्षा देता येऊ शकेल. त्यांना नोकरीतही ५ टक्के आरक्षण देण्यात येईल. पं. गिंडे यांनी आजपर्यंत बासरीच्या संशोधनात भरीव योगदान दिले आहेच, तसेच या पुरस्काराची रक्कमही ते संशोधनासाठी आणि पुढील पिढीला शिकवण्यासाठी वापरणार आहेत; म्हणूनच या कार्यासाठी मी माझे १ मासाचे मंत्रीपदाचे वेतन रुपये दीड लाख त्यांना देत आहे.’’

श्रोत्यांना दिलेले आनंदाचे क्षण हाच पू. गिंडे यांचा आनंद  ! – सौ. वीणा गिंडे (धर्मपत्नी)

पूजनीय पं. गिंडे यांच्या धर्मपत्नी सौ. वीणा गिंडे म्हणाल्या, ‘‘बासरी हा पं. गिंडे यांचा छंद नसून ध्यास आहे. पैसे, प्रसिद्धी याच्यामागे ते कधीही लागले नाहीत. फक्त ही मींड का जमत नाही ? यातील खर्ज का वाजत नाही ? याच्याच ते मागे होते. श्रोत्यांना दिलेले काही आनंदाचे क्षण हाच त्यांचा आनंद होता.’’

क्षणचित्रे

१. सर्व मान्यवर आणि अतिथी यांचे मंगलवाद्यांनी स्वागत करण्यात येत होते.

२. पू. पं. केशव गिंडे यांना बासरीची मानवंदना देऊन आणि बासर्‍यांच्या कमानीतून व्यासपिठावर आणण्यात आले.

३. श्री. विनोद तावडे यांनी ‘कलाकारांचा सन्मान हा कलाकारानेच करावा’, असा नवा पायंडा पडला असल्याचे सांगितले.

४. पू. पं. गिंडे यांच्या पत्नीचाही शाल देऊन सन्मान करण्यात आला.

५. अतीखर्ज वादनाने सर्व श्रोते भारावून गेले. कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेण्याचे पू. पं. केशव गिंडे यांचे अद्भुत सामर्थ्य सर्वांनी अनुभवले.


Multi Language |Offline reading | PDF