आजचे मुक्त साहित्य मानवी जीवनातील उच्चतम मूल्ये जोपासण्यात, त्यांचे संवर्धन करण्यात अपयशी ठरले आहे !

११ ते १३ जानेवारी २०१९ या कालावधीत यवतमाळ येथे होत असलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने…

‘दुर्भाग्याने, आजच्या साहित्याने मुक्त (म्हणजे अनिर्बंधाचे, स्वैराचाराचे) भरण-पोषण चालवले आहे. अश्रद्ध, अस्वस्थ, बेचैन जीवनदर्शन हेच आता साहित्याचे उद्दिष्ट झाले आहे. एक साहित्यिक मित्र सांगतात, ‘‘मानवी मनाचे सूक्ष्मतिसूक्ष्म व्यापारप्रवाह उत्कटतेने प्रकट करण्यात आजच्या साहित्याने अमाप यश संपादन केले आहे.’’ सूक्ष्मतिसूक्ष्म मनोव्यापार, प्रवाह म्हणजे लैंगिकतेचे प्रवाहच ना ! त्यांची परस्पर सुसंगत आणि विसंगत आवर्तने ही सगळी कामवासनेचीच ना ? स्थूल आणि सूक्ष्म पातळीवरचे विचार, सगळे कामवासनेचेच. आप्तस्वकीय, जीवनातील अस्तित्वाची श्रद्धेने जोपासलेली उच्चतम मूल्ये (Higher Values) निपटून टाकून, जे जीवनदर्शन घडेल ते विमनस्क, उद्ध्वस्त आणि उपरे, भोगलोलुप, कामुक, या रसायनांनीच भरलेले असेल. नेमके तेच आजच्या साहित्यात ओतप्रोत आहे. पाश्‍चिमात्य विचारसरणी हेच आजच्या साहित्याचे अंग आहे. फ्राईड, डार्विन आणि मार्क्सच्या कडव्या नास्तिक तत्त्वज्ञानाने आजचे साहित्य ओतप्रोत भरलेले आहे आणि म्हणूनच अश्रद्ध, अस्वस्थ, रुग्ण जीवनदर्शन, ते घडवत आहे अन् व्यक्ती, समाज, राष्ट्र यांना रुग्ण बनवत आहे. व्यास, वाल्मीकि यांच्या प्रतिमा छिन्न-भिन्न करण्यात, पारंपरिक मूल्यांचा चुराडा उडवण्यात आजचे साहित्य स्वतःला धन्य मानते आहे, स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहे. हे साहित्यिक मित्र सांगतात, ‘‘आजच्या साहित्याने मनोविश्‍लेषणाचे तंत्र आत्मसात, विकसित केले आहे.’’

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

मनोविश्‍लेषण म्हणजे कामवासनेचेच धागेदोरे, मुक्तसंज्ञेची प्रवाहरूपे आणि सूक्ष्म संवेदनांची कंपने म्हणजे कामवासनेचा नवा अविष्कार, लैंगिकतेला उत्तेजन.

व्यभिचारी माता, म्हणजे अस्तनीतला निखारा ! हृदय जाळणारा अग्नी ! पण तोच आजच्या साहित्याचा आदर्श ठरत आहे. ‘मातृमुखी’, ही अरविंद गोखल्यांची त्यांना सर्वाधिक आवडलेली, गाजलेली लघुतम कथा पहा. त्या व्यभिचाराची मुक्त संज्ञा, प्रवाहरूपे, सूक्ष्म संवेदनाची कंपने, ते सूक्ष्मतिसूक्ष्म (?) मनोविश्‍लेषण मोठ्या चवीने आजचे साहित्य चघळत आहे. मानवी मनात दडलेल्या इच्छा, आकांक्षा, वासना, विकार, विकृती यांचा स्वैर अविष्कार झाला पाहिजे ना ! त्याकरता मुक्त समाजाला (permissive society) (जिथे स्वैरपणे, स्वैराचार करता येईल) निमंत्रणामागून निमंत्रणे जाऊ लागली. त्याकरता नव्या चळवळी, आंदोलने, सभा-संमेलने !

मनोविश्‍लेषण म्हणजे नेमके काय ? बारीक-सारीक वर्तनाच्या अंतःस्थ प्रेरणा, हेतू, मानवाला स्वतःला तरी कळतात का ? कुणाला आपले मन पूर्णांशाने कळले आहे ? (योगी आणि भक्त त्याला अपवाद आहेत.) त्या सगळ्या अंतःस्थ प्रेरणा, विकार यांना म्हणे वाट द्यायची आहे ! साहित्यिकांना वाटणार्‍या त्या सगळ्या अंतःस्थ प्रेरणा तर आहेत लैंगिक आकर्षणाच्या आणि उपभोगाच्या !’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, जून २००९)


Multi Language |Offline reading | PDF